अनिश पाटील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षभरात मुंबई व परिसरातून जप्त करण्यात आलेले २६९ किलो अमली पदार्थ सीमाशुल्क विभागाने नुकतेच नष्ट केले. आंतरराष्ट्रीय बाजारात अडीच हजार कोटी रुपये किंमत असलेले हे अमली पदार्थ महसूल गुप्तवार्ता संचलनालय (डीआरआय), सीमाशुल्क विभाग, अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) यांनी विविध कारवायांमध्ये गेल्या वर्षी जप्त केले होते. पोलीस, केंद्रीय अमली पदार्थ, नौदल, तटरक्षक दल या सारख्या यंत्रणा राज्यात सक्रिय असताना मुंबई, पुणे, नागपूर या सारख्या महानगरांमध्ये अमली पदार्थ कसे उपलब्ध होतात? त्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप

सेवन करणाऱ्यांपर्यंत अमलीपदार्थ कसे पोहोचतात?

विक्रेते ओळखीच्या ग्राहकांनाच अमली पदार्थ विकतात. पूर्वी जुन्या ग्राहकाच्या शिफारसीनंतर एखाद्या व्यक्तीला अमली पदार्थ पुरवले जायचे. पण गेल्या वर्षभरापासून राज्यात अमली पदार्थ विरोधी यंत्रणांची कारवाई वाढल्यामुळे शिफारसीनंतरही नव्या ग्राहकांना विक्रेते अमली पदार्थ विकत नाहीत. नव्या ग्राहकांची वैयक्तिक पातळीवर पडताळणी करूनच त्यांना अमली पदार्थ विकायचे की नाही, त्याबाबत विक्रेते निर्णय घेत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. यासाठी कुरियर, टपाल सेवा आदींचा वापर वाढला आहे. पैशांची देवाण-घेवाणही तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जात आहे. त्यासाठी बिटकॉइन सारख्या आभासी चलनाचाही वापर केला जात आहे. तसेच डार्कनेटच्या माध्यमातून कुठल्याही ठिकाणी पाहिजे, ते अमली पदार्थ मिळणे शक्य झाले आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय टपाल सेवेचाही वापर केला जात असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

मागणी कुठे?

मुंबई, पुणे, नागपूर या महानगरांमध्ये सध्या अमली पदार्थांना सर्वाधिक मागणी आहे. या शहरांमधून अटक झालेल्या अनेक विक्रेत्यांनी चौकशीत व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे या व्यवसायात आल्याचे पोलिसांना सांगितले आहे. महाविद्यालयीन तरुण, आर्थिक परिस्थिती बेताची असलेले व्यक्ती अमली पदार्थांच्या आहारी जातात. पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे त्यांना नियमित अमली पदार्थ खरेदी करणे शक्य होत नाही. विक्रेते अशाच तरुणांना हेरून त्यांच्या परिचित महाविद्यालयीन तरुणांना अमली पदार्थ विकण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवतात. त्यानंतर त्यांना फुकट अमली पदार्थ दिले जातात. सध्या अॅप्लिकेशनमार्फतही अमलीपदार्थांची खरेदी व विक्री केली जाते.

कोक, कडीपत्ता, कोथिंबीर…

तस्कर व विक्रेते व्यवहार करताना कधीच अमली पदार्थाचे नाव घेत नाही. त्यासाठी सांकेतिक नावांचा वापर होतो. दरवेळी या नावांमध्ये बदल केला जातो. राज्यामध्ये येणारा बहुतांश गाजा हा आंध्र प्रदेशातून येतो. त्याला कोथमिरा बोलले जाते. अॅप्लिकेशनमार्फत संदेश पाठवताना, अॅप्लिकेशनवरून दूरध्वनी करतानाही गांजा शब्द उच्चारलाही जात नाही. त्या ऐवजी गांजासाठी कोथमिरा अथवा कडीपत्ता या नावांचा वापर केला जातो. कोकेनसाठी कोक, आईस, शुगर अशा नावांचा वापर केला जायचा. अमली पदार्थांसाठी अभिनेत्रींच्या नावाचा वापर झाल्याचेही आरोपींच्या चौकशीतून उघड झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. उच्चभ्रू ग्राहकांमध्ये प्रचलित असलेले एलएसडीसाठी देवतांच्या नावाचा वापर केला जायचा. एलएसटीच्या पट्टीवर चित्रांवरूनही त्याला सांकेतिक नावे दिली जातात. रासायनिक अमली पदार्थांना स्पाईस, के टू, ब्लॅक मांबा, ब्लॅक झोंबी यासारखीही नावे आहेत.

अमली पदार्थ व त्यांची तस्करी

गांजा

राज्यात सर्वाधिक गांजा हा आंध्र प्रदेश, तेलंगणा व ओदिशा या राज्यांतून येतो. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम व तेलंगणामध्ये हैद्राबाद माल एकत्र येण्याची प्रमुख स्थळे आहेत. तेथे वितरकांकडून गांजाची विभागणी करून विविध राज्यांमध्ये त्यांचा पुरवठा केला जातो. बहुतांश गांजा रस्ते वाहतुकीने राज्यात दाखल होतो. राज्यात सर्वाधिक गांजाची तस्करी केली जाते.

