ई-२०’ म्हणजेच २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांवर दुष्परिणाम होत असल्याच्या तक्रारी येत असतानाच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या वादामागे पेट्रोल लॉबीचा हात असल्याचा दावा केला आहे.

गडकरींचा दावा काय?

नितीन गडकरी यांनी नुकतेच एका कार्यक्रमात ई-२० पेट्रोलवरून निर्माण झालेल्या वादावर भाष्य केले. पेट्रोल लॉबी श्रीमंत असून, त्यांच्याकडून समाजमाध्यमावर ई-२० विरोधात जनमत तयार केले जात आहे, असा दावा गडकरींनी केला. देशाला दरवर्षी जीवाश्म इंधनाच्या आयातीवर २२ लाख कोटी रुपये खर्च करावे लागतात, याकडेही गडकरींनी लक्ष वेधले. आगामी काळात इथेनॉलमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील, असे सूतोवाचही त्यांनी केले.

वाहनांवर काय परिणाम?

देशात एप्रिल २०२३ नंतर उत्पादित झालेल्या वाहनांची रचना ई-२० पेट्रोलवर धावू शकतील, अशी आहे. त्यामुळे ई-२० पेट्रोलचा वापर करण्यासाठी या वाहनांमध्ये कोणताही बदल अथवा सुधारणा करावी लागणार नाही. त्याचबरोबर या पेट्रोलवर ही वाहने पूर्ण क्षमतेने काम करू शकतील. सध्या ई-२० पेट्रोलचा वापर करणाऱ्या वाहनांवर दुष्परिणाम होत आहेत. गेल्या काही महिन्यांत या इंधनामुळे वाहनांची कामगिरी खालावण्याबरोबरच इंधन कार्यक्षमता कमी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. इथेनॉलमिश्रित इंधनामुळे प्रामुख्याने वाहनाचे इंजिन आणि इतर भागांवर परिणाम होतो. वाहन वारंवार बंद पडते आणि प्लास्टिकचे भाग खराब होतात. समाजमाध्यमांवर या संदर्भातील तक्रारी मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत.

सरकारचा दावा काय?

सरकारने ई-२० हे अधिक पर्यावरणपूरक इंधन असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर ई-१० पेट्रोलच्या तुलनेत ई-२० मुळे कार्बन उत्सर्जनात सुमारे ३० टक्क्यांपर्यंत घट होते. यातून देशाचे खनिज तेल आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. इथेनॉलमध्ये पेट्रोलच्या तुलनेत ऑक्टेनचे प्रमाण अधिक आहे. यामुळे आधुनिक वाहन इंजिनांसाठी हे पेट्रोल अधिक चांगले आहे, असा सरकारचा दावा आहे. भारताने २०१४ पासून इथेनॉलमिश्रित इंधनामुळे कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन ७.३६ कोटी टनाने कमी केले आहे. सरकारी अंदाजानुसार ई-२० इंधनाच्य़ा वापरामुळे चालू वर्षात सरकारच्या ४३ हजार कोटी रुपयांच्या निधीची बचत होणार आहे. तसेच, यामुळे या वर्षी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ४० हजार कोटी रुपयांची भर पडण्याची शक्यता आहे.

मायलेजमध्ये घट?

इथेनॉलची ऊर्जा घनता पेट्रोलपेक्षा कमी आहे. त्यामुळे पेट्रोलच्या तुलनेत इथेनॉलमुळे वाहनाच्या इंधन कार्यक्षमतेत म्हणजेच मायलेजमध्ये काही प्रमाणात घट होऊ शकते. ई-१० वर चालू शकणाऱ्या चारचाकी वाहनांच्या मायलेजमध्ये एक ते दोन टक्के घट होते, तर ई-२० वर चालू शकणाऱ्या चारचाकी वाहनांच्या मायलेजमध्ये तीन ते सहा टक्के घट होते. वाहननिर्मिती कंपन्यांकडून वाहनांचे उत्पादन करतानाच याबाबत पावले उचलून इंजिनात सुधारणा करण्यात येत आहेत. याचबरोबर वाहनांमध्ये ई-२० पूरक साहित्याचा वापरही केला जात आहे, असे केंद्रीय पेट्रोलिअम मंत्रालयाचे म्हणणे आहे. इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा स्वस्त असले, तरी त्याचे मिश्रण करणे आणि पायाभूत सुविधा अद्यायावत करणे या खर्चामुळे इथेनॉलमिश्रित पेट्रोलची किंमत सध्या तेवढीच राहते.

वाहन विम्यावर परिणाम?

देशात धावणाऱ्या मोटारीतील दहापैकी तब्बल नऊ मोटारी ई-१० पेट्रोलवर चालणाऱ्या आहेत. यामुळे ई-२० पेट्रोलमुळे इतरही समस्या निर्माण होणार आहेत. भारतात साधारणपणे चुकीच्या इंधन वापरामुळे होणाऱ्या वाहनाच्या नुकसानीला विम्याचे संरक्षण नसते. त्यामुळे वाहनाचे इंजिन ई-२० पूरक नसेल आणि त्या इंधनाचा वापर झाल्यामुळे वाहनाचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई दिली जाणार नाही. कारण चुकीचे इंधन वापरल्यामुळे वाहनाचे नुकसान झाल्याचे तपासणीत स्पष्ट होऊ शकते. तसे झाल्यास विमा कंपनी विम्याचा दावा नाकारू शकते अथवा रक्कम कमी करू शकते. काही विमा कंपन्या चुकीच्या इंधनाचा वापर ही मोठी चूक असल्याचे मानतात. त्यामुळे त्यांच्याकडून भरपाई मिळणे अथवा त्याविरोधात दाद मागणेही ग्राहकांना शक्य होणार नाही.