scorecardresearch

Premium

“स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे अन् तो मी मिळवणारच”, टिळकांच्या घोषणेचा अर्थ काय? जाणून घ्या इतिहास ….

टिळकांवर टीका करणाराही एक वर्ग आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला त्यांनी जातीय रंग दिला, असा आरोप या वर्गाकडून केला जातो.

lokmanya tilak
लोकमान्य टिळक (फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

लोकमान्य टिळकांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. २३ जुलै रोजी टिळक यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. त्यांच्या योगदानाची दखल महात्मा गांधी, तसेच भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीदेखील घेतली आहे. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ सामान्यांपर्यंत पोहोचवण्यात टिळक यांचे मोठे योगदान आहे. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अन् मी तो मिळवणारच’ या लोकमान्य टिळक यांच्या घोषणेला स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. याच पार्श्वभूमीवर टिळक यांनी ही घोषणा कधी दिली? त्याचा नेमका अर्थ काय? हे जाणून घेऊ ….

महात्मा गांधी टिळकांविषयी काय म्हणाले होते?

टिळकांवर टीका करणाराही एक वर्ग आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याला त्यांनी जातीय रंग दिला, असा आरोप टिळकांवर केला जातो. लोकांच्या एकत्रीकरणासाठी शिवजयंती, गणेशोत्सव यांसारखे टिळकांनी राबविलेले कार्यक्रम हे हिंदू आणि हिंदू धर्मातील महापुरुषांपर्यंतच मर्यादित होते, असा आरोप केला जातो. तसेच जातीय सुधारणा आणि महिलांचे प्रश्न याबाबत टिळकांचे विचार पुराणमतवादी होते, असाही आरोप अनेक जण करतात. मात्र ‘स्वराज्याची मागणी लोकांपर्यंत सातत्याने आणि हट्टाने पोहोचवण्याचे काम टिळकांशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने सातत्याने केलेले नाही,’ असे महात्मा गांधी नेहमी म्हणत असत. लोकमान्य टिळक सातत्याने संपूर्ण स्वराज्याची मागणी करायचे. याच मागणीतून ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच’, अशी घोषणा टिळकांनी दिली.

Gandhi Jayanti 2023
Gandhi Jayanti 2023: अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यापासून महात्मा गांधींनी कशी प्रेरणा घेतली?
pankaja munde raj thackeray
“सोसायटीचं नाव सांगा, त्यांना धडा शिकवू”, पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ विधानावर मनसे नेत्याची आक्रमक प्रतिक्रिया
Gita Gopinath
पीएम मोदींचे ‘हे’ मोठे स्वप्न येत्या ४ वर्षांत पूर्ण होणार, भारत अनेक बड्या देशांना मागे टाकणार, IMF च्या गीता गोपीनाथ यांच्याकडून शिक्कामोर्तब
Indian Politics and Plato philosophy
गढूळ झालेल्या राजकारणासाठी चांगले लोक जबाबदार? तत्त्ववेत्ता प्लेटो यांचा ‘आदर्श राज्याचा’ सिद्धांत काय सांगतो?

टिळकांची ‘स्वराज्या’विषयीची भूमिका काय होती?

२३ जुलै १८५६ साली लोकमान्य टिळक यांचा जन्म झाला. ते वकील, विचारवंत व पत्रकार होते. ‘मराठा’ व ‘केसरी’ अशा दोन मराठी वृत्तपत्रांची जबाबदारी टिळकांनी हाती घेतली होती. १८९० साली टिळक काँग्रेसमध्ये सहभागी झाले. सुरुवातीच्या काळात टिळकांची भूमिका ही काँग्रेसच्या भूमिकेप्रमाणेच होती. भारतीयांना अधिक हक्क, तसेच अन्य सुधारणांची मागणी काँग्रेसकडून केली जायची. हीच भूमिका सुरुवातीच्या काळात टिळकांचीही होती.

सुरुवातीला काँग्रेसच्या भूमिकेचे समर्थन; नंतर मात्र …

याबाबत ए. के. भागवत व ग. प्र. प्रधान यांनी ‘लोकमान्य टिळक – अ बायोग्राफी’ या पुस्तकात सविस्तर लिहिलेले आहे. “इंग्रज राजवटीकडून केला जाणारा जुलूम आणि अन्याय यावर टीका करण्यासाठी सुरुवातीला लोकमान्य टिळक कठोर भाषा वापरायचे. मात्र, घटनात्मक अधिकार आणि काही सामान्य मागण्यांच्या पलीकडे ते गेलेले दिसत नाहीत. विशेष म्हणजे १८८५ ते १८९५ या काळात लोकमान्य टिळकांचे ‘केसरी’तील लेखदेखील काँग्रेसच्या भूमिकांचे, मागण्यांचे समर्थन करताना दिसतात,” असे लोकमान्य टिळक – अ बायोग्राफी या पुस्तकात नमूद करण्यात आलेले आहे.

… टिळक मात्र वेगळे होते

सुरुवातीच्या काळात काँग्रेसकडून ज्या मागण्या केल्या जायच्या, त्या मागण्यांचे टिळक समर्थन करताना दिसत असले तरी ते काँग्रेसपेक्षा काहीसे वेगळे होते. तेव्हा काँग्रेसचे नेते फाडफाड इंग्रजीत बोलायचे. बर्क आणि मॅकॉलेच्या विचारांचे अनुकरण करायचे. टिळकांनी मात्र याच विचारांचे भारतीय भाषांत भाषांतर केले होते, असेही या पुस्तकात नमूद करण्यात आलेले आहे.

