Vasai-Virar Flood Situation: वसईतील पूरसंकट आता दूर होण्याऐवजी दिवसेंदिवस अधिक भीषण होऊ लागले आहे. अनियंत्रित आणि बेसुमार अनधिकृत बांधकामांनी वसईवर संकट येणार असल्याची चाहूल दिली होती. ही भीती खरी ठरू लागली आहे. या मानवनिर्मित जलसंकटामुळे चौफेर जलकोंडी होत आहे.
वसई, विरार शहराची रचना कशी आहे?
वसई, विरार शहर हे सागर आणि डोंगर या दरम्यान वसलेले आहे. यामुळे एकंदरीत शहराचा आकार बशीसारखा असल्याचे म्हटले जाते. उत्तरेला वैतरणा आणि दक्षिणेला वसई खाडी तर पश्चिमेला समुद्र आहे. पूर्वी डोंगर उतारावरून येणारे पाणी थेट खाडीत जात होते. सद्य:स्थितीत खाडी, नैसर्गिक नाले या भागांत झालेला बेकायदा मातीभराव, उभी राहिलेली बांधकामे यामुळे हे पाणी थेट शहरात येत आहे.
दरवर्षी पूरस्थिती का निर्माण होते?
वसई, विरार शहरांत मागील काही वर्षांपासून पूरस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. शहर नियोजनाचा असलेला अभाव, बेकायदेशीर बांधकामे, नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणे, पाणी निचरा होण्याच्या मार्गिका विकसित नसताना उभे राहणारे प्रकल्प अशा विविध कारणांमुळे वसईकर पूरसंकटात सापडू लागले आहेत. शहराच्या पश्चिम भागात आज जिथे ‘टाऊनशिप’ उभ्या राहिल्या आहेत तिथे काही वर्षांपूर्वी खाऱ्या जमिनी होत्या. समुद्राच्या भरतीच्या वेळी पाणी आतपर्यंत येत असे. तर पावसाळ्याच्या दिवसांत शहरातील पाणी या खाऱ्या जमिनीत साठत होते. त्यामुळे पाण्याचा निचरा अगदी सहज होत होता. सध्या मात्र पावसाची सुरुवात होताच वसईचा बहुतेक भाग पाण्याखाली जातो. यामुळे या भागातील जनजीवन सातत्याने विस्कळीत होत आहे.
पूरपरिस्थिती रोखण्यासाठी महापालिकेने काय केले?
वसईत २०१८ मध्ये पुराने हाहाकार उडविला होता. यासाठी पालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या सत्यशोधन समितींची नियुक्ती केली होती. या संस्थांनी वसईच्या भौगोलिकतेचा अभ्यास करून महापालिकेला अहवाल सादर केला होता. पावसाळ्यात शहरातील पाणी नैसर्गिक नाल्यांच्या वाटे खाडीत आणि समुद्रात निघून जायचे. मात्र शहरात मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे होऊ लागली. त्यासाठी नैसर्गिक नाले बुजविण्यात येत होते. नीरीने आपल्या अहवालात नैसर्गिक नाले नष्ट होत असल्याची बाब ठळकपणे नमूद केली होती. नैसर्गिक नाले खुले करणे आणि ते वाचविणे याची सूचना नीरी समितीने केली होती. मात्र नीरीच्या अहवालानंतरही नैसर्गिक नाले मोठ्या प्रमाणावर बुजविण्यात आले.
उपाययोजनांमुळे काय फरक पडला?
नीरी समितीने सुचवलेल्या शिफारशींचे काय झाले, असा प्रश्न नागरिक करतात. यावर उपाययोजना सुरू असल्याचे पालिकेकडून सांगण्यात येते. मात्र प्रत्यक्षात त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने समस्या जैसे थे आहे. नीरी व आयआयटी या संस्थेने सुचविलेल्या उपायोजनांपैकी आतापर्यंत पालिकेने काही ठिकाणी रस्त्यांची उंची वाढविली. विशेषत: एव्हरशाईन ते गोखिवरे रस्ता आणि सनसिटी ते गास रस्ता यांची उंची वाढविली मात्र त्याचा फारसा फरक पडलेला नसून शहरातील पूरस्थिती कायम राहिली आहे.
धारण तलाव का तयार झाले नाहीत?
शहरातील पाण्याचा निचरा सुयोग्य पद्धतीने व्हावा तथा पावसाचे पाणी शहरात साठून राहू नये यासाठी धारण तलाव विकसित करणे आवश्यक आहे. यासाठी नालासोपारा पश्चिमेकडे निळेमोरे, गोगटे सॉल्ट आणि नायगाव येथील सरकारी जागेत धारण तलाव विकसित करावे, असे संस्थांनी त्यांच्या अहवालात नमूद केले होते. त्यानुसार महापालिकेने जागा आरक्षित केल्या. त्यानंतर धारण तलाव विकसित करण्याचा निर्णय घेऊन धारण तलावांची खोली वाढविणे, त्यातील पाणी खाडीला मिळविण्यासाठी मार्गिका तयार करणे अशी कामे पालिकेतर्फे होणे अपेक्षित होते. मात्र, धारण तलावांसाठी जागा आरक्षित करण्यापलीकडे महापालिकेकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पावसाळा दरवर्षी येत असतो. त्यामुळे दूरगामी उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु असे करण्यामध्ये महापालिकेची उदासीनता दिसून येते.
भविष्यात पूरपरस्थितीचा धोका किती?
शहराची लोकसंख्या, नागरीकरण दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गृहसंकुले उभारली जात आहेत. हे करत असताना प्रशासनाकडून शहराची नैसर्गिक स्थिती लक्षात घेतली जात नाही. खारभूमी असलेल्या प्रदेशात शहरीकरणावर मर्यादा असायला हव्यात आणि प्रशासनाने पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवायला हवे. तसे न झाल्यास पावसाळ्याच्या दिवसात पाण्याचा निचरा न होता आज चार फूट पाणी साचते तेथे अधिक पाणी साचून भीषण पूरपरस्थिती निर्माण होऊ शकते, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.
पूर समस्येवर उपाय काय?
शहरात धारण तलावांची निर्मिती, पाणी जाण्याचे नैसर्गिक प्रवाह आणि नाले संरक्षित करणे तसेच खाडी किनारी करण्यात आलेले बेकायदा बांधकामे हटविणे, अनिर्बंध बांधकामांवर नियंत्रण मिळवणे, खाडी मार्गात असलेली तिवरांची झाडे कायदेशीर मार्गाने बाजूला करून अन्य ठिकाणी लागवड करणे, शहर वाढत असताना पावसाळ्याच्या दिवसांत पाण्याचा निचरा करण्यासाठी निजोजन करणे, खाऱ्या जमिनी आणि समुद्र यांचा विचार करून पर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवून विकास करणे तसेच शहरातील हरित पट्ट्यांचे संरक्षण करून तेथील वर्षानुवर्षे जुने पाणी जाण्याचे मार्ग, ओहोळ आणि मुख्य बावखले यांचे संवर्धन करणे, असे उपाय महापालिकेने करणे अपेक्षित आहे. पूरस्थितीचा विचार करता सध्या शहर धोकादायक पातळीवर आहे तेव्हा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून शहराला सुरक्षित करणे गरजेचे आहे.
