दीर्घकाळ लांबलेले रशिया-युक्रेन युद्ध निरनिराळे वळण घेत असून त्यास कलाटणी देण्याचा प्रयत्न उभयतांकडून होत आहे. रशियन सैन्य युक्रेनमध्ये हल्ले चढवत झापोरिझिया प्रदेशात पुढे सरकत आहे. तर युक्रेनने रशियाच्या नोव्हारोयिस्क बंदरावर कच्च्या तेल निर्यातीच्या पायाभूत सुविधांवर हल्ला केल्याचा दावा केला. या कारवाईत युक्रेनने विस्तारित पल्ल्याच्या नवीन ‘लाँग नेपच्यून’ क्रूझ क्षेपणास्त्रांचा प्रथमच वापर करीत सर्वांना चकीत केले.
झेलेन्स्कींकडून माहिती
युक्रेनचे अध्यक्ष वालोदिमीर झेलेन्स्की यांनी नवीन लाँग नेपच्यून क्रूझ क्षेपणास्त्राची चित्रफित प्रसारित केली. एक हजार किलोमीटर मारक पल्ल्याचे हे क्षेपणास्त्र रशियाविरुद्ध कारवाई करताना नजरेस पडते. आतापर्यंत ते प्रक्षेपित होताना कधीही दिसले नव्हते. युद्धकाळात त्याची चाचणी घेतली गेली होती. रशिया विरोधातील युद्धात ते वापरले जात असल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. रशियन लक्ष्यांवर लाँग नेपच्यूनने मारा केल्याची चित्रफित सादर करण्यात आली. रशियाच्या आक्रमणाला हा आमचा न्याय्य प्रतिसाद आहे. युक्रेनियन क्षेपणास्त्रे अचूक लक्ष्यभेद करत असल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला.
कसे आहे ‘लाँग नेपच्यून’?
मूळ आवृत्त्यांपेक्षा लाँग नेपच्यूनची रचना वेगळी आहे. देशांतर्गत निर्मिलेल्या मूळ आर – ३६० नेपच्यूनचे हे एक रूप आहे. हे मूळचे जहाजविरोधी क्षेपणास्त्र असून युक्रेनला रशियात खोलवर प्रहार करण्याची अधिक क्षमता देते. युक्रेनने २०२२ मध्ये रशियन मॉस्क्वॉ हे प्रमुख जहाज बुडविण्यासाठी नेपच्यून क्षेपणास्त्रांचा वापर केला होता. ‘लाँग नेपच्यून’मध्ये कोणत्या प्रकारची टोपणे अर्थात वॉरहेड्स आहेत, त्याची स्पष्टता झालेली नाही. परंतु, जहाजविरोधी नेपच्यून क्षेपणास्त्र सुमारे १५० किलोग्रॅम वजनाची स्फोटके वाहून नेऊ शकते. लाँग नेपच्यून त्याच्या लांब व रुंद मुख्य भागामुळे मागील आवृत्तीपेक्षा वेगळे ठरते. त्यात अतिरिक्त इंधन साठविण्याची क्षमता आहे. एका लहान टर्बोफॅन जेट इंजिनवर ते चालवले जाते. नेपच्यूनची आणखी एक आवृत्तीदेखील विकसित करण्यात आली. ती मध्यवर्ती श्रेणीतील आवृत्तीसारखे दिसते. जे मूळ जमिनीवरील हल्ला करणारे नेपच्यून आणि लाँग नेपच्यूनच्या दरम्यान येते.
लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची गरज
अमेरिकेने प्रयत्न करूनही रशिया युद्धविरामास तयार नाही. युक्रेनमध्ये प्रमुख शहरांवर रशियाकडून हल्ल्यांचे सत्र कायम आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी क्रेमलिनवर दबाव वाढविणे युक्रेनला गरजेचे वाटते. त्यासाठी अधिक शक्तिशाली लांब पल्ल्याची क्षमता महत्त्वाची आहे. ती प्राप्त झाल्यास युक्रेनचे सैन्य प्रभावीपणे रशियाच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर देऊ शकते. रशियाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या रशियन तेल कंपन्यांच्या मालमत्ता आणि हवाई हल्ले करण्यासाठी वापरले जाणारे तळ लक्ष्य करता येतील, असे युक्रेनचे म्हणणे आहे. याकरिता अमेरिकेकडून लांब पल्ल्याचे टॉमहॉक क्रूझ क्षेपणास्त्र मिळवण्याचा राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा प्रयत्न होता. परंतु, ते अद्याप मिळाले नाही. त्यामुळे सध्या युक्रेनला स्वदेशी लाँग नेपच्यूनवर अवलंबून रहावे लागत आहे.
फ्लेमिंगो क्षेपणास्त्र
मित्र राष्ट्रे युक्रेनला सुरक्षेची हमी कशी द्यायची, या गोंधळात असताना युक्रेनला रशियन आक्रमण थोपविण्यासाठी स्वत:च्या मार्गाने पुढे जावे लागत आहे. लांब पल्ल्याची क्षमता प्राप्त करण्यासाठी त्याने फ्लेमिंगो क्षेपणास्त्रांचे उत्पादन वाढवले आहे. युक्रेनच्या फायर पॉइंटने देशात विकसित केलेले हे क्रूझ क्षेपणास्त्र तीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. अनेकदा ते एफपी – ५ क्षेपणास्त्र म्हणून गणले जाते. ११५० किलोग्राम वजनाची स्फोटके ते वाहून नेऊ शकते. एक टनापेक्षा जास्त वजनाच्या या क्षेपणास्त्राच्या मारक टप्प्यात रशियाचा काही भाग येईल. युक्रेनची सर्वात मजबूत सुरक्षा हमी असे त्याचे काही क्षेपणास्त्र तज्ज्ञांनी वर्णन केले आहे.
युद्ध चार वर्षपूर्तीकडे
पावणेचार वर्षांहून अधिक काळापासून चाललेल्या रशिया-युक्रेन युद्धात दावे-प्रतिदावे होत आहेत. रशिया ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी किव्ह या राजधानीसह विविध शहरांमध्ये मुख्यत्वे हल्ले करीत आहे. यात जीवितहानी होत असून अनेक जण जखमी झाल्याचे युक्रेनकडून सांगितले जाते. तर रशियन संरक्षण विभागाने याच काळात मोठ्या संख्येने युक्रेनियन ड्रोन पाडले, तसेच दोन नेपच्यून मार्गदर्शित क्षेपणास्त्रे, चार रॉकेट्स रोखल्याचे म्हटले आहे. युक्रेनियन हल्ल्यामुळे रशियाच्या नोव्होरोसियनस्कमध्ये आणीबाणीची स्थिती जाहीर करावी लागली. नोव्हारोयिस्क बंदरावर युक्रेनने रात्री केलेल्या हल्ल्यात लाँग नेपच्यूनचा वापर केल्याची शक्यता वर्तविली जाते. रशियाच्या कच्च्या तेल निर्यातीच्या पायाभूत सुविधांवर आतापर्यंतचा हा सर्वात हानीकारक हल्ला मानला जातो.