… आणि काँग्रेसमध्ये १९०७ साली फूट पडली

सुरुवातीच्या काळात टिळक काँग्रेसच्या मध्यममार्गाच्या बाजूने होते. मात्र, कालांतराने काँग्रेसच्या या भूमिकेतून काहीही मिळणार नाही, असे टिळकांना वाटू लागले. त्यानंतर ते लाला लजपत राय, बिपीनचंद्र पाल यांच्यासोबत गेले. हे त्रिकूट पुढे लाल-बाल-पाल म्हणून प्रसिद्ध झाले. हे तिन्ही नेते संपूर्ण स्वराज्याची मागणी करीत होते. भारताला ब्रिटिशांपासून संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे, अशी या नेत्यांची भूमिका होती. त्यासाठी प्रसंगी असंवैधानिक, जहालवादी मार्गांचाही अवलंब करण्याचे समर्थन ते करीत होते. कालांतराने काँग्रेसमध्ये जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले आणि काँग्रेसमध्ये १९०७ साली फूट पडली.

१९१६ साली टिळकांची सिंहगर्जना

१९०७ साली टिळकांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता; मात्र ते १९१६ साली पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये दाखल झाले. याच काळात त्यांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,, तो मी मिळवणारच’ ही सिंहगर्जना केली होती.

कर्नाटकमधील बेळगाव सिंहगर्जना

राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षे तुरुंगवास भोगला. त्यांची १९१४ साली सुटका झाली. १९१६ साली त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या काळात हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र काम करावे; तसेच स्वातंत्र्यलढ्याच्या मोहिमेला धार मिळावी यासाठी त्यांनी मोहम्मद अली जिना यांच्यासोबत ‘लखनौ करारा’वर स्वाक्षरी केली. पुढे त्यांनी जी. एस. खापर्डे व ॲनी बेझंट यांच्यासह ‘अखिल भारतीय होमरुल लीग’ची स्थापना केली. १९१६ साली कर्नाटकमधील बेळगाव येथे बोलताना टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच’, अशी सिंहगर्जना केली होती.

“…अशा परिस्थितीत टिळकांनी दिली होती घोषणा”

एकीकडे भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा लढला जात असताना देशात असाही एक वर्ग होता की, जो हा देश जातीय आणि धार्मिक मुद्द्यांवरून विभागलेला आहे. त्यामुळे अन्य कोणीतरी देशाचा कारभार हाकणे चांगली बाब आहे, असे मानायचा. तसेच हा वर्ग ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणांचे दाखले द्यायचा. ब्रिटिशांच्या काळात रेल्वे आली; तसेच मागास आणि अत्याचार झालेल्या वर्गाला अधिक कायदेशीर अधिकार मिळाले, असे उदाहरण देऊन हा वर्ग ब्रिटिशांचे सरकार देशाला कसे हितकारक आहे, असे सांगायचा. या पार्श्वभूमीवर टिळकांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती.

लोकमान्य टिळकांच्या घोषणेचा अर्थ काय?

लोकमान्य टिळकांच्या या घोषणेचा अर्थ साधा, सरळ व सोपा आहे. स्वराज्य म्हणजे असे राज्य; जे आम्ही स्वत: (भारतीय) चालवू. स्वराज्य मिळवण्याचा आमचा मूलभूत अधिकार आहे. आम्ही भारतीय म्हणून जन्मालो असल्यामुळे जन्मत:च आम्हाला पूर्ण स्वातंत्र्याचा अधिकार आहे, असे लोकमान्य टिळकांना सांगायचे होते. आम्ही स्वत: आमचे राज्य चालवू शकतो, त्यासाठी आम्हाला कोणताही पुरावा देण्याची गरज नाही, असेही लोकमान्य टिळकांना या घोषणेतून सुचवायचे होते.

१७८९ साली फ्रान्समध्ये अशीच घोषणा

याआधी १७८९ साली फ्रान्समध्ये मानवाधिकाराच्या जाहीरनाम्यात अशाच प्रकारची संकल्पना मांडण्यात आली होती. स्वातंत्र्य हा माणसाचा नैसर्गिक हक्क आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचा उद्देश हा मानवाच्या नैसर्गिक आणि अलिखित अधिकारांचे जनत करणे हा आहे, असे या जाहीरनाम्यात म्हटले होते.

“लोकमान्य टिळकांच्या या घोषणेमुळे भारतीयांना…”

२३ जुलै २००७ साली लोकमान्य टिळकांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त भारत सरकाने एक विशेष नाणे जारी केले होते. या कार्यक्रमानिमित्त भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोकमान्य टिळकांच्या या घोषणेचा उल्लेख केला होता. “लोकमान्य टिळकांच्या या घोषणेमुळे भारतीयांना मोकळा श्वास घेता आला. लोकमान्य टिळकांना स्वराज्य हवे होते. त्यांना परकीय सत्ता, तसेच आपल्या देशाला घातक असलेल्या सामाजिक परंपरांपासून स्वातंत्र्य मिळवून द्यायचे होते. त्यांची संपूर्ण स्वराज्याच्या मागणीची दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या लढाईसाठी लोकांना एकत्र करण्याची इच्छा यांमुळे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला वेगळे वळण मिळाले,” असे तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते.

“टिळकांनी लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला”

२०१८ साली विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील टिळकांच्या या घोषणेचा उल्लेख केला होता. लोकमान्य टिळकांनी आपल्या देशातील लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. तसेच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच, अशी घोषणा त्यांनी केली होती. आजघडीला सुशासन हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवू, असे म्हणण्याची वेळ आली आहे, असे मोदी म्हणाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lokmanya tilak birth anniversary meaning of quote of swaraj is my birthright and i shall have it prd

First published on: 24-07-2023 at 17:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×