scorecardresearch

विश्लेषण: फुटबॉलमधील ‘रॅशफोर्ड सेलिब्रेशन’ म्हणजे काय? रॅशफोर्डच्या कृतीचा नेमका अर्थ काय?

रॅशफोर्डच्या दर्जेदार खेळाबरोबरच गोल केल्यानंतर जल्लोष करण्याची त्याची आगळीवेगळी पद्धतही गाजते आहे. हे ‘रॅशफोर्ड सेलिब्रेशन’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

Marcus Rashford rashford celebration
फुटबॉलमधील ‘रॅशफोर्ड सेलिब्रेशन’ म्हणजे काय? रॅशफोर्डच्या कृतीचा नेमका अर्थ काय? (फोटो – रॉयटर्स)

ज्ञानेश भुरे

फुटबॉल विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर आता पुन्हा एकदा क्लब फुटबॉलला लय गवसली आहे. यामध्ये नवनवे खेळाडू आपली कमाल दाखवू लागले आहेत. मॅंचेस्टर युनायटेड क्लबचा मार्कस रॅशफोर्ड हा फुटबॉलपटू मैदानात धडाकेबाज कामगिरी करताना दिसतो आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत १६ गोल केले आहेत. डिसेंबरपासून त्याचा प्रत्येक सामन्यात किमान एक गोल आहे. रॅशफोर्डच्या या दर्जेदार खेळाबरोबरच गोल केल्यानंतर जल्लोष करण्याची त्याची आगळीवेगळी पद्धतही गाजते आहे. हे ‘रॅशफोर्ड सेलिब्रेशन’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

गोल केल्यावर जल्लोष करण्याची रॅशफोर्डची पद्धत काय आहे?

फुटबॉलचा सामना विश्वचषकाचा असो की एखादी स्थानिक स्पर्धा, गोल करणाऱ्या संघामधील खेळाडूंचा जल्लोष पाहण्यासारखा असतो. हा जल्लोष वेगळ्या पद्धतीने केला जात असेल, तर त्याची चर्चाही होते आणि चाहत्यांमध्ये कुतूहलही असते. मँचेस्टर युनायटेडचा मार्कस रॅशफोर्ड गोल केल्यानंतर मैदानाच्या कोपऱ्यात असलेल्या झेंड्याजवळ जातो आणि तेथे डोळे बंद करून आपल्या तर्जनीने कानाच्या वरती डोक्याला स्पर्श करतो. या कृतीचा अर्थ काय, याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे.

या ‘रॅशफोर्ड जल्लोषा’चा अर्थ काय आहे?

मैदानात चांगली कामगिरी करणे, कामगिरीत सातत्य करणे याबरोबरच संघ आणि चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खेळाडू मैदानात आपले कौशल्य पणाला लावत असतात. याचे मानसिक दडपण त्यांच्यावर असते. या दडपणामुळे कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता असते. रॅशफोर्डने स्वत: आपल्या कृतीबाबत कधी खुलासा केलेला नाही. २०२१-२२च्या हंगामात त्याची मनःस्थिती चांगली नव्हती. आता विश्वचषकानंतर त्याला कमालीची लय गवसली आहे. विश्वचषकानंतर नोंदवलेल्या प्रत्येक गोलनंतर तो असाच डोक्याकडे बोट दाखवून जल्लोष साजरा करतो. मानसिक आरोग्य चांगले झाल्यामुळेच हे घडल्याचे जणू त्याला सूचित करायचे असते.

विश्लेषण: महिला प्रीमियर लीग ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील संघ खरेदीसाठी कोणी लावली सर्वाधिक बोली? ‘बीसीसीआय’ने केली किती कोटींची कमाई?

रॅशफोर्डची कृती मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष का वेधते?

खेळ कुठलाही असला, तरी अलीकडे खेळाडूंच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक तंदुरुस्तीलाही तेवढेच महत्त्व प्राप्त झाले आहे. खेळाडू अनेकदा अपेक्षापूर्तीच्या किंवा कामगिरीतील सातत्य भंगण्याच्या मानसिक तणावाशी संघर्ष करत असतात. याचा उलट परिणाम होऊन कामगिरी घसरते. ‘रॅशफोर्ड जल्लोषा’मुळे मानसिक स्थिती सुधारते का, हे नेमके सांगता येत नसले तरी त्याची सुधारलेली कामगिरी मात्र सर्वांसमोर आहे.

या कृतीचे अन्य खेळाडूंकडून अनुकरण केले जाते का?

रॅशफोर्डच्या जल्लोष करण्याच्या या कृतीचे अन्य खेळाडूंकडून अनुकरण केले जात आहे. आर्सेनलच्या बुकायो झाकाने गोल केल्यावर रॅशफोर्डसारखी कृती करायला सुरुवात केली आहे. इटलीतील लीगमध्ये इंग्लंडचा टॅमी अब्राहम आणि जर्मनीचा जोशुआ किमिच यांनीही अशीच कृती करायला सुरुवात केली आहे. यामुळे खेळाडू आता आपल्या मानसिक आरोग्याविषयी उघडपणे बोलू लागल्याचा संदेश मिळत आहे.

विश्लेषण: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम का ठरला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू?

यापूर्वी अशी कृती कोणता खेळाडू करायचा?

टेनिसमध्ये स्टॅनिस्लास वॉवरिंका पूर्वी अशाच पद्धतीने ‘टेम्पल पॉइंट’ कृती करायचा. टेनिसमध्ये प्रत्येक विजय मिळवल्यानंतर तो बोटाने डोक्याकडे खूण करायचा. प्रत्येक विजय हा विचारपूर्वक खेळ केल्यावर मिळतो. त्याचबरोबर विजयासाठी डोके शांत ठेवणे म्हणजेच मानसिकता अचूक राखणे आवश्यक असते हा वॉवरिंकाच्या कृतीचा अर्थ होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 11:00 IST
ताज्या बातम्या