टेस्लाचे प्रमुख आणि ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरवर ब्लू टिक प्राप्त व्हेरिफाईड युजर्ससाठी महिन्याला ८ डॉलरचे (६६१ रुपये) शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ट्विटर निशुल्कपणे नामांकित युजर्सला ब्लू टिक देत व्हेरिफाईड करत होते. मात्र, एलॉन मस्कने ट्विटर खरेदी केल्यानंतर व्हेरिफिकेशनची सद्य प्रक्रिया दोषपूर्ण असल्याचं म्हटलं. तसेच यापुढे शुल्क आकारण्याची घोषणा केली. यानंतर ट्विटरवर शुल्क द्यावं की नाही यावरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद नेमका काय, आतापर्यंत याबाबत काय घडामोडी घडल्यात आणि ट्विटरचं नवं धोरण काय असणार याचा हा खास आढावा…

३१ ऑक्टोबरला एका युजरला उत्तर देताना एलॉन मस्क म्हणाले की, व्हेरिफिकेशनच्या संपूर्ण प्रक्रियेत सुधारणा करण्यात येणार आहे. यानंतर १ नोव्हेंबरला मस्क यांनी ट्विटर ब्लू टिकसाठी शुल्क आकारण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं. यानंतर एलॉन मस्कने केलेल्या ट्वीट मालिकेत सध्याची ट्विटरवरील व्यवस्था चालणार नाही असं म्हटलं. तसेच आता लोकांना शक्ती देणार म्हणत ब्लू टिकसाठी प्रति महिना आठ डॉलर इतके शुल्क आकारले जाईल, अशी घोषणा केली.

कोणाला किती पैसे द्यावे लागणार?

एलॉन मस्क यांच्या घोषणेनंतर ब्लू टिकसाठी युजर्सला प्रति महिना शुल्क द्यावं लागणार आहे हे स्पष्ट झालं आहे. असं असलं तरी मस्क यांनी ही घोषणा करताना प्रत्येक देशाच्या क्रयशक्तीच्या समतुल्यप्रमाणात हे शुल्क आकारण्यात येईल हेही मस्क यांनी नमूद केलंय. त्यामुळे अमेरिकेतील युजर्ससाठी ब्लू टिक शुल्क प्रति महिना ८ डॉलर असलं तरी ते भारतात तेवढंच राहणार नाही. भारतात हे शुल्क अमेरिकेच्या तुलनेत कमी असेल असंही यावरून समोर येत आहे.

शुल्क देणाऱ्यांना अधिकच्या सुविधा

इतकंच नाही, तर एलॉन मस्क यांनी ब्लू टिकसाठी शुल्क भरणाऱ्या युजर्सला काही अधिकचे फीचर्स उपलब्ध करून देण्याबाबतही सुतोवाच केलंय. यानुसार शुल्क देणाऱ्या युजर्सला सर्च, मेंशन आणि रिप्लायमध्ये प्राधान्य मिळणार आहे. याशिवाय या युजर्सला मोठे व्हिडीओ आणि ऑडिओही ट्वीट करता येणार आहेत. तसेच युजर्सला वेबसाईटच्या पेवॉल्सला टाळताही येणार आहे. विशेष म्हणजे यातून ट्विटरच्या उत्पन्नाचा मार्ग तयार होईल आणि त्यातून कंटेंट क्रिएटरलाही रिवार्ड देता येतील, असंही मस्क यांनी म्हटलंय.

ट्विटरवर ब्लू टिकचं महत्त्व काय?

ट्विटरवर इतरांच्या नावाने अनेक बनावट खाती आहेत. एकाच नावाचे अनेक खाते असल्याने अनेकदा त्या नावाची खरी व्यक्ती कोण हे लक्षात येत नाही. अनेक राजकीय नेते आणि इतर प्रसिद्ध व्यक्तिंचे बनावट खातेही आहेत. अशा स्थितीत ट्विटरवर त्या व्यक्तिंची ओळख निश्चित करण्यासाठी ट्विटर ब्लू टिक देते. संबंधित व्यक्तीच्या खऱ्या ओळखीची खातरजमा केल्यानंतर ट्विटरकडून हे ब्लू टिक दिलं जातं.

ब्लू टिक व्हेरिफिकेशनची प्रक्रिया काही देशांमध्ये मागील वर्षी सर्वांना उपलब्ध झाली. त्यासाठी संबंधित व्यक्तीला अर्ज करावा लागतो. त्या अर्जानंतर ट्विटरकडून व्हेरिफिकेशनचा निर्णय घेतला जातो. ट्विटर सरकारी संस्था/विभाग, कंपनी, ब्रँड, खासगी संस्था, वृत्तसंस्था, पत्रकार, खेळाडू, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, वैज्ञानिक, धार्मिक गुरू/नेते आणि लोकांना प्रभावित करणाऱ्या इतर लोकांना ब्लू टिक देते. हा अर्ज नाकारला गेला तर पुन्हा ३० दिवसांमध्ये अर्ज करता येतो. अनेकांना पहिल्या प्रयत्नात व्हेरिफिकेशन होऊन ब्लू टिक मिळत नाही. अशावेळी ३० दिवसांनी पुन्हा अर्ज करता येतो. एक व्यक्ती दर ३० दिवसांनी अनेकवेळा अर्ज करू शकते.

हेही वाचा : विश्लेषण: ट्विटर ताब्यात घेणारे एलॉन मस्क ‘टेस्ला’मुळे अडचणीत; जगभरात दाखल होतायत खटले! नेमका काय आहे प्रकार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असं असलं तरी ट्विटरची व्हेरिफिकेशनची हीच पद्धत वादाचाही विषय ठरली. मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स असूनही ब्लू टिक न मिळाल्याने अनेकांनी तक्रार केली. यावरूनच एलॉन मस्क यांनीही टीका केली. तसेच ब्लू टिक धोरणात सुधारणा करण्याची घोषणा केली.