scorecardresearch

विश्लेषण : अल कायदाचा नवा प्रमुख कोण असणार? त्याची निवड कशी होणार?

अल कायदाचा प्रमुख कोण असणार? आणि त्याची निवड नेमकी कशी होणार? या स्पर्धेत अल-कायदाचे कोणते नेते आहेत? या सर्व प्रश्नांवरील हे खास विश्लेषण…

Osama-and-Ayman
लादेन व जवाहिरी

अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या कुख्यात अयमान अल-जवाहिरीला अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये हवाई (ड्रोन) हल्ल्यात ठार केलं. अल-जवाहिरी आणि ओसामा बिन लादेन यांनी अमेरिकेवरील ‘९-११’ च्या विनाशकारी दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. विशेष म्हणजे २ मे २०११ रोजी ‘अल कायदा’चा संस्थापक ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे अमेरिकेच्या गुप्त मोहिमेत ठार करण्यात आले. लादेनच्या मृत्यूनंतर त्याचा उत्तराधिकारी म्हणून जवाहिरीची ‘अल-कायदा’चा प्रमुख म्हणून निवड झाली होती. त्यामुळे आता ३० जुलैला जवाहिरीचा मृत्यू झाल्यानंतर अल कायदाचा प्रमुख कोण असणार? आणि त्याची निवड नेमकी कशी होणार? या स्पर्धेत अल-कायदाचे कोणते नेते आहेत? या सर्व प्रश्नांवरील हे खास विश्लेषण…

अल कायदाच्या प्रमुखपदासाठी अनेक दावेदार आहेत. यात चार जण आघाडीवर आहेत. यातील तीन जणांची नावं अल रहमान (Abd al-Rahman al-Maghribi), येझीद मेबारेक (Yezid Mebarek) आणि अहमद दिरिये (Ahmed Diriye) अशी आहेत. हे सर्व आफ्रिकन आहेत. चौथा व्यक्ती अल जवाहिरीप्रमाणेच इजिप्शियन आहे. त्याचं नाव सैफ अल-आदेल असं आहे. अल आदेलच या चौघांपैकी सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे.

कोण आहे सैफ अल-आदेल?

सैफ अल आदेल अल कायदाच्या सैन्याचा प्रमुख आहे. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर जवाहिरी प्रमुख होईपर्यंत आदेललाच काळजीवाहू अल कायदाचा प्रमुख म्हणून नेमण्यात आलं होतं. जगभरातील जिहादींमध्ये आदेल सर्वात अनुभवी सैनिक मानला जातो. तो माजी इजिप्शियन कमांडो आहे. तो त्याच्या निर्घृण कामाच्या पद्धतीसाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे तो उच्च शिक्षित आहे. उत्तम इंग्रजीही बोलू शकतो.

आदेल लादेनच्या सुरक्षेचा प्रमुखही होता. अल कायदाच्या वतीने विविध संघटना आणि देशांसोबत वाटाघाटी करण्याची जबाबदारीही त्याने पार पाडली आहे. यातूनच अल कायदा वेगवेगळ्या देशात व्यवसाय करून स्वतःला सुरक्षित करते.

अल रहमान कोण आहे?

अल रहमान अल मघरीबी अल जवाहिरीचा जवाई आहे. त्याचा जन्म मोरोक्कोत झाला. त्याने जर्मनीतून सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर तो अफगाणिस्तानला आल्याचं एफबीआयचं म्हणणं आहे. अफगाणिस्तानमध्ये आल्यानंतर त्याच्यावर अल कायदाच्या माध्यम विभागाची जबाबदारी देण्यात आली. ९/११ च्या हल्ल्यानंतर तो इराणला पळून गेला होता. या काळात त्याने इराण आणि पाकिस्तानमध्ये प्रवास केल्याचंही सांगितलं जातं. अमेरिकेने त्याच्या डोक्यावर ७ मिलियनच अमेरिकन डॉलरचं बक्षिस ठेवलं आहे.

येझीद मेबारेक कोण आहे?

येझिद मेबरेक अल कायदाचं जागतिक व्यवस्थापन करतो. त्याची अल कायदा आणि ड्रुकडेलला एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका होती. त्याने अल जवाहिरीच्या नेतृत्वात काम केलं आहे. ५३ वर्षीय मेबरेकला अबू उबायदाह युसूफ अल अनाबी नावानेही ओळखलं जातं. त्याच्या डोक्यावरही ७ मिलियनच अमेरिकन डॉलरचं बक्षिस ठेवण्यात आलं आहे.

अहमद दिरिये कोण आहे?

अहमद दिरिये सोमालियातील अल शबाबचा नेता आहे. त्याला अहमद उमर आणि अबू उबैदाह नावाने देखील ओळखलं जातं. २०१४ मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात त्याच्या संघटनेचा आधीचा प्रमुख मारला गेल्यानंतर अहमद दिरियेने संघटनेचं नेतृत्व केलं.

हेही वाचा : विश्लेषण: अमेरिकेने ठार केलेला अल जवाहिरी नेमका कोण होता? बाल्कनीत उभा असताना त्याचा खात्मा कसा करण्यात आला?

अल कायदाच्या प्रमुखाची निवड कशी होते?

जेव्हा लादेनचा मृत्यू झाला तेव्हा त्याच्यानंतर अल कायदाचा प्रमुख कोण असणार हे निवडण्यासाठी जवळपास सहा आठवड्यांचा कालावधी लागला होता. लादेनचा मृत्यू २ मे २०११ रोजी झाला आणि अल कायदाचा प्रमुख म्हणून अल जवाहिरीची अधिकृत घोषणा १६ जून २०११ ला झाली. जवाहिरीच्या निवडीच्या वेळी कुणाला निवडायचं यावर संघटनेत दोन गट पडले होते. शेवटी सैफ अल आदेलचा सचिव हारुन फजूलने जवाहिरीच्या नावाला आपला विरोध काय ठेवला. त्यामुळे त्याला आपल्या जीवाला मुकावं लागलं, असं सौफान यांनी लिहून ठेवलं आहे.

या सर्व घडामोडींनंतर अल कायदाने अधिकृतपणे प्रसिद्धीपत्रक काढत लादेनचा उत्तराधिकारी म्हणून अल जवाहिरीच्या नावाची घोषणा केली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta explained on who will be the next leader of al qaeda pbs

ताज्या बातम्या