How To Reduce Uric Acid: आपल्या शरीरात युरिक अॅसिड नावाचं एक नैसर्गिक द्रव्य तयार होतं. हे मूत्रपिंडांद्वारे बाहेर टाकलं जाणं आवश्यक असतं. पण काही वेळा मूत्रपिंड ते योग्य प्रकारे बाहेर टाकू शकत नाही आणि त्यामुळे शरीरात युरिक अॅसिड साचायला लागतं. अनेकांना हे माहीतच नसतं की, युरिक अॅसिड वाढलं तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे सांधेदुखी, थकवा, सूज अशा अनेक त्रासांना सुरुवात होते.
रुजुता दिवेकर यांचा सल्ला
प्रसिद्ध आरोग्य व आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत त्यांनी युरिक अॅसिडच्या परिणाम आणि उपचारांविषयी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी या व्हिडिओत, युरिक अॅसिड म्हणजे काय, ते शरीरावर कसं परिणाम करतं आणि ते नियंत्रणात ठेवण्यासाठी नेमकं काय करायला हवं, याबाबत अनेक लोक कशा प्रकारे चुकीच्या समजुती ठेवतात, याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठीच्या टिप्स
रुजुता म्हणतात, “युरिक अॅसिडचं प्रमाण नियंत्रणात ठेवायचं असेल तर जीवनशैलीत काही सोपे बदल करा.”
काय कमी करायचं?
- धूम्रपान आणि मद्यपान
- पॅकेज्ड फूड, डबाबंद किंवा झटपट तयार होणारं अन्न
- जेवणातील जास्त अंतर (उशीरा जेवणं)
- दीर्घकाळ बसून राहणं
कशाकडे लक्ष द्यायचं?
- पुरेशी आणि चांगली झोप घेणं
- घरगुती, ताजं आणि हलकं शिजवलेलं अन्न खाणं
- दिवसातून पुरेसं पाणी पिण्याची सवय लावणं
- नियमित व्यायाम करणं
युरिक अॅसिड म्हणजे काय?
आपल्या शरीरात रोज काही ना, काही रासायनिक प्रक्रिया सुरू असतात. या प्रक्रियेमुळे शरीराला उपयोगी घटक तयार होतात, पण त्याचबरोबर काही टाकवू पदार्थ (waste products) देखील तयार होतात. त्यापैकीच एक म्हणजे युरिक अॅसिड. हे युरिक अॅसिड प्युरिन (Purine) नावाच्या रसायनापासून तयार होतं. प्युरिन हा एक नैसर्गिक घटक आहे, जो आपल्या शरीरातील पेशींच्या (cells) विघटनामुळे तयार होतो. म्हणजेच आपल्या शरीरात जुन्या पेशी नष्ट होतात आणि नवीन पेशी तयार होतात. या प्रक्रियेदरम्यान प्युरिन तयार होतं आणि त्याच्यापासून युरिक अॅसिड तयार होतं.
शरीरातून युरिक अॅसिड बाहेर कसं जातं?
हे युरिक अॅसिड मूत्रपिंडांच्या (kidneys) मदतीने शरीरातून मूत्राद्वारे बाहेर टाकलं जातं. जर मूत्रपिंड योग्य प्रकारे काम करत असतील, तर युरिक अॅसिडचं प्रमाण सामान्य राहातं आणि काही त्रास होत नाही. पण, मूत्रपिंडांना हे युरिक अॅसिड बाहेर टाकायला अडचण येऊ लागली किंवा शरीरात खूप जास्त प्युरिन तयार होऊ लागलं, तर हे अॅसिड शरीरात साचतं, तेव्हा युरिक अॅसिड वाढलं, असं डॉक्टर सांगतात.
युरिक अॅसिडचं प्रमाण किती असावं?
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, स्त्रियांसाठी युरिक अॅसिडचं प्रमाण साधारणतः २ ते ६ mg/dL दरम्यान असतं. तर, पुरुषांसाठी ते थोडं जास्त म्हणजे ३ ते ७ mg/dL या दरम्यान असतं. हे प्रमाण या मर्यादेत असेल, तर काळजीचं कारण नसतं. पण जर यापेक्षा जास्त झालं, तर शरीरात त्याचा परिणाम दिसू लागतो. जसं की सांधे दुखणे, सूज येणे, थकवा, गाऊट (Gout) यांसारखे त्रास होवू लागतात.
कोणत्या सवयींमुळे युरिक अॅसिड वाढतं?
आरोग्यतज्ज्ञ रुजुता दिवेकर सांगतात, युरिक अॅसिड वाढण्यामागे काही नेहमीच्या, पण धोकादायक सवयी कारणीभूत असतात:
- धूम्रपान (Smoking): शरीरातील रक्तप्रवाह आणि श्वसनक्रिया कमकुवत होते, त्यामुळे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची गती मंदावते.
- मद्यपान (Alcohol): शरीरात प्युरिन आणि विषारी घटक वाढतात, ज्यामुळे युरिक अॅसिडचं प्रमाणही वाढतं.
