– राखी चव्हाण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्रप्रकल्पात मुक्तपणे फिरणाऱ्या वाघिणीला ओडिशाच्या सतकोसिया व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रयत्न फसला. कारण तिला व्याघ्रप्रकल्पात सोडण्यापूर्वी बंदिस्त करण्यात आले होते आणि यादरम्यान ती अधिक काळपर्यंत मानवी सहवासात आली. त्यामुळे तिला मुक्त वातावरणात सोडणे अशक्य असल्याने मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्पात परत आणले गेले. स्थलांतरणापूर्वी करावयाचा वैज्ञानिक आणि अधिवास अभ्यासात वनखात्याचे अधिकारी कमी पडल्यामुळे एका मुक्त जीवन जगणाऱ्या वाघिणीच्या नशिबी कायमचा बंदिवास आला.

वाघाचे कृत्रिम स्थलांतरण का?

वाघांच्या कृत्रिम स्थलांतरणामागची दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे वाघांची वाढलेली संख्या आणि त्यामुळे संरक्षण क्षेत्राबाहेर गेल्यानंतर माणसांशी होणारा त्यांचा संघर्ष. उत्तम व्यवस्थापन आणि अधिवासाचे संरक्षण यामुळे वाघांची संख्या गेल्या दहा वर्षांत प्रचंड वाढली आहे. यामुळे तरुण वाघ मानवी वस्तीकडे सरकत असून त्याठिकाणी संघर्ष उद्भवत आहे. यातूनच ‘संवर्धन स्थलांतरा’चा पर्याय समोर आला आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा याचे उत्तम उदाहरण असून या जिल्ह्यातील काही वाघ नागझिरा अभयारण्यात आणि त्यापुढील टप्प्यात ते सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे.

वाघांच्या कृत्रिम स्थलांतरणासाठी कशाची आवश्यकता?

वाघांचे कृत्रिम स्थलांतरण ही सोपी प्रक्रिया नाही. त्यासाठी ज्या क्षेत्रातून वाघ न्यायचा आहे तिथली भौगोलिक परिस्थिती आणि वाघाचे खाद्य तसेच ज्या क्षेत्रात वाघ स्थलांतरित करायचा आहे तिथली भौगोलिक परिस्थिती आणि वाघाचे भक्ष्य (तृणभक्षी प्राणी) यांचा ताळमेळ जुळणे आवश्यक आहे. वाघाच्या स्थलांतरणानंतर तो त्या ठिकाणी स्थिरावू शकेल का, हे देखील पाहणे आवाश्यक आहे. वाघांसाठी नैसर्गिक वातावरण हा देखील यातला महत्वाचा घटक आहे. तसेच त्या क्षेत्रातील वाघांचे जे भक्ष्य आहे तेदेखील स्थलांतरणाच्या ठिकाणी सोडावे लागेल.

पाहा व्हिडीओ –

वाघांचे स्थलांतरण करताना कोणती काळजी घ्यावी?

अधिवासाशी जुळवून घेणारा प्राणी अशी वाघाची ओळख आहे. त्यामुळे आसाम ते राजस्थान, उत्तर प्रदेश ते केरळ आणि पश्‍चिम बंगालच्या सुंदरबनापर्यंतच्या सर्व अधिवासांमध्ये त्याच्या अस्तित्वाच्या ठळक खुणा दिसतात. अशा वेळी त्या वाघाचे स्थलांतरण करावयाचे झाल्यास त्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात बंद केल्यानंतर नव्या अधिवासात त्याला सोडण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याला कमीत कमी म्हणजे जवळपास शून्य प्रमाणात मानवी सहवास लाभायला हवा. मानवी छाप त्याच्यावर सातत्याने पडत असेल तर ते स्थानांतरण यशस्वी होऊ शकत नाही. जे आता बांधवगड ते सतकोशिया या वाघांच्या स्थलांतरणात झाले.

हेही वाचा : विश्लेषण : वाघ- मनुष्य संघर्षात वाढ कशामुळे?

यापूर्वी कोणते स्थलांतरणाचे प्रयोग यशस्वी ठरले?

पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती तिथे निर्माण झाली. २००९पर्यंत या व्याघ्रप्रकल्पात एकही वाघ नव्हता. बांधवगड व कान्हामधून दोन वाघिणी व पेंच व्याघ्रप्रकल्पातून एक वाघ येथे आणला गेला. पन्ना व्याघ्रप्रकल्प ही त्या वाघांची जन्मभूमी नव्हती, त्यामुळे कर्मभूमी असण्याचा प्रश्नही नव्हता. आर. श्रीनिवास मूर्ती या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा निर्णय सार्थ ठरला आणि त्यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थापनाचा परिणाम म्हणजे येथील वाघांची संख्या सुमारे ३५ पर्यंत गेली.

rakhi.chavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explainde on experiments of shifting tigers to other forest places in india print exp pbs
First published on: 31-07-2022 at 09:40 IST