लातूरच्या रेल्वे कोच निर्माण कारखान्याची घोषणा कधीची?
लातूरमधील बेरोजगारीवर उपाययोजना म्हणून रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना काढला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४च्या निवडणुकीआधी केली होती. त्यानंतर औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. लातूरमधील अतिरिक्त औद्याोगिक वसाहतीमध्ये हे काम सुरू झाले. पण रेल्वेचा एक डबा तयार केल्यानंतर हे काम पुढे सरकलेच नाही. तेव्हा या प्रकल्पातून लातूरमध्ये किमान ४० हजार रोजगार निर्माण होतील, असे सांगण्यात आले होते. आता या प्रकल्पातून १० हजार रोजगार निर्माण होतील आणि ते स्थानिकांना मिळतील अशी व्यवस्था केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. लातूरपासून १८ किलोमीटरवर ३५० एकरात हा रेल्वे कोच कारखाना उभारण्यात आला. २०२२ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ४०० वंदे भारत रेल्वे गाड्या करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. यातील काही गाड्या लातूरमध्ये तयार केल्या जातील असे सांगण्यात आले आहे.
अंमलबजावणीची काय स्थिती आहे?
लातूरच्या रेल्वे कोच कारखान्यातून ४०० पैकी १२० रेल्वे तयार केल्या जातील. प्रत्येक रेल्वेचे १६ डबे असतील. हा कारखाना चालविण्यासाठी तीन कंपन्या काम करत आहेत. किनेट रेल्वे सोल्युशन या कंपनीबरोबर १९२० रेल्वेचे डबे करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यांची किंमत ६.५ अब्ज डॉलर एवढी आहे. या कंपनीने तंत्रज्ञान व अन्य सहकार्यासाठी रशियाच्या ट्रान्समाश होल्डिंग या कंपनीबरोबर करार केले आहेत. लातूरमधील हा कारखाना जून २०२४ मध्ये या कंपनीकडे वर्ग करण्यात आला. या कराराचा कालावधी ३५ वर्षांचा आहे.
या कारखान्यात सध्या काय सुरू आहे?
लातूरच्या ‘एमआयसीएफ’ या कारखान्यात नमुन्यादाखल एक डबा तयार करण्यात आला. आता उत्पादन सुरू करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या कारखान्यात १६ प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यात प्रत्यक्षात डबा तयार करणारी यंत्रणा, विविध प्रकारची गोदामे, निर्माण मार्गिका, त्याच्या चाचण्या, डबा बांधून झाल्यानंतरची रंगशाळा असे घटक त्यात अंतर्भूत आहेत. या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच एक बैठक घेण्यात आली.
रोजगाराच्या संधी किती?
संपूर्ण मूल्य शृंखलेमध्ये १० हजार रोजगार निर्माण होतील तर लातूरमध्ये किमान एक हजार रोजगार होतील असे सांगण्यात आले आहे. रोजगाराच्या संधी वाढाव्यात यासाठी स्थानिक उद्याोजकांबरोबरच मराठवाड्यातील उद्याोजकही पुढाकार घेत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटोमोबाइल क्षेत्रातील अनेक कंपन्या काम करत आहेत. त्यांना रेल्वेने संधी दिली तर आवश्यक ती उत्पादने तयार होऊ शकतात. तशी कंत्राटे मिळविण्यासाठी आवश्यक त्या अटींमध्ये बदल केंद्र सरकारकडून व्हावा, अशी उद्याोजकांची मागणी आहे. तसेच स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करून देण्यासाठी आयटीआयमधील अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. तंत्रज्ञानसंपन्न मनुष्यबळ तयार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा निर्माण करण्याचा कार्यक्रम अधिक वेगवान केला जाईल, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले.
कारखान्यातून होणाऱ्या कोच निमिर्तीचा वेग काय असेल?
पहिल्या टप्प्यात २५० वंदे भारतचे डबे तयार होतील. त्यानंतर ४०० कोच तयार करण्यापर्यंतचा वेग वाढवला जाईल आणि तिसऱ्या टप्प्यात ७०० कोच निर्माण करण्यापर्यंतची तयारी करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. वंदे भारत रेल्वेस मिळणारा प्रतिसाद पाहता हा कारखाना वेगाने सुरू होईल, असा लातूरकरांना विश्वास वाटतो आहे.
या कामावर विरोधकांचे आक्षेप कोणते?
या प्रकल्पाचे आतापर्यंत चार वेळा उद्घाटन झाले. आता हा कारखाना रशियातील कंपनी चालवणार आहे. गेल्या काही वर्षांपासून आता रोजगार मिळेल असे आश्वासन सत्ताधारी देत आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणालाही रोजगार मिळालेला नाही, असा अरोप माजी आमदार धीरज देशमुख यांनी केला आहे. हा प्रकल्प व्हावा आणि तो लवकर व्हावा, अशा हालचाली दिसत नाहीत, असे आक्षेप होते. मात्र, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अनुषंगाने बैठक घेेतल्याने वंदे भारत निर्माण कारखाना सुरू होण्याचा वेग वाढला असल्याचा दावा केला जात आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि अश्विनी वैष्णव या दोन्ही मंत्र्यांकडून हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असून काम हाती घेण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी केल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षातील कामाचा वेग पाहून आता मनुष्यबळ विकासासाठीच्या हालचालींना प्रशासनाने प्राधान्य दिले आहे.