भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस तसेच समाजवादी पक्षाखालोखाल लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे सदस्य आहेत. त्यांचे एकूण २९ खासदार असून, गेल्या म्हणजे २०१९ ते संख्याबळाबाबत तिसऱ्या क्रमांकावर होते. पश्चिम बंगालमध्ये सत्तेत असलेला प्रबळ प्रादेशिक पक्ष अशी त्याची ओळख. खासदारांमधील गटबाजीने तो अधिक चर्चेत आला. लोकसभेतील पक्षाचे प्रतोद कल्याण बॅनर्जी यांनी पद सोडले. याखेरीज गटनेतेपदी प्रकृतीच्या कारणास्तव सुदीप बंडोपाध्याय यांच्या जागी पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांची वर्णी लावण्यात आली.
कल्याण बॅनर्जी विरुद्ध महुआ मोईत्रा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली. त्यात राज्यसभेतील खासदारांच्या कामगिरीचे ममतांनी कौतुक केले. मात्र लोकसभा सदस्यांत काही त्रुटी असल्याचे त्यांनी नमूद केल्याचे सांगितले जाते. त्यांची ही टिप्पणी ज्यांच्यावर समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे होती अंगुलीनिर्देशच असल्याचे उघड होते. अर्थात ममता प्रत्यक्षात काय म्हणाल्या हे खासदारांनाच माहीत असणार, मात्र कल्याण बॅनर्जी यांची प्रतिक्रिया पाहता मुख्यमंत्र्यांनी बैठकीत पक्षांतर्गत वादावर कान टोचले हे निश्चित. सिरामपूर मतदारसंघातून निवडून आलेले ६८ वर्षीय कल्याण बॅनर्जी हे चौथ्यांदा खासदार झाले. लोकसभेतील तृणमूल काँग्रेसचे मुख्य प्रतोद म्हणून ते काम पाहात होते.
खासदारांमध्ये समन्वय साधणे तसेच पक्षाची भूमिका सदनात मांडण्याबाबत प्रतोदाची भूमिका महत्त्वाची असते. मात्र सदनात २९ पैकी ११ खासदार नियमित उपस्थित असतील तर मी काय करणार, अशी उद्विग्नता कल्याण बॅनर्जी यांनी व्यक्त केली. अभिषेक बॅनर्जी यांनी कल्याण बॅनर्जी यांच्याशी चर्चा करून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र पद सोडण्यावर ते ठाम राहिले. सर्वोच्च न्यायालयातील प्रख्यात वकील अशी त्यांची ख्याती. सरकारवर नर्मविनोदी शैलीत प्रहार करण्यात ते आघाडीवर असतात.
कृष्णानगरच्या खासदार ५१ वर्षीय महुआ मोईत्रा यांच्याशी कल्याण बॅनर्जी यांचा वाद आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या बैठकीपुरताच हा वाद न राहता तो चव्हाट्यावर आला. त्याला प्रामुख्याने निमित्त ठरले दिल्लीत गेल्या वर्षी एप्रिलमध्ये निवडणूक आयोगाला भेटण्यास जाणाऱ्या शिष्टमंडळातील खासदारांची नावे. त्या वेळच्या वादाची चित्रफीत काही वृत्तवाहिन्यांनी दाखविली. पक्षाने यात समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला. हा वाद धुमसतच राहिला.
आरोप-प्रत्यारोप
महुआ मोईत्रा या बिजू जनता दलाचे माजी खासदार ६५ वर्षीय पिनाकी मिश्रा यांच्याशी काही महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झाल्या. त्याबाबतही कल्याण यांनी टिप्पणी केली होती. पुढे मोईत्रा यांनी अलीकडेच एका मुलाखतीत काही शेरेबाजी केली. त्यात त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र डुकराशी तुम्ही कुस्ती करु शकत नाही. संघर्ष डुकराला आवडतो पण तुमचे शरीर खराब होईल, ही त्यांची टिप्पणी झोंबणारी ठरली. तसेच, काही जण महिलाविरोधी असून असे काही राजकारणी संसदेत सर्वच पक्षांत आहेत असेही त्या म्हणाल्या. महुआ यांच्या मुलाखतीने कल्याण संतापले. एका पुरुषाने महिला सहकाऱ्याबाबत असे शब्द वापरले असते तर देशभर गदारोळ झाला असता असे सांगत माध्यमांकडे भावना व्यक्त केल्या.
महुआंविरोधात पक्ष कारवाई करत नसल्याची नाराजीही त्यांनी व्यक्त केली. गेल्या लोकसभेच्या अखेरच्या कालावधीत महुआ यांना पासवर्ड अन्य व्यक्तीला दिल्यावरून त्यांची खासदारकी रद्द ठरविण्यात आली होती. त्या वेळी लोकसभेत महुआ यांच्या समर्थनार्थ केलेले भाषणच कल्याण यांनी समाजमाध्यमावर देत, त्या वेळी अशा व्यक्तीचे समर्थन केल्याचा आता पश्चात्ताप होत असल्याचे नमूद करत दिलगिरी व्यक्त केली. एकूण या दोन खासदारांमध्ये वाद काही केल्या थांबत नाही. अशातच तृणमूल काँग्रेसने ज्येष्ठ सदस्य काकुली घोष-दस्तदार यांची मुख्य प्रतोद म्हणून तर अभिनेत्री शताब्दी रॉय यांची लोकसभेत उपनेतेपदी तृणमूल काँग्रेसने नियुक्ती जाहीर केली.
अन्यथा विधानसभेला फटका?
संसदेत भाजपविरोधाची धार तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी बुलंद केली. त्यात कल्याण बॅनर्जी किंवा महुआ मोईत्रा यांची आक्रमक भाषणे कारणीभूत ठरली. महुआ या आर्थिक विषयातील जाणकार आहेत. मात्र अंतर्गत वादात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांची कामगिरी अपेक्षित होत नसल्याची पक्ष नेतृत्वाची भावना असावी. त्यातूनच हे बदल करण्यात आले. मुळात तृणमूल काँग्रेसने चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती तसेच खेळाडूंनाही लोकसभेला मोठ्या प्रमाणात उमेदवारी दिली.
राजकीय पार्श्वभूमी नसताना ममता बॅनर्जी यांच्या करिष्म्यावर हे सारे निवडून आले. या वेळी म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ४२ जागांपैकी तृणमूल काँग्रेसला २९ तर काँग्रेसला एक जागा मिळाली उर्वरित भाजपच्या खात्यात गेल्या. राज्यात लोकसभेला भाजपची ताकद घटली. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होईल. तृणमूल काँग्रेस सलग चौथ्यांदा सत्तेत येण्याच्या प्रयत्नात असेल. मात्र पक्षातील अंतर्गत वाद असे चव्हाट्यावर येऊ लागले तर त्याचा परिणाम विधानसभेला होण्याची धास्ती आहे. पक्षाने कारवाई केल्यावर तरी खासदारांची जाहीर वक्तव्ये थांबणार का, हा मुद्दा आहे.