महात्मा जोतिबा फुलेंनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यानंतर आता सत्यशोधक समाज १५० व्या वर्षात पदार्पण करत आहे. स्थापनेनंतरच्या काळात सत्यशोधक समाजाने महाराष्ट्रासह देशातील सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत मोलाची भूमिका निभावली. ही भूमिका काय? महात्मा फुलेंना सत्यशोधक समाजाच्या निर्मितीची गरज का वाटली? त्यासाठी त्यांनी काय केलं? सत्यशोधक समाजाचा नेमका विचार काय? हा विचार रुजवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले आणि त्यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाची वाटचाल कशी झाली? या सर्व प्रश्नांचा हा आढावा.

जोतिबा फुलेंची सर्वसामान्यांमधील प्रमुख ओळख ही त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची आहे. मात्र, फुलेंचं शिक्षणासोबतच समाजाच्या धार्मिक प्रबोधनाचं कार्यही तेवढंच महत्त्वाचं आहे. समाजात विशिष्ट जातीलाच शिक्षणाचा अधिकार, महिलांना केवळ चुल आणि मूल इतकेच अधिकार देणाऱ्या काळात या जुनाट विचारांना धार्मिक आधार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे महात्मा फुलेंनी चुकीच्या विषमतावादी धार्मिक परंपरांची चिकित्सा करण्यास सुरुवात केली. तसेच बहुसंख्य समाज याच रुढीपरंपरावादी विचारांचा असताना महात्मा फुलेंनी समाजप्रबोधनाचा मार्ग निवडला.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
thane lok sabha seat, BJP s Sanjeev Naik, Launches Campaign in Thane, Emphasizes Charitable Birthday Celebration, sanjeev naik in thane lok sabha, mahayuti, shinde shivsena,
वाढदिवसाच्या निमित्ताने संजीव नाईक यांची मतपेरणी
prakash ambedkar
“चळवळीला लाचार करून…”, प्रकाश आंबेडकरांचा मविआला टोला; म्हणाले, “माझ्या आजोबांनी…”

फुलेंच्या या प्रबोधनाविषयी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे त्यांच्या ‘महात्मा फुले आणि धर्म’ या पुस्तकात लिहितात, “फुल्यांनी आयुष्यभर हिंदू धर्मातील अनेक सिद्धांतावर कठोर हल्ला चढविला. त्या धर्मातील बहुतांश भाग नाकारला. या बाबतीतील फुल्यांचे विचार ज्यांना पटले, ते लोक त्यांना मानू लागले. अशा लोकांना बरोबर घेऊन त्यांनी ‘सत्यशोधक समाज’ या संस्थेची स्थापना केली. ते स्वतःला असलेले समाजपरिवर्तन या समाजाच्या मार्फत घडवून आणू इच्छीत होते.”

पुण्यात एका सभेत सत्यशोधक समाजाची स्थापना

समाजात प्रबोधन करायचं असेल तर त्यासाठी तसे आधुनिक विचार करणाऱ्या तरुणांचं संघटनही करणे महात्मा फुलेंना आवश्यक वाटलं आणि त्यातूनच त्यांनी महाराष्ट्रातील अनेक समविचारी लोकांना एक पत्र पाठवून आपला विचार कळवला आणि पुण्यात एका सभेचे आयोजन केले. याच सभेत सत्यशोधक समाजाची स्थापना झाली.

सत्यशोधक समाजाच्या झेंड्याविषयी जी. ए. उगले ‘सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील’ या पुस्तकात लिहितात, “बुधवार, दिनांक २४ सप्टेंबर १८७३ रोजी सायंकाळी सत्यशोधक समाजाची स्थापन जाली. त्यानंतर पुण्यातील वेताळपेठेतून सत्यशोधक समाजाच्या झेंड्याची मिरवणूक काढण्यात आली होती. या प्रसंगी उच अशा वेळूला पिवळ्या, लाल व हिरव्या रंगांच्या पागोटी गुंडाळण्यात आली होती.”

“पुढे १७ मार्च १८८५ रोजी सत्यशोधक कृष्णराव पांडुरंग भालेराव यांनी पुण्याच्या मुख्य पेठांमधून सत्यशोधक झेंड्याची मिरवणूक काढली होती. त्यावेळीही असाच झेंडा वापरला होता,” असं उगले यांनी नमूद केलं.

धार्मिक कर्मकांडात सहभागी झाल्याने सत्यशोधक समाजावर टीका

सत्यशोधक समाजाची २४ सप्टेंबर १८७३ रोजी स्थापना झाल्यानंतर मधला काळ या सत्यशोधक समाजाच्या जडणघडणीचा राहिला. पुढे १९८८ मध्ये सत्यशोधक समाजाचे सदस्य धार्मिक कर्मकांडात सहभागी होतात म्हणून सत्यशोधक समाजाच्या धार्मिक वर्तनावर टीकाही झाली.