चरस

सर्वांत उच्च प्रतीची चरस हिमाचल प्रदेशातून राज्यात येते. तेथील शिमला, कुल्लू, नालदेरा, नरकुंडा, किन्नौर आणि रिस्पा परिसरातून चरस उपलब्ध होते. हिमाचलमधील चरसला सर्वाधिक मागणी दिल्ली, हरियाणा, पंजाब व उत्तर प्रदेशात आहे. महाराष्ट्रासह पश्चिमेकडील राज्यामध्ये सर्वाधिक चरस ही जम्मू व काश्मीरमधून येते. काश्मीरमधून येणाऱ्या चरसचा सर्वाधिक साठा मुंबई व पुण्यात पोहोचवला जातो. हा माल रेल्वे व रस्ते वाहतुकीने राज्यात आणला जातो. पूर्वी काश्मीरमधून ट्रकमध्ये फळे व भाज्यांमध्ये लपवून चरस आणले जायचे. पण गाड्यांची तपासणी अमलीपदार्थ विरोधी पथकाने वाढवल्यामुळे बिहार, नेपाळमार्गेही चरस राज्यात आणली जाते.

कोकेन व हेरॉइन

कोकेन, हेरॉइन उच्चभ्रू ग्राहकांमध्ये सर्वाधिक विकले जाते. त्यामुळे कोकेनच्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय तस्करांचे सर्वाधिक जाळे मुंबई, दिल्ली, पुणे, हैद्राबाद, चेन्नई, कोलकाता या महानगरांमध्ये पसरले आहे. मुंबई व दिल्लीतील येणारा हेरॉइन व कोकेनचा साठा तुलनेने सर्वाधिक आहे. उच्चभ्रू घरातील तरुण, कॉर्पोरेट, मोठे व्यावसायिक, चित्रपट कलाकार यांच्यामध्ये कोकेनला जास्त मागणी आहे. दक्षिण अमेरिका व आफ्रिकी देशांतून कोकेनची सर्वाधिक तस्करी होते. तर अफगाणिस्तानातून देशात हेरॉइनचा साठा येतो. कोकेनच्या वितरणाचे मुंबई प्रमुख केंद्र आहे. तर हेरॉइनही पाकिस्तान, आखाती देशांच्या मार्गे येत असल्यामुळे समुद्र अथवा विमानमार्गे मुंबई व पश्चिमेकडील किनारपट्टी भागात उतरवले जाते. राजस्थानमधूनही राज्यात हेरॉइनची तस्करी होते. कोकेनच्या तस्करीसाठी पूर्वी आफ्रिका खंडातील गरीब देशांमध्ये नागरिकांचा वापर व्हायचा. पण सध्या दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, व्हेनेझुएला, गयाना, ब्राझील, कोलंबिया आणि सुरीनाम या देशांतील गरीब नागरिकांचाही कोकेनच्या तस्करीसाठी वापर होतो. कोकेनच्या तस्करीसाठी अदीस अबाबा ते दुबई व मग दुबई ते मुंबई हा हवाई मार्ग कुख्यात आहे. राज्यात कोकेन विक्रीमध्ये नायजेरियन नागरिकांची मक्तेदारी आहे. मुंब्रा, दिवा, मिरारोड, वसई, तर नवी मुंबईतील काही भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेले नायजेरियन नागरिक कोकेनसह एमडी, एफेड्रीन अशा अनेक अमली पदार्थांची तस्करीत सक्रिय आहे.

मेफेड्रोन

मेफेड्रोनची(एमडी) सर्वाधिक निर्मीती ही महाराष्ट्रात होते. विशेष करून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड परिसरात ही निर्मिती केली जाते. याशिवाय वापी, वलसाड येथेही एमडीची निर्मिती केली जाते. केंद्रीय यंत्रणा, राज्य पोलिसांनी अशा कारखान्यांवर कारवाया केल्या आहेत. पण एमडी विक्रीची मोठी उलाढाल असल्यामुळे नवीन निर्मातेही त्यात उतरत आहेत.

अमलीपदार्थ व काळ्या बाजारातील त्यांच्या किमती

– गांजा २०,००० रुपये प्रति किलो

– हेरॉइन ३,००० ते ६,००० रु. प्रति ग्रॅम

– चरस २,८०० ते ६,००० रु. प्रति १० ग्रॅम

– कोकेन ६,००० ते १०,००० रु. प्रतिग्रॅम

रासायनिक अमली पदार्थ

– एमडी १,००० ते ४,००० रु. प्रति ग्रॅम

– एक्स्टेसी ३,००० ते ६,००० रु. गोळी

– खोकला औषध आणि बटण कोडेन १५०-१८० रुपये प्रति (२०० मिली)

– एलएसडी डॉट्स रु. २५०० ते ३५०० प्रति डॉट.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained how do drugs come to mumbai abn 97 print exp 0122
First published on: 01-01-2022 at 11:55 IST