– संतोष प्रधान
तेलंगणात विधानसभा निवडणुकीला अजून वर्षभराचा कालावधी असला तरी काँग्रेस आमदाराने राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने मुनूगोड या मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राज्यातील तसेच मतदारसंघातील वातावरण तापले आहे. गेल्या दोन वर्षांत दोन पोटनिवडणुका जिंकल्याने भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तिसरी पोटनिवडणूक जिंकून पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला पराभूत करण्याची भाजपची व्यूहरचना आहे. तेलंगणा जिकंण्याच्या उद्देशानेच भाजपने अलीकडेच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये आयोजित केली होती. भाजप नेत्यांचे दौरे या राज्यात वाढले आहेत. यामुळेच एका मतदारसंघातील पोटनिवडणूक ही पुढील काही काळासाठी राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाची असेल.
तेलंगणाच्या राजकारणात सध्या काय चालले आहे?
तेलंगणामध्ये विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर २०२३ मध्ये होणार आहेत. निवडणुकीला अद्याप वर्षभराचा कालावधी असला तरी या राज्यातील वातावरण आतापासूनच ढवळून निघाले आहे. भाजपला दक्षिणेकडील कर्नाटक वगळता अन्य राज्यांमध्ये वर्चस्व अजून तरी प्रस्थापित करता आलेले नाही. तेलंगणात भाजपला यशाची खात्री वाटते. यामुळेच भाजपने सध्या सारी ताकद ही तेलंगणात लावली आहे. तेलंगणात लोकसभेच्या १७ जागा आहेत. विधानसभा जिंकून लोकसभा निवडणुकीत चांगले यश संपादन करण्याची भाजपची योजना आहे. भाजपचा तेलंगणात फारसा प्रभाव नव्हता. पण २०१९च्या लोकसभा निवडणुकीत चार जागा जिंकल्यापासून भाजपने या राज्यावर लक्ष केंद्रित केले होते.
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविथा यांचा पराभव हा मुख्यमंत्र्यांना फारच जिव्हारी लागला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या हैदराबाद महापालिका निवडणुकीत ४८ प्रभागांमध्ये विजय संपादन केल्यापासून भाजपला यशाची आशा पल्लवित झाली. गेल्या दोन वर्षांत झालेल्या दोन मतदारसंघातील पोटनिवडणुकांत भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर राव यांची कोंडी करण्याची योजनाच भाजपने आखली. अलीकडेच काँग्रेस आमदार के. राज गोपाळ रेड्डी यांनी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित होते.
पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच वातावरण का तापले?
मुनूगोड या मतदारसंघातील पोटनिवडणूक ही राज्याच्या राजकारणाचे संदर्भ बदलणारी ठरणार आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच अमित शहा आणि मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी या मतदारसंघाचा दौरा केला. भाजपने ही जागा जिंकल्यास तेलंगणात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात नाराजी आहे, असा निष्कर्ष तिसऱ्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून काढला जाऊ शकतो. हे तेलंगणा राष्ट्र समितीला परवडणारे नाही. यामुळेच काहीही करून भाजपला ही जागा जिंकता येऊ नये, असे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे प्रयत्न आहेत.
चंद्रशेखर राव यांचे भाजपबरोबर का बिनसले?
पूर्वी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचे केंद्रातील भाजपबरोहर चांगले सख्य होते. राज्यसभेत भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने तेलंगणा राष्ट्र समिती भाजपला अनुकूल अशी भूमिका वरिष्ठ सभागृहात घेत असे. पण तेलंगणात हातपाय पसरायला संधी दिसू लागली तशी भाजपने चंद्रशेखर राव यांचे पंख कापण्यास सुरुवात केली. गेल्या हंगामात तेलंगणात उत्पादित झालेला सर्व तांदूळ खरेदी करण्यास नकार देऊन भाजपने तेलंगणा राष्ट्र समितीला पहिला धक्का दिला.
तेलंगणा राज्य पूर्वी निजामाच्या आधिपत्यखालील प्रदेश होता. यामुळे निजामाच्या राजवटीच्या खुणा अजूनही दिसतात. यातूनच भाजपने धार्मिक ध्रुवीकरणावर भर दिला. लोकसभा निवडणुकीत निझामाबाद, करीमनगर, आदिलाबाद, सिकंदराबाद या चार मतदारसंघात भाजपचे खासदार निवडून आले. यापैकी तीन मतदारसंघात धार्मिक ध्रुवीकरण भाजपच्या कामी आले होते. हैदराबादमध्ये तेलंगणा राष्ट्र समितीची एमआयएमचे नेते असादुद्दीन ओवेसी यांच्याबरोबर आघाडी आहे. याचा फायदा भाजपने हैदराबाद महापालिका निवडणुकीत उचलला होता.
आरोप-प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी कोणते मुद्दे?
पोटनिवडणुकीच्या आधीच परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुख्यमंत्र्यांची कन्या कविथा यांचे मद्य सम्राटांबरोबर आर्थिक संबंध असल्याचा आरोप भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केल्याने वातावरण तापले. दुसरीकडे, अमित शहा यांनी चंद्रशेखर राव यांच्यावर घराणेशाहीचा आरोप सुरू केला आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र मंत्री, कन्या आमदार तर भाचा मंत्री यावर भाजपने भर दिला आहे.
हेही वाचा : तेलंगणात विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचे बिगुल वाजले, सर्वच पक्षांसाठी निवडणूक प्रतिष्ठेची
भाजपच्या वतीने काढण्यात आलेली पदयात्रा तेलंगणा सरकारने रोखली. त्यावरून भाजपने चंद्रशेखर राव यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. एकूणच एका मतदारसंघातील पोटनिवडणुकीमुळे तेलंगणाचे राजकीय वातावरण पार ढवळून निघाले आहे. राजीनामा दिलेला आमदार हा काँग्रेसचा आहे. पण काँग्रेस पक्ष कुठेच चित्रात दिसत नाही.