आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी स्थान मिळवलेल्या एका नवीन आंतरतारकीय पाहुण्याने जगभरातील खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्याच आठवड्यात खगोलशास्त्रज्ञांनी चिलीच्या ॲटलास दुर्बिणीतून पाहिलेली ही आंतरतारकीय वस्तू ही आतापर्यंत पाहिलेला सर्वांत जुना धूमकेतू असू शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. ‘3I/ATLAS’ या नव्या आंतरतारकीय वस्तूविषयी…
खगोलशास्त्रज्ञांना काय आढळून आले?
खगोलशास्त्रज्ञांना १ जुलै २०२५ रोजी चिलीमधील ॲटलास सर्वेक्षण दुर्बिणीतून आकाशगंगेच्या मध्यभागी एक आंतरतारकीय पदार्थ आढळून आला, जो सूर्यापासून सुमारे ६७० दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे. खगोलशास्त्रज्ञांनी याचा अभ्यास केला आणि डरहम येथील रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या राष्ट्रीय बैठकीत त्याबाबत प्राथमिक निष्कर्ष सादर करण्यात आले. ‘3I/ATLAS’ असे नाव या नव्या आंतरतारकीय पदार्थाला देण्यात आले. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या पथकाने सुचवले आहे की, ‘3I/ATLAS’ नावाचा हा पदार्थ आपल्या सौरमालेपेक्षा तीन अब्ज वर्षे जुना असू शकतो. आपल्या सौरमालेच्या पलीकडून आलेला एखादा पदार्थ शोधण्याची ही तिसरी वेळ आहे.
शास्त्रज्ञांचे मत काय?
हा गूढ आंतरतारकीय पदार्थ आतापर्यंत ज्ञात सर्वांत जुना धूमकेतू असू शकतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. या पदार्थाच्या वेगाच्या आधारे, ऑक्सफर्ड विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ मॅथ्यू हॉपकिन्स सांगतात की, हा पदार्थ सात अब्ज वर्षांहून अधिक जुना असू शकतो आणि तो आतापर्यंतचा सर्वात उल्लेखनीय आंतरतारकीय पाहुणा असू शकतो. सध्या तो फक्त खूप शक्तिशाली दुर्बिणींनीच दिसतो आणि पृथ्वीपासून गुरू जितक्या अंतरावर आहे, तितक्या अंतरावर तो आहे. हॉपकिन्स यांनी असे मत व्यक्त केले की, या पदार्थाची उत्पत्ती आकाशगंगेच्या ‘जाड डिस्क’मध्ये झाली असावी. हा प्राचीन ताऱ्यांचा समूह आहे जो सूर्य आणि बहुतेक तारे ज्या भागात आहेत त्या क्षेत्राच्या वर आणि खाली कक्षेत फिरतो. ‘3I/ATLAS’बाबत आणखी निष्कर्ष काढण्यासाठी शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत.
‘3I/ATLAS’ची वैशिष्ट्ये काय?
‘ओमुआमुआ’ आणि ‘बोरिसोव्ह’ यांनंतर आढळलेला हा तिसरा आंतरतारकीय पदार्थ आहे. त्याशिवाय आतापर्यंत आढळलेला सर्वात मोठा पदार्थ आहे. याचा व्यास अंदाजे १० ते ४० किलोमीटर आहे आणि तो ताशी २,००,००० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने प्रवास करतो. सूर्यमालेच्या बाहेरून येणारा तिसरा आंतरतारकीय पदार्थ आहे, जो आपल्या वैश्विक परिसराला ओलांडताना आढळला आहे. त्याच्यापासून पृथ्वीला कोणताही धोका नाही, कारण तो २४० दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त सुरक्षित अंतर राखून आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. याच्या अभ्यासामुळे आपल्याला इतर तारा प्रणालींमधील वस्तूंची रचना आणि उत्क्रांती समजून घेता येणार आहे.
‘3I/ATLAS’ कसा तयार झाला असावा?
खगोलशास्त्रज्ञांचा विश्वास आहे की, ‘3I/ATLAS’ हा कदाचित एखाद्या जुन्या ताऱ्याभोवती तयार झाला असेल, त्यामुळे तो भरपूर पाण्याच्या बर्फापासून बनलेला आहे. याचा अर्थ असा की या वर्षाच्या अखेरीस सूर्याजवळ येताच, सूर्याची ऊर्जा त्या वस्तूच्या पृष्ठभागावर उष्णता निर्माण करेल, ज्यामुळे बाष्प आणि धूलिकणांचे ज्वाला निर्माण होतील. त्यामुळे चमकणारी शेपटी तयार होऊ शकते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. त्यामुळेच तो जुना धूमकेतू असू शकतो, असा अंदाज बांधण्यात आला आहे. संशोधकांनी हॉपकिन्स यांनी विकसित केलेल्या मॉडेलचा वापर करून त्यांचे निष्कर्ष काढले. ‘‘हा धूमकेतू आपण यापूर्वी कधीही जवळून पाहिलेला नाही अशा आकाशगंगेच्या भागातून आलेला आहे,’’ असे अभ्यासाचे सह-लेखक प्रोफेसर क्रिस लिंटॉट म्हणाले. हा धूमकेतू सौरमंडळापेक्षा जुना असण्याची शक्यता दोन तृतीयांश आहे आणि तेव्हापासून तो आंतरतारकीय अवकाशातून फिरत आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
sandeep.nalawade@expressindia.com