धार्मिक बाबतीत काहीसा संभ्रमात असल्याचे उघड

याविषयी माहिती देताना डॉ. साळुंखे लिहितात, “सत्यशोधक समाजाच्या स्थापनेनंतर काही काळात सत्यशोधक समाजाचे सभासद धार्मिक बाबतीत काहीसा संभ्रमात असल्याचे लवकरच आढळून येऊ लागले. काही सभासदांनी तर विविध प्रकारचे धार्मिक विधी केल्याच्या बातम्या येऊ लागल्या. गंध लावणे, पुजा करणे, जानवी घालणे, मंगलाष्टके म्हणणे इत्यादी बाबतीत परस्परविरुद्ध मते मांडली जाऊ लागली आणि एक प्रकारचा गोंधळ निर्माण झाला.”

“धर्मासारख्या महत्त्वाच्या गोष्टीत धरबंद नसणे लोकांच्या नाशास कारण”

विशेष म्हणजे दीनमित्र या वृत्तपत्रातही याबाबत टीका होऊ लागली. याबाबत धनंजय कीर यांनी पूर्वोक्त महात्मा जोतीराव फुले या पुस्तकात माहिती दिली आहे. यानुसार, वृत्तपत्रात लिहिलं गेलं, “हा विषय हाती घेण्याचे कारण कोणाचा कोणाशी मेळ नसल्यामुळे लोक याबद्दल फार कुरकुरत आहेत. त्यांची ती कुरकूर थट्टेवारी नेण्याजोगी आहे, असे कोण म्हणेल? फार कशाला, सारच पुरे आहे. थोड्यात उमजावे. धर्मासारख्या महत्त्वाच्या गोष्टीत धरबंद नसणे लोकांच्या नाशास कारण आहे.”

“धर्मविषयक विचारांना आचरणसुलभ रुप देण्यासाठी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तक”

अशा संक्रमणाच्या काळात महात्मा फुलेंना सत्यशोधक समाजाच्या धार्मिक भूमिकेची स्पष्ट मांडणी करण्याची गरज वाटली. “प्रस्थापित धर्मव्यवस्थेला सुरुंग लावण्याचे काम त्यांनीच सुरू केले असल्यामुळे कल्याणकारक अशी पर्यायी व्यवस्था देण्याची जबाबदारी त्यांचीच होती. स्वाभाविकच, आपल्या धर्मविषयक विचारांना एक विधायक आणि आचरणसुलभ रुप देण्यासाठी त्यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तकाचं काम हाती घेतलं,” असं डॉ. साळुंखे यांनी नमूद केलं.

उजवा हात निकामी, डाव्या हाताने ‘सार्वजनिक सत्यधर्म’ पुस्तकाचे लेखन

याच काळात फुलेंना अर्धांगवायूचा झटका आला. त्यात त्यांचा उजवा लिहिता हात निकामी झाला. मात्र, अशाही परिस्थितीत महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाला वैचारिक दिशा देण्यासाठीचं आपलं चिंतन सुरूच ठेवलं. तसेच सत्यशोधक समाजाच्या सदस्यांमध्ये वैचारिक गोंधळ राहू नये म्हणून त्यांनी प्रकृती खराब असतानाही आपल्या डाव्या हाताने ‘सार्वजनिक सत्यधर्म’ हे पुस्तक लिहिलं.

“सर्व मानवांच्या हितार्थ ग्रंथ रचला”

महात्मा फुलेंनी आजारपणात त्रास होत असतानाही सत्यशोधक समाजाला वैचारिक दिशा मिळावी म्हणून प्रयत्न केले. या प्रयत्नांविषयी त्यांचा मुलगा यशवंत यांनी ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत माहिती दिली आहे. हे पुस्तक फुलेंच्या निधनानंतर प्रकाशित झाले. यात यशवंत लिहितात, “रोग फार भयंकर असल्यामुळे त्यांना अनिवार त्रास भोगावे लागले. थोडे बरे वाटल्यावर निरुद्योगी राहणे इष्ट न वाटून त्यांनी शूद्रादी-अतिशूद्रांसह एकंदर सर्व मानवांच्या हितार्थ ग्रंथ रचण्यास प्रारंभ केला.”

“लिहिण्याचे मुख्य साधन जो उजवा हस्त तोच पक्षघाताने निरुद्योगी झाला. त्यामुळे त्यांस थोडे दुःख झाले. तथापि ईश्वरेच्छा म्हणून धैर्य न सोडता आपल्या डाव्या हस्ताने व अत्यंत विचाराने ‘सार्वजनिक सत्यधर्म’ नावाचे पुस्तक तयार केले,” असंही यशवंत यांनी नमूद केलं.

