हृषिकेश देशपांडे
मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी अटीतटी आहे. कोण जिंकेल, हे जनमत चाचण्यांमधूनही स्पष्ट होत नाही. दोघांच्या मतांमध्ये एक ते दीड टक्क्यांचा फरक आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राज्यातील विधानसभेच्या २३० जागांसाठी या दोन राष्ट्रीय पक्षांमध्येच सामना आहे. येथे राष्ट्रीय पातळीवरील दोन्ही आघाडीतील इतर घटक पक्षांचे अस्तित्वही नाही. भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील कोणताच पक्ष येथे नाही तर विरोधकांच्या इंडिया आघाडीतील आम आदमी पक्ष बळ आजमावत आहे, मात्र त्यांची ताकद नगण्य आहे. हा पक्ष रिंगणात राहणार काय, हा औत्सुक्याचा मुद्दा आहे. या पक्षाचे सर्वेसर्वा व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकताच राज्याचा दौरा केला. त्यांनी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांना लक्ष्य केले. या रणधुमाळीत देशवासीयांचे लक्ष आहे ते राज्याच्या राजकारणातील दोन जोड्यांवर. त्यातील पहिली म्हणजे भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना शिव-ज्योती जोडी म्हणून ओळखले जाते. हे पक्षाची नौका बहुमतापर्यंत नेणार काय, त्यांचा सामना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री कमलनाथ तसेच ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह या जोडीशी आहे.
शिवराजमामांना पर्याय नाही…
मध्य प्रदेशात नेतृत्व बदलाच्या वावड्या उठत होत्या. मात्र शिवराजसिंह चौहान ऊर्फ मामाजी यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही हे भाजप श्रेष्ठींनी जाणले. त्यांच्या पदाला कोणताही धोका नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट संकेत देण्यात आले. राज्यातील निवडणुकीची सूत्रे जरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती असली, तरी शिवराजसिंह चौहान यांच्या चेहऱ्यावरच भाजप निवडणुकीला सामोरा जात आहे. चौहान यांच्या तोलामोलाचा नेता भाजपकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत असणारे चेहरे एखाद्या विभागापुरते मर्यादित आहेत. ६४ वर्षीय शिवराजसिंह चौहान मध्य प्रदेशच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. २००५ ते २०१८ व पुन्हा २०२० पासून त्यांच्याकडे राज्याची धुरा आहे. आता राज्यात २ ते २४ सप्टेंबर दरम्यान सर्व २३० मतदारसंघातून ते जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. राज्यातील प्रमुख पाच ठिकाणांहून ही यात्रा सुरू होणार असून, २५ सप्टेंबरला भोपाळला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होणार आहे. सुमारे १२ हजार किमी इतका प्रवास ही यात्रा करणार आहे.
आप पक्ष बिहारमध्ये निवडणूक लढवणार, विरोधकांच्या आघाडीत बिघाडी?
रणनीतीत बदल
भाजपचे देशात सर्वात मजबूत संघटन मध्य प्रदेशात आहे. मात्र गेल्या निवडणुकीत तीव्र सत्ताविरोधी लाटेमुळे काँग्रेसने बाजी मारली होती. मुख्यमंत्री म्हणून चौहान यांचाच चेहरा किती काळ पुढे आणणार, हा प्रश्न विचारला जात होता. सातत्याने एकच चेहरा दिल्यावर सत्ताविरोधी नाराजी वाढते हे हेरून भाजपने काही धोरणे बदलली. डबल इंजिनचा सातत्याने नारा देत परदेशी गुंतवणूक राज्यात अधिक आकर्षित करण्यावर भर दिला. तर दुसरीकडे गेल्या तीन वर्षांत विविध समाज घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवल्याने चौहान यांच्या सरकारची प्रतिमा काही प्रमाणात चांगली झाली. कर्नाटकातील पराभवानंतर भाजपने धोरण बदलत काही उमेदवार जाहीर केले. हे बहुसंख्य गेल्या वेळी पराभूत झालेल्या जागांवरील उमेदवार आहेत. त्यांचा मतदारसंघात संपर्क वाढावा हे यामागे धोरण. राज्यात बहुरंगी लढत भाजपला लाभदायक ठरेल. पूर्वी बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेश सीमेलगतच्या मतदारसंघांमध्ये काही प्रमाणात प्रभावी होता. मात्र आता त्यांची फारशी ताकद दिसत नाही. आम आदमी पक्षाने काही उमेदवार दिले तर काँग्रेससाठी अडचण होऊ शकते.
भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी
काँग्रेसने कर्नाटकच्या निकालातून धडा घेत मध्य प्रदेशच्या प्रचारात भ्रष्टाचाराचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे. धार्मिक मुद्द्यांवर प्रचार केल्यास ते भाजपला फायदेशीर ठरेल हे काँग्रेस नेते जाणून आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या भाषणांचा सारा भर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर आहे. कमलनाथ हे मुरब्बी नेते आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपला छिंदवाडा हा मतदारसंघ गमावलेला नाही. पक्ष नेतृत्वाने कमलनाथ यांना मोकळीक दिली आहे. त्यांच्या जोडीला ७६ वर्षीय राज्यसभा सदस्य असलेले दिग्विजय सिंह हे प्रचार करत आहेत. दिग्विजय यांचा समविचारी पक्ष संघटनांमध्ये उत्तम संपर्क आहे. त्यामुळे थेट काँग्रेसशी संबंध नसलेले मात्र भाजपविरोधात भूमिका घेणाऱ्या अनेक पक्ष तसेच छोट्या संघटनांना अप्रत्यक्षपणे काँग्रेसच्या प्रचारात जोडण्याचे काम ते करू शकतात. राज्याची धुराही यापूर्वी त्यांनी दीर्घकाळ सांभाळली आहे. मध्य प्रदेशात भाजपची शिव-ज्योती जोडी प्रभावी ठरते की काँग्रेसची कमलनाथ-दिग्विजय ही जोडी प्रभावी ठरते याचे कुतूहल आहे.
ज्योतिरादित्य यांचे कसब
ज्योतिरादित्य शिंदे यांनी २०२०मध्ये बंड करत काँग्रेसचे सरकार पाडले. अलीकडे अनेक शिंदे समर्थक आमदार पुन्हा काँग्रेसमध्ये परतत असल्याचे चित्र आहे. थोडक्यात भाजपमध्ये आलेल्या ज्योतिरादित्य समर्थकांमध्ये उमेदवारीवरून अस्वस्थता आहे. अशा वेळी ज्योतिरादित्य यांचे कसब पणाला लागले आहे. ग्वाल्हेर राजघराण्यातील ज्योतिरादित्य यांना भाजपने केंद्रात मंत्रिपद दिले, महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवली. आता ५२ वर्षीय ज्योतिरादित्य यांना भाजपला पुन्हा सत्तेत आणून त्याची परतफेड करावी लागेल. मध्यंतरी ज्योतिरादित्य यांचे नाव राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी घेतले जात होते. मात्र पक्षाने शिवराजमामाच मुख्यमंत्री राहतील हे स्षष्ट केले असले तरी, पुन्हा भाजपची सत्ता आल्यास नेता कोण, याचे उत्तर मिळत नाही. ज्योतिरादित्य यांना त्यांच्या ग्वाल्हेर या प्रभावक्षेत्राबरोबरच राज्यात इतर विभागातून मेहनत घेऊन पक्षाचे उमेदवार निवडून आणावे लागतील तरच पक्षनेतृत्वाचा त्यांच्यावर विश्वास बसेल.