- दीर्घकाळ बसून राहणे (Sedentary lifestyle): शरीराची हालचाल न केल्यामुळे चयापचय (metabolism) मंदावते आणि मूत्रपिंडांची कार्यक्षमता घटते.
या सवयींमुळे शरीराचं नैसर्गिक संतुलन बिघडतं आणि युरिक अॅसिड बाहेर टाकण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे हे घटक हळूहळू रक्तात साचतात आणि शरीरात त्रास निर्माण करतात.
युरिक अॅसिड वाढल्यावर काय खावं?
युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी शरीराला “थंडावा”, “पाणी” आणि “नैसर्गिक पोषण” देणारे पदार्थ खूप उपयुक्त ठरतात.
१. पाणी
दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी पिणं अत्यावश्यक आहे.
सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्या. त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्यं (toxins) बाहेर पडतात.
दुपारी किंवा उन्हाळ्यात गार नाही तर खोलीच्या तापमानाचं पाणी प्या.
पाण्यामुळे मूत्रपिंडांना (kidneys) युरिक अॅसिड बाहेर टाकायला मदत होते.
२. फळं
दररोज ताजी आणि हंगामी फळं खा.
सफरचंद, संत्रं, पेरू, कलिंगड, पपई, डाळिंब, द्राक्षं ही फळं युरिक अॅसिड कमी करण्यात मदत करतात.
केळं विशेषतः सूज (inflammation) आणि सांधेदुखी कमी करतं.
ही फळं शरीरात पाण्याचं प्रमाण टिकवतात आणि नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स देतात.
३. दूध, दही आणि ताक
हे तिन्ही पदार्थ युरिक अॅसिड कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
दररोज एक वाटी दही किंवा ताकाचा एक ग्लास जरूर घ्या.
दह्यात मनुका (किशमिश) घालून खाल्ल्यास ते शरीरातील सूज कमी करतं.
ताक शरीरात पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवतं आणि पचनक्रिया सुधारतं.
दूध आणि दह्यामध्ये असलेले प्रोटीन आणि कॅल्शियम स्नायू आणि सांधे मजबूत ठेवतात.
४. सुकामेवा
बदाम, अक्रोड, पिस्ते, मनुका आणि अंजीर हे सगळे मर्यादित प्रमाणात खा.
हे शरीराला चांगले फॅट्स (healthy fats) देतात, ज्यामुळे सांधे लवचिक राहतात.
पण अतिसेवन टाळा; दिवसातून ४-५ बदाम किंवा अर्ध अक्रोड पुरेसं आहे.
५. डाळी आणि मोड येणारी कडधान्ये
डाळी, मुग, चवळी, हरभरा हे पदार्थ भिजवून, मोड आणून आणि मग शिजवून खाल्ले तर फारच फायदेशीर ठरतात. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन C आणि फायबर जास्त असतात, त्यामुळे शरीरातील युरिक अॅसिड कमी करण्यास मदत होते. कडधान्याचं अतिसेवन (विशेषतः मसालेदार स्वरूपात) टाळा.
युरिक अॅसिड वाढल्यावर काय खाऊ नये?
युरिक अॅसिड वाढवणारे पदार्थ प्रामुख्याने प्रोसेस्ड (पॅकेज्ड) फूड जड आणि रसायनयुक्त असते.
- १. केचप
- बाजारात मिळणाऱ्या टोमॅटो केचपमध्ये साखर, मीठ आणि रसायनं मोठ्या प्रमाणात असतात.
- हे घटक शरीरात सूज वाढवतात आणि युरिक अॅसिडचं प्रमाण वाढवतात.
- २. पॅकेज्ड फूड किंवा टेट्रा पॅकमधील फळरस
- अशा ज्यूसमध्ये साखर, प्रिझर्व्हेटिव्ह्ज आणि कृत्रिम फ्लेवर्स असतात.
- हे शरीराचं तापमान आणि रक्तातील प्युरिनचं प्रमाण वाढवतात.
- त्यामुळे युरिक अॅसिड वाढतं आणि शरीरात सूज येऊ शकते.
व्यायाम
रुजुता सांगतात, “नियमित व्यायाम केल्याने युरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मोठी मदत होते.”
- प्रत्येक ३० मिनिटं बसल्यानंतर किमान ३ मिनिटं उभं राहा.
- दररोज किमान एक मजला चढा, यामुळे शरीर सक्रिय राहते.
- आठवड्यात किमान दोन दिवस ‘स्ट्रेंथ ट्रेनिंग’ करा.
- आपल्या दिनक्रमात स्ट्रेचिंग आणि योगासने यांचा समावेश करा.
- “जर तुम्हाला नीट झोप येत नसेल, तर झोपायच्या आधी हळदीचं दूध प्या आणि मोबाईल किंवा इतर गॅजेट्सपासून दूर राहा,” असा सल्ला त्यांनी दिला.
