ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे नेतेपद आणि देशाचे पंतप्रधानपद यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. या पदासाठी आता केवळ दोन दावेदार आहेत. यात स्वतः ऋषी सुनक आणि दुसऱ्या उमेदवार म्हणजे परराष्ट्र सचिव लिज ट्रस. या दोघांपैकी बोरिस जॉन्सन यांचा उत्तराधिकारी कोण होणार याकडे संपूर्ण ब्रिटनचं लक्ष लागलं आहे. ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान झाल्यास ते ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान ठरतील. यासाठी आता त्यांना आणखी एक टप्पा पार करावा लागणार आहे. नेमका हा टप्पा काय आहे आणि सुनक पंतप्रधान होणार का यांचा आढावा घेणारं हे खास विश्लेषण.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी चॅन्सेलर असलेल्या ऋषी सुनक यांना चौथ्या फेरीत त्यांच्या पक्षातून ११८ मते मिळाली. पाचव्या फेरीतही सुनक यांची लोकप्रियता पाहायला मिळाली. त्यांना २० जुलैला झालेल्या या फेरीत १३७ मतं मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी लिज ट्रस यांना ११३ मतं मिळाली.

आता सुनक आणि ट्रस यांच्यातील लढाई अंतिम टप्प्यात आहे. यात दोघांनाही देशभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर आपलं धोरणं सांगत विश्वास संपादन करावा लागेल. तसेच त्यांना आश्वासन देत मतदानासाठी राजी करावं लागेल.

हेही वाचा : विश्लेषण : कोण आहेत ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार ऋषी सुनक? जाणून घ्या…

फेरीच्या लढतीत कायम राहण्यासाठी त्यांना आपल्या हुजूर पक्षाची १२० मते किंवा एकतृतीयांश खासदारांचा पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. या फेरीत दोन्ही उमेदवारांचे वादविवाद होतील. यात ते उपस्थित पक्षाच्या सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देतील. तसेच आपली धोरणं मांडतील. गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, या फेरीत अशाप्रकारे देशभरात एकूण १२ ठिकाणी कार्यक्रम होतील. यातील पहिली सभा २८ जुलैला लीड्स येथे होणार आहे.

सर्व सभांनंतर हुजूर पक्षाचे अंदाजे १ लाख ६० हजार सदस्य या दोन उमेदवारांपैकी आपल्या पसंतीचा उमेदवार निवडतील. हे मतदान २ सप्टेंबरला होईल. मतदान ऑनलाईन पद्धतीने किंवा पोस्टाने देखील करता येणार आहे. यासाठी १ ऑगस्ट मतपत्रिकांची व्यवस्था केली जाणार आहे.

ऋषी सुनक यांचा जन्म

ऋषी सुनक यांचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. मात्र, त्यांचे वडील यशवीर यांचा जन्म केनियामध्ये झाला होता, तर आई उषा यांचा जन्म तंजानियामध्ये झाला होता. ऋषी यांच्या आजी-आजोबांचा जन्म ब्रिटिशकालीन पंजाबमध्ये झाला होता. १९६० मध्ये ते आपल्या मुलासोबत ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. १२ मे १९८० रोजी ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंडच्या साऊथॅम्पटनमध्ये झाला. तीन भाऊ बहिणींमध्ये ऋषी सगळ्यात मोठे आहेत.

ऋषी सुनक यांचे शिक्षण आणि कारकीर्द

भारतीय वंशाच्या ऋषी यांचा जन्म यूकेमधील साऊथॅम्प्टन येथे झाला. त्यांनी यूकेच्या विंचेस्टर कॉलेजमधून राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. तेथे त्यांनी तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्रात पदवी घेतली. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षणही घेतले. आपल्या शैक्षणिक काळात ते हुशार विद्यार्थी होते. ऋषी सुनक यांनी पदवीनंतर गोल्डमन सॅक्समध्ये काम केले आणि नंतर हेज फंड फर्म्समध्ये भागीदार बनले. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी अब्जावधी पौंडांची जागतिक गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी ब्रिटनमधील छोट्या उद्योगांना अर्थसहाय्य करते.

हेही वाचा : अन्यथा : घरातल्या घरातलं..

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एमबीए करतानाच ऋषी सुनक यांची भेट इन्फोसिसचे सह-संस्थापक आणि भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती यांच्याशी झाली. पुढे अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक यांनी लग्न केले. अक्षता मूर्ती ऋषी सुनक यांना कृष्णा आणि अनुष्का नावाच्या दोन मुली आहेत.

ऋषी सुनक यांचा राजकीय प्रवास

ऋषी सुनक २०१५ मध्ये यॉर्कशर येथील रिचमंड मतदारसंघात निवडून येत पहिल्यांदा संसदेत पोहोचले. त्यावेळी त्यांनी ब्रेक्झिटला पाठिंबा दिल्यामुळे पक्षात त्यांचे महत्व वाढत गेले. ऋषी यांनी तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात कनिष्ठ मंत्री म्हणून काम केले होते. त्यांच्याकडे हुजूर पक्षाचे उगवते नेतृत्व म्हणून पाहिले जाते. पक्षातील अनेक बडे नेते त्यांचे वारंवार कौतुक करताना पाहायला मिळाले आहे. ऋषी सुनक यांना क्रिकेट, फुटबॉल व्यतिरिक्त चित्रपट पाहण्याचीही आवड आहे. त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे त्यांना डिश ऋषी या टोपण नावानेही संबोधले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta explained on will rishi sunak become the uks first indian origin pm pbs
First published on: 24-07-2022 at 17:32 IST