संयुक्त अरब अमिरातच्या तपास संस्थांनी भारतीय वंशाच्या व्यावसायिक गुप्ता बंधुंना अटक केली आहे. अरुण गुप्ता आणि राजेश गुप्ता अशी या दोन भावांची नावं आहेत. त्यांच्यावर दक्षिण अफ्रिकेत भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत. त्यांनी उच्च पदावरील सरकारी नियुक्त्यांपासून अगदी मोठमोठ्या सरकारी ठेक्यांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे भारतीय वंशाचे भाऊ दक्षिण अफ्रिकेत जाऊन तेथील सरकारी नियुक्त्यांमध्ये हस्तक्षेप कसे करू शकले? ते नेमके कोण आहेत? त्यांचे अफ्रिकेतील कोणत्या नेत्यांशी जवळचे संबंध आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याच प्रश्नांचं हे विश्लेषण…

गुप्ता बंधुंविरोधात दक्षिण अफ्रिकेत चार वर्षांपूर्वी एका चौकशी आयोगाची नेमणूक झाली. अजय गुप्ता, अतूल गुप्ता आणि राजेश गुप्ता या भारतीय वंशाच्या तीन भावांनी दक्षिण अफ्रिकेतील उच्च पदावरील नियुक्त्या, मोठमोठे ठेके मिळवताना कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. यात त्यांच्यासोबत दक्षिण अफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॅकोब झुमा यांचाही समावेश आहे. गुप्ता बंधू आणि जॅकोब झुमा निकटवर्तीय आहेत.

गुप्त कुटुंब २०१८ मध्ये दक्षिण अफ्रिका सोडून पळाले. या काळात दक्षिण अफ्रिकेत झुमा सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात मोठं आंदोलन झालं. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष जॅकोब झुमा यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. यानंतर झुमा यांच्या भ्रष्टाचाराविरोधात चौकशी आयोग नेमण्यात आला. या आयोगाने गुप्ता बंधुंनाही चौकशीसाठी समन्स पाठवलं. मात्र, गुप्ता बंधू चौकशीला सामोरे गेले नाही.

गुप्ता बंधू कोण आहेत?

गुप्ता बंधू मूळचे उत्तर प्रदेशमधील सहारणपूरचे आहेत. अजय, अतुल आणि राजेश तिघेही भाऊ १९९३ मध्ये दक्षिण अफ्रिकेत स्थलांतरीत झाले. यानंतर अतुल गुप्ताने सुरुवातीला दक्षिण अफ्रिकेत बुटांचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर सहारा कम्प्युटर्सची सुरुवात केली. यानंतर गुप्ता बंधुंनी खाण व्यवसाय, हवाई वाहतूक, उर्जा आणि माध्यम क्षेत्रातही पाऊल ठेवलं.

जॅकोब झुमा दक्षिण अफ्रिकेचे अध्यक्ष होण्याआधीच गुप्ता बंधुंचे झुमा यांच्यासोबत जवळचे संबंध होते. झुमा आणि गुप्ता बंधू यांची पहिली भेट गुप्तांच्या कंपनीच्या एका कार्यक्रमात झाली. त्यानंतर झुमा आणि गुप्ता यांची जवळीक वाढतच गेली. २०१६ मध्ये तर अतुल गुप्ता दक्षिण अफ्रिकेतील सर्वात श्रीमंत १० व्यक्तींपैकी एक झाले. त्यांच्याकडे ७०० मिलियन डॉलरची संपत्ती होती.

झुमा यांचा मुलगा गुप्ता यांच्या सहारा कम्प्युटर्सचा संचालक झाला. झुमा यांची तिसरी पत्नी आणि एक मुलगी देखील एकेकाळी गुप्ता यांच्या कंपनीचे कर्मचारी होते.

गुप्ता बंधू आणि भारत संबंध

विशेष म्हणजे २०१८ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर दक्षिण अफ्रिकेतून पळालेल्या गुप्ता बंधुंना २०१८ मध्येच उत्तराखंड सरकारने झेड दर्जाची सुरक्षा दिली. त्याआधी त्यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. गुप्ता बंधुंनी देहरादून येथे मालमत्ता विकत घेतली होती.

गुप्ता बंधुंवर नेमके आरोप काय?

दक्षिण अफ्रिकेत २००९ मध्ये जॅकोब झुमा सत्तेत आल्यानंतर गुप्ता बंधू यांनी अनेक घोटाळे केल्याचा आरोप आहे. यानंतर २०१६ मध्ये दक्षिण अफ्रिकेच्या सार्वजनिक संरक्षक विभागाने एक अहवाल जारी केला. त्यात अनेक सरकारी ठेके गुप्ता बंधुंच्या जवळच्या व्यक्तींना दिल्याचा ठपका ठेवण्यात आला. यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी न्यायाधीश झोंडो यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमण्यात आला. आयोगाच्या अहवालात गुप्ता बंधुंनी त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी झुमा यांचा वापर केल्याचं निरिक्षण नोंदवण्यात आलं.

विशेष म्हणजे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या आरोपांनंतर दक्षिण अफ्रिकेतील सर्व बँकांनी गुप्ता बंधुंसोबतचे व्यवहार थांबवले. यावेळी बँक ऑफ बडोदाने गुप्ता बंधुंचे खाते उघडले आणि त्यांना आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप आहे. यानंतर दक्षिण अफ्रिका पोलिसांनी गुप्ता बंधुंची चौकशी करताना २०१८ मध्ये अफ्रिकेतील बँक ऑफ बडोदाच्या कार्यालयावर छापेही टाकले. त्यानंतर बँक ऑफ बडोदाने अफ्रिकेतील आपली शाखाच बंद केली.

हेही वाचा : विश्लेषण: ५८ कोटींचा प्रकल्प, १ कोटी १६ लाखांची लाच, ६ व्हॉट्सअप कॉल; अशाप्रकारे जाळ्यात अडकले विजय सिंगला

आता संयुक्त अरब अमिरातने गुप्ता बंधुंना अटक केल्यानंतर दक्षिण अफ्रिका सरकारकडून गुप्ता बंधुंचा प्रत्यार्पण करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी अफ्रिकेने संयुक्त राष्ट्राकडेही धाव घेतली आहे.