इंग्रजी भाषेमध्ये ॲपोस्ट्रॉफीचा वापर प्राधान्याने केला जातो. अस्लल इंग्रजी लिपीचे हे एक वैशिष्ट्य मानले जाते. मात्र इंग्लंडमधील नॉर्थ यॉर्कशायर परिषदेने पथचिन्हे आणि माहिती फलकांवरील ॲपोस्ट्रॉफीचा वापर करण्यास बंदी घातली आहे. मात्र परिषदेच्या या निर्णयावर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून व्याकरणदृष्ट्या हे चुकीचे होणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. नॉर्थ यॉर्कशायर परिषद पथचिन्हांवरील ॲपोस्ट्राॅफी का काढत आहे याविषयी…

नॉर्थ यॉर्कशायर परिषदेचा काय निर्णय काय?

नॉर्थ यॉर्कशायर हा उत्तर इंग्लंडमधील आकाराने सर्वात मोठा परगणा (कौंटी) आहे. या परगण्याचे प्रशासन नॉर्थ यॉर्कशायर परिषदेकडून चालवले जाते. या परिषदेने रस्त्यावरील वाहतूक चिन्हे आणि पथचिन्हांविषयी एक महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेतला. रस्त्यावरील माहितीफलकातून आणि पथचिन्हांवरून ॲपोस्ट्रॉफी (’) हे विरामचिन्ह काढून टाकण्यात येणार आहे. संगणकीय समस्येमुळे हा निर्णय घेतल्याचे परिषदेचे म्हणणे आहे. ॲपोस्ट्रॉफी हे विरामचिन्ह भौगोलिक डेटाबेसवर परिणाम करते. संगणकीय डेटाबेसनुसारच विरामचिन्हे असण्याची गरज आहे. पथचिन्हे किंवा रस्त्यांवरील माहितीचे फलक तयार करताना संगणकावर ॲपोस्ट्रॉफीची अडचणी निर्माण होते. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. यापुढे रस्त्यांवरील माहिती फलक किंवा पथचिन्हे ॲपोस्ट्रॉफीशिवाय तयार केली जातील, असे परिषदेने म्हटले आहे.

हेही वाचा >>> चार धाम यात्रेत ५ दिवसांत ११ भाविकांचा मृत्यू; नक्की काय घडतंय? यात्रेकरूंसाठी जारी करण्यात आलेले नवीन नियम काय आहेत?

ॲपोस्ट्रॉफी म्हणजे काय?

ॲपोस्ट्रॉफी हे इंग्रजी भाषेतील एक विरामचिन्ह आहे. हे अक्षरलोपी चिन्ह असून एखाद्या शब्दातील अक्षर गाळले आहे हे दाखविण्यासाठी हे चिन्ह वापरतात. (’) अशा प्रकारचे हे चिन्ह आहे. म्हणजे ‘do not’ ऐवजी  ‘don’t’ चा वापर करायचा. एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची मालकी दाखविण्यासाठीही हे चिन्हे वापरले जाते. उदा. ‘Raju’s chair’ (राजूची खुर्ची) किंवा ‘India’s President’ (भारताचे राष्ट्रपती). ॲपोस्ट्रॉफी हा मूळ ग्रीक शब्द आहे.

स्थानिक, भाषातज्ज्ञांचा विरोध का?

पथचिन्हे किंवा माहिती फलकांवरून ॲपोस्ट्रॉफीचा वापर टाळण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत स्थानिकांनी त्याला तीव्र विरोध केला आहे. नॉर्थ यॉर्कशायरच्या स्पा शहरामध्ये ‘सेंट मेरीज वॉक’ असे नाव असलेल्या माहिती फलकावरून ॲपोस्ट्रॉफी काढून टाकण्यात आल्यामुळे शहरवासीयांनी संताप व्यक्त केला. ‘‘माझी या परिसरातून नेहमीच ये-जा असते. मात्र ‘सेंट मेरीज वॉक’ नामफलकावरील ॲपोस्ट्रॉफी काढून टाकल्यामुळे माझे रक्त खवळते,’ असे एका टपाल कर्मचाऱ्याने सांगितले. मात्र कुणी तरी मार्कर पेनने ॲपोस्ट्रॉफी चिन्ह काढले असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. एका माजी शिक्षकाने सांगितले की, नॉर्थ यॉर्कशायर परिषद लहान मुलांसाठी चुकीचे उदाहरण तयार करत आहेत. रस्त्यांवरील माहिती फलकांवर जर चुकीच्या व्याकरणाचा वापर केला गेला तर लहान मुले त्यातून काय धडा घेतील, असा सवाल त्यांनी विचारला. यॉर्क विद्यापीठातील इंग्रजी भाषाविज्ञान व्याख्याते डॉ. एली राई यांनी परिषदेच्या निर्णयाला विरोध केला. ‘‘ॲपॉस्ट्रॉफी हा आमच्या लेखनात तुलनेने नवीन शोध आहे. मात्र इंग्रजी लेखनातील ते उपयुक्त चिन्ह आहे. लोकांना भाषेतील अर्थ समजण्यासाठी ते महत्त्वाचे होते. मात्र हे चिन्ह काढून टाकल्यामुळे अनेक शब्द पटकन लक्षात येण्यास कठीण जाईल,’’ असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> हिंसाचारामुळे धगधगत्या फ्रान्समध्ये पुन्हा दंगली भडकल्या; फ्रान्सच्या न्यू कॅलेडोनियामध्ये आणीबाणी लागू, कारण काय?

नॉर्थ यॉर्कशायर परिषदेचे म्हणणे काय?

रस्त्यांवरील माहिती फलकांवरील ॲपोस्ट्रॉफी हे चिन्ह हटविण्याचा निर्णय घेणारे हे पहिलेच प्रशासन नसल्याचे नॉर्थ यॉर्कशायर परिषदेचे म्हणणे आहे. केंब्रिज नगर परिषदेनेही असा निर्णय घेतला होता. मिड डॅव्हॉन जिल्हा परिषदेनेही ॲपोस्ट्रॉफी हटविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र स्थानिकांच्या नाराजीनंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. नॉर्थ यॉर्कशायर परिषदेच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘‘सर्व विरामचिन्हे विचारात घेतली जातील. परंतु शक्य असेल तिथे टाळली जातील. कारण रस्त्यांची नावे, पत्ते डेटाबेसमध्ये संग्रहित केल्यावर निर्धारित मानकांची पूर्तता करणे आवश्यक आहे. डेटाबेस शोधताना संभाव्य समस्या टाळण्यासाठी ही विरामचिन्हे आणि विशेष वर्ण (उदा. ॲपोस्ट्रॉफी, हायफन आणि अँपरसँड) वापरण्यास प्रतिबंधित करते, कारण संगणक प्रणालींमध्ये या वर्णांचे विशिष्ट अर्थ आहेत.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sandeep.nalawade@expressindia.com