हे पुस्तक अर्धे छापून झाले होते तेव्हाच बिघडलेल्या प्रकृतीमुळे जोतिबा फुले यांचा मृत्यू झाला. यानंतर फुले दाम्पत्याने दत्तक घेतलेल्या आणि पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या यशवंतराव या त्यांच्या मुलाने हे पुस्तक १८९१ मध्ये प्रकाशित केलं. या पुस्तकाच्या छपाईचा खर्च जोतिबा फुले यांचे मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी उचलला होता.

हेही वाचा : Blog : महात्मा फुले यांचा सत्यशोधक विवाहाचा विचार काय आहे?

‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकात नेमकी काय मांडणी?

जोतिबा फुले यांनी आपल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकात माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत होणाऱ्या कर्मकांडाची चिकित्सा केली. यात एकूण २८ विषयांवर फार तपशीलाने मांडणी केली. यात जातीभेद, पाप, पुण्य, धर्म, नीति, तर्क, दैव, आकाशातील ग्रह, जन्म, मृत्यू, स्वर्ग अशा विविध विषयांवर भूमिका मांडली आहे. “ईश्वर म्हणजे निर्मिक एकच असून आपण सर्व त्या निर्मिकाची सारखीच अपत्ये आहोत. सर्व मानवप्राणी एकच आहे. गुणवत्ता कोण कोणत्या जातीत/धर्मात जन्मला यावर ठरत नाही, तर वर्तन आणि कृतीवर अवलंबून असते,” असा विचार या पुस्तकात ठेवण्यात आला.

सत्यशोधक समाजाचे लग्नविषयक विचार काय?

‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकात गणपतराव आणि जोतीराव या दोघांमधील संवादाच्या स्वरुपात लग्न म्हणजे काय इथंपासून तर लग्न ठरवताना कोणते गूण पाहावे इथपर्यंत फुलेंनी मांडणी केली.

यात महात्मा फुले म्हणतात, “अनेक मुलींचे आई-वडील आपली मुलगी खाऊन-पिऊन सुखी राहील, मजा करेल या आशेने तिची संमती घेतल्याशिवाय तिला श्रीमंताची सून करून देतात. अनेक मुलांचे आई-वडील आपला मुलगा खाऊन-पिऊन सुखी राहील, मजा करेल या आशेने मुलाची संमती घेतल्याशिवाय त्याला राजेरजवाडे यांचा जावई करून देतात. अनेक मुली मुलांच्या वर्तनाचा विचार न करता त्याच्या फक्त शौर्यावर भाळून त्याला आपला पती करतात, तर अनेक मुलं मुलींच्या स्वभावाचा विचार न करता फक्त मुलीच्या देखणेपणावर भाळून तिला पत्नी करतात.”

प्रचलित लग्नाची पद्धत आणि त्यातील त्रुटी दाखवत महात्मा फुले पुढे म्हणतात, “मुला-मुलींनी लग्न करताना आपल्या आई-वडिलांसह लहान-मोठे नातेवाईक आणि मित्रांचा सल्ला घेऊन स्वतः सारासार विचार करावा आणि मग वधू किंवा वराच्या किंवा सत्यशोधक समाजगृहात मानव पंचासमक्ष प्रतिज्ञा घेऊन लग्न करावं. यामुळे आपल्या निर्मिकास परमानंद होईल.”

लग्नासाठी महात्मा फुले यांनी ५ मंगलाष्टकं उदाहरणादाखल दिली आहेत. त्यातील २ वराची आणि ३ वधुची आहेत. त्यानंतर त्यांनी वर आणि वधुने घ्यायच्या प्रतिज्ञेचाही एक नमुना दिला आहे. तसेच लग्नात वधू-वराने नातेवाईक-मित्रांच्या भेटी घेतल्यानंतर शेवटी आनंदाने कोणत्याही धर्माची किंवा देशाची आवडनिवड न करता सर्व मानवबंधुंमधील पोरक्या मुला-मुलींना आणि अंध-अपंगांना आपल्या शक्तीनुसार दानधर्म करीत आपल्या घरी/गावी जावे असं सांगितलं.

सार्वजनिक सत्यधर्माच्या वैशिष्ट्याबद्दल डॉ. साळुंखे लिहितात, “सार्वजनिक सत्यधर्म या शब्दसमुहात धर्माला लावलेली ‘सार्वजनिक’ व ‘सत्य’ ही दोन्ही विशेषणे महत्त्वाची आहेत. फुल्यांचा धर्म वैदिक धर्माप्रमाणे विषमता, शोषण, कृत्रिमता इत्यादी असत्य मूल्यांवर आधारलेला नसून सत्यस्वरुपी आहे हे त्यातून सूचित होते.”