मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला जोरदार विरोध करणारे भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह सध्या देशभरात चर्चेचा विषय आहेत. आता तर त्यांचं दोन दशकांपूर्वीचं वादग्रस्त मुंबई कनेक्शनवरही बोललं जात आहे. याबाबत पत्रकारांनी थेट ब्रिजभूषण सिंह यांनाच सवाल केला तर त्यांनी याबाबत थेट उत्तर न देता इंटरनेटवर सर्च करा, माझं मुंबई कनेक्शन कळेल असं उत्तर दिलं. या पार्श्वभूमीवर ब्रिजभूषण सिंह यांच्या मुंबई कनेक्शनबाबतचं हे विश्लेषण…

भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या मुंबई कनेक्शनची सुरुवात १९९२ मध्ये होते. या काळात मुंबईतील कुख्यात अरुण गवळी गँगच्या चार शुटरने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसिना पारकरच्या पतीची म्हणजेच इब्राहिम पारकरची हत्या केली होती. या चार शुटरमध्ये शैलेश हळदनकर, बिपिन शेरे, राजू बटाटा आणि संतोष पाटील यांचा समावेश होता. या हत्येनंतर दाऊद इब्राहिमनेही गवळी गँगच्या या चार शुटरची हत्या करण्यासाठी आपले शुटर पाठवले होते.

दाऊद गँगच्या २० शुटरकडून तब्बल ५०० राऊंड फायर

दाऊद गँगने गवळी गँगच्या शुटरवर हल्ला करण्याआधीच गवळी गँगमधील शैलेश आणि बिपिन हे शुटर लोकांच्या हाती सापडले आणि त्यांना लोकांचा बेदम मार खावा लागला. यानंतर जखमी शुटरला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच ठिकाणी दाऊद गँगच्या २० शुटरकडून गवळी गँगच्या शुटरला मारण्यासाठी तब्बल ५०० राऊंड फायर करण्यात आले. या बेछुट गोळीबारात गवळी गँगचा शुटर शैलेश हळदनकरसह दोन पोलिसांचा मृत्यू झाला होता, तर अन्य एक शुटर बिपिन शेरे पळून गेला.

२० शुटरमध्ये माजी आमदार ब्रिजेश सिंह यांच्या समावेशाचा आरोप

दाऊद गँगकडून केलेल्या बेछुट गोळीबारात सहभागी २० शुटरमध्ये माजी आमदार ब्रिजेश सिंह यांचाही समावेश असल्याचा आरोप झाला. याच ठिकाणी विद्यमान भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याही मुंबई कनेक्शनची सुरुवात झाली.

ब्रिजभूषण सिंह यांचं मुंबई कनेक्शन काय?

मुंबईतील जे. जे. रुग्णालयावर एका शेजारच्या इमारतीतून बेछुट गोळीबार करण्यात आला होता. यात ब्रिजेश सिंह आणि सुभाष ठाकूर यांचा सहभाग असल्याचा आरोप झाला. हे दोघेही त्यावेळी तत्कालीन मंत्री कल्पनाथ राय यांच्या बंगल्यावर थांबल्याचा आरोप झाला. या प्रकरणाचा तपास पुढे सीबीआयकडे गेला. सीबीआय तपासात ब्रिजेश सिंह आणि सुभाष ठाकूर या दाऊद गँगच्या शुटरला लपण्यासाठी मदत केल्याचा आरोप ब्रिजभूषण सिंह आणि कल्पनाथ राय यांच्यावर झाला. यासाठी दोघांवर टाडा कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे खासदार बृजभूषण सिंह कोण आहेत ? एक शक्तिशाली कुस्तीपटू ते भाजपाचे खासदार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अटलबिहारी वाजपेयी यांचं तुरुंगात असलेल्या ब्रिजभूषण सिंह यांना पत्र

हे प्रकरण इथंच थांबलं नाही. या प्रकरणात कल्पनाथ राय आणि ब्रिजभूषण सिंह यांना तुरुंगातही जावं लागलं. १९९६ मध्ये ब्रिजभूषण सिंह यांना तिहार तुरुंगात हलवण्यात आलं. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वतः ब्रिजभूषण सिंह यांना पत्र लिहिलं होतं. पुढे या प्रकरणातून ब्रिजभूषण सिंह यांना क्लिनचीट मिळाली. ब्रिजेश सिंह देखील या प्रकरणातून निर्दोष सुटले. सुभाष ठाकूरला मात्र शिक्षा झाली.