राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची शालेय स्तरावर अंमलबजावणी कशी केली जाणार?
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार शालेय शिक्षणाची पायाभूत, पूर्वमाध्यमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशी ५+ ३+३+४ अशी रचना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यात पूर्वप्राथमिक ते दुसरी हा पायाभूत स्तर (३ ते ८ वयोगट), तिसरी ते पाचवी हा पूर्वमाध्यमिक स्तर (८ ते ११ वयोगट), सहावी ते आठवी हा माध्यमिक स्तर (११ ते १४ वयोगट), तर नववी ते बारावी हा उच्च माध्यमिक स्तर (वयोगट १४ ते १८) असणार आहे. नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम करावा लागणार आहे. नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी २०२८-२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) तयार करण्यात आलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) २०२४, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४ यातील तरतुदी योग्य त्या बदलांसह टप्प्याटप्प्याने लागू होणार आहेत.
अभ्यासक्रम निर्मिती, पाठ्यपुस्तकांची निर्मिती कशी होणार?
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, तसेच राज्य अभ्यासक्रम आराखड्यांच्या आधारे राज्यासाठीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम तयार करण्यात येत आहे. नवीन अभ्यासक्रम पहिल्यांदाच लागू होणाऱ्या विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम एससीईआरटीने तयार करून तो आवश्यक त्या सर्व वर्षांमध्ये वापरावा. एनसीईआरटीने तयार केलेली पाठ्यपुस्तके राज्यासाठी आवश्यक बदल करून स्वीकारण्यात यावीत. पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान, शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक, आनंददायक आणि रंजक असणे, आवश्यक शिक्षण आणि तार्किक विचारसरणी वाढवण्यासाठी अभ्यासक्रमाचा मजकूर कमी करणे, अनुभवात्मक शिक्षण यांचा समावेश आवश्यक आहे. अंमलबजावणी वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय पाठ्यपुस्तके आवश्यक त्या सर्व माध्यमांत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाची (बालभारती) राहील. पाठ्यपुस्तकांना पूरक साहित्य, हस्तपुस्तिका, सेतू वर्ग साहित्य निर्मिती एससीईआरटी यांच्यामार्फत करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये एससीईआरटीचे संबंधित विभागप्रमुख, विषयतज्ज्ञ यांचा समावेश असावा. पाठ्यपुस्तके निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्तींची पूर्तता करणारी, अंमलबजावणीसाठी योग्य असल्याची पडताळणी एससीईआरटीने करावी. अंतिम केलेल्या पाठ्यपुस्तकांना शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समन्वय समितीची मान्यता घ्यावी. मान्यतेनंतरच पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करता येईल, असे नमूद करण्यात आले आहे.
मूल्यमापन, शालेय वेळापत्रक, तासिकांचे नियोजन कसे असेल?
शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनविषयक मार्गदर्शक सूचना एससीईआरटीने स्वतंत्रपणे द्याव्यात. त्यासाठी समग्र प्रगत पत्रकाचा आधार घ्यावा. दोन्ही अभ्यासक्रम आराखड्यात सुचवलेल्या दैनिक, साप्ताहिक, वार्षिक वेळापत्रकानुसार इयत्तानिहाय, विषयनिहाय निश्चित केलेल्या तासिकांची संख्या आणि कालावधी याची अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये करण्यात यावी. सत्र निश्चितीचा कालावधी हा प्राथमिक-माध्यमिक शिक्षण संचालकांनी एससीईआरटीच्या संचालकांच्या सल्ल्याने निश्चित करावा. द्वितीय सत्राअखेरचे संकलित मूल्यमापन, वार्षिक परीक्षा सत्रअखेरच घ्याव्यात. त्याचे वेळापत्रक आवश्यकतेनुसार प्राथमिक-माध्यमिक शिक्षण संचालकांनी एससीईआरटीचे संचालक यांच्या सल्ल्याने निश्चित करावे, असे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पहिलीपासून तिसऱ्या भाषेचे काय होणार?
यंदा पहिलीला नवा अभ्यासक्रम लागू करण्यात आला. मात्र, पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याचा निर्णय घेऊन शिक्षण विभागाने हिंदी विषय अनिवार्य केला. त्याला तीव्र विरोध झाल्यावर हिंदीची अनिवार्यता रद्द करून भारतीय भाषांचे पर्याय देण्याचे शिक्षण विभागाने जाहीर केले. मात्र, त्याच वेळी किमान २० विद्यार्थी असल्यासच हिंदीव्यतिरिक्त अन्य भारतीय भाषा शिकवण्यासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध केला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले. परिणामी, अप्रत्यक्षरीत्या हिंदी भाषा सक्तीची केली जात असल्याचा आरोप करून तिसऱ्या भाषेला पुन्हा तीव्र विरोध करण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून त्या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे समितीच्या अहवालानंतरच पहिलीपासून तिसऱ्या भाषेचे काय होणार, हे स्पष्ट होणार आहे.