भारतात नुकतीच जंगली हत्तींची डीएनएआधारित गणना करण्यात आली असून त्यात २२ हजार ४४६ हत्तींची नोंद करण्यात आली आहे. त्यात २०१७ मध्ये झालेल्या नोंदणीच्या तुलनेत १८ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. मात्र, पद्धती बदलल्यामुळे संख्येची तुलना करणे योग्य नाही, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
सर्वेक्षणानंतर अहवाल प्रसिद्ध होण्यास उशीर का?

डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेत आयोजित वार्षिक संशोधन परिसंवादात हा अहवाल (Status of Elephants in India: DNA-based Synchronous All-India Population Estimation of Elephants (SAIEE 2021–25) प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. एराच भरुचा, इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचे महासंचालक डॉ. एस.पी. यादव आणि भारतीय वन्यजीव संस्थेचे संचालक डॉ. जी.एस. भारद्वाज उपस्थित होते. या अभ्यासात समाविष्ट असलेल्या जटिल आनुवंशिक विश्लेषण आणि तपशील प्रमाणीकरणामुळे चार वर्षांनी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, हत्ती प्रकल्प आणि भारतीय वन्यजीव संस्था यांनी संयुक्तपणे केलेल्या २०२५ च्या अभ्यासातून भविष्यातील देखरेख आणि संवर्धन नियोजनासाठी एक नवीन वैज्ञानिक आधाररेखा स्थापित केली आहे.

नवीन गणनेतील वैशिष्ट्य काय?

नवीन गणनेमध्ये भूसर्वेक्षण, उपग्रह-आधारित मॅपिंग आणि आनुवंशिक विश्लेषण यांचा समावेश असलेल्या प्रक्रियेचा वापर करण्यात आला. पहिल्या टप्प्यात, वन पथकांनी व्यापक सर्वेक्षणादरम्यान हत्तींचे अस्तित्व नोंदवण्यासाठी एम-स्ट्राइप्स अॅपचा वापर करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात उपग्रह डेटा वापरून अधिवासाची गुणवत्ता आणि मानवी पाऊलखुणा मूल्यांकन केले गेले. तिसऱ्या टप्प्यात चार हजार ६५ हत्ती ओळखण्यासाठी शेणातून डीएनए काढणे समाविष्ट होते. शास्त्रज्ञांनी एकूण हत्तींच्या संख्येचा अंदाज घेण्यासाठी मार्क-रिकॅप्चर मॉडेलचा वापर केला. जगातील एकूण आशियाई हत्तींपैकी ६० टक्क्यांहून अधिक हत्ती भारतात आहेत, परंतु अतिक्रमणे, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि मानव-हत्ती संघर्षामुळे त्यांचे अधिवास कमी होत आहेत, असा निष्कर्षदेखील या अहवालात नोंदवण्यात आला.

सर्वाधिक हत्ती कोणत्या क्षेत्रात?

पश्चिम घाटात सर्वाधिक ११ हजार ९३४ हत्ती आहेत. त्यानंतर ईशान्य टेकड्या आणि ब्रह्मपुत्र पूर मैदाने या ठिकाणी सहा हजार ५५९ आहेत. शिवालिक टेकड्या आणि गंगेच्या मैदानात दोन हजार ०६२ हत्ती आहेत, तर मध्य भारतात आणि पूर्व घाटात मिळून एक हजार ८९१ आहेत. कर्नाटकात (६,०१३), त्यानंतर आसाम (४,१५९), तमिळनाडू (३,१३६), केरळ (२,७८५), उत्तराखंड (१,७९२), ओडिशा (९१२) हत्ती आहेत. तर छत्तीसगड व झारखंड मिळून (६५०), अरुणाचल प्रदेश (६१७), मेघालय (६७७), नागालँड (२५२) आणि त्रिपुरा (१५३) यासारख्या ईशान्य राज्यांमध्ये हत्तींची संख्या कमी आहे. मध्य आणि पूर्व भारताच्या काही भागात, मध्य प्रदेश (९७) आणि महाराष्ट्र (६३) या राज्यांमध्ये हत्तींचे कळप लहान, विखुरलेले आहेत.

हत्तीच्या गणनेसाठी नव्या पद्धतीची गरज?

हत्तींची गणना करण्यासाठी ते दिसणे किंवा त्यांच्या विष्ठेची तपासणी अशा पद्धती वापरल्या जात होत्या. मात्र, त्या व्यापक जंगलांमध्ये अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी पुरेशा नव्हत्या. त्यामुळे, हत्ती गणनेसाठी डीएनए तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या पद्धतीत, प्रत्येक हत्तीच्या डीएनए नमुन्यावरून त्याची स्वतंत्र ओळख पटवली जाते. यामुळे हत्तींची अचूक गणना करणे शक्य झाले.

डीएनए तंत्रज्ञान कसे काम करते?

डीएनए मार्क-रिकॅप्चर तंत्रज्ञानामध्ये हत्तींची विष्ठा गोळा केली जाते. या नमुन्यांचे ११ मायक्रोसॅटलाइट लोकेशनवर जीनोटाइपिंग केले जाते आणि प्रत्येक नमुन्याला एक आनुवंशिक ओळख दिली जाते. एकाच हत्तीचा नमुना दुसऱ्या ठिकाणाहून मिळतो, तेव्हा ‘कॅप्चर-रिकॅप्चर’ अहवाल तयार होतो. त्यानंतर, ‘स्पेशली एक्सप्लिसिट कॅप्चर-रिकॅप्चर (एसईसीआर)’ मॉडेल वापरून, क्षेत्रीय डेटा आणि अधिवास माहिती एकत्र करून हत्तींची ओळख आणि एकूण संख्येचा अंदाज लावला जातो.

हत्तींची परिस्थिती चिंताजनक का?

पश्चिम घाटात आता कॉफी आणि चहाच्या मळ्यांमुळे, परदेशी वनस्पतींमुळे, शेतीभोवतीच्या कुंपणामुळे आणि वेगाने होणाऱ्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे तेथील हत्तींचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले आहेत. आसाममध्ये, सोणितपूर आणि गोलाघाट जिल्ह्यांमधील जंगलतोडीमुळे मानवी-हत्ती संघर्ष अधिकच वाढला आहे. मध्य भारतात हत्तींचे संरक्षित क्षेत्राबाहेरील विखुरलेले अधिवास खाणकाम, स्थलांतरित शेती आणि महामार्ग व रेल्वेसारख्या रेखीय पायाभूत सुविधांमुळे खराब झाले आहेत. या प्रदेशात भारतातील दहा टक्क्यांपेक्षा कमी हत्ती असले तरी, हत्तींमुळे सुमारे ४५ टक्के मानवी मृत्यू येथेच झाले आहेत.