निमा पाटील

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाचे महत्त्वाचे नेते नवाझ शरीफ यांच्या कन्या मरियम शरीफ यांनी सोमवारी पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यामुळे त्या केवळ पंजाबच्याच नव्हे तर पाकिस्तानातील कोणत्याही प्रांताच्या मुख्यमंत्री होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्याबरोबरच शरीफ कुटुंबातील राजकारणाची सूत्रे आता पुढची पिढीकडे जात असल्याचेही हे चिन्ह असल्याचे मानले जात आहे. बेनझीर भुत्तो यांच्यानंतर पाकिस्तानी राजकारणावर प्रभाव टाकू शकतील अशा त्या दुसऱ्याच महिला ठरतात.

miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
japan, a peaceful country, export weapons of mass destruction
विश्लेषण: शांत, युद्धविरोधी जपानकडून विध्वंसक शस्त्रे निर्यात पुन्हा का सुरू होतेय?
Dilip Ghosh comments on Mamata TMC
दिलीप घोष यांच्या ममतांवरील स्त्रीद्वेष्टा टिप्पणीनंतर बंगालच्या राजकारणात वादळ, टीएमसीची थेट निवडणूक आयोगाकडे धाव

मरियम शरीफ यांचे नाव पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित कसे झाले?

पाकिस्तानात ८ फेब्रुवारीला सार्वत्रिक आणि प्रांतीय निवडणुका झाल्या. ‘पीएमएल-एन’ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांनी संयुक्तरित्या सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. ‘पीएमएल-एन’ला जास्त जागा असल्याने पंतप्रधानपद त्याच पक्षाला मिळाले. निवडणुकीपूर्वी लंडनमधील विजनवासातून परत आलेले नवाझ शरीफ स्वतः पंतप्रधानपदासाठी उत्सुक होते. पंजाबमध्ये पक्षाला बहुमत मिळाले होते. तिथे आपली कन्या मरियम शरीफ यांचे नाव त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित केले होते. मात्र, देशाचे पंतप्रधानपद आणि देशातील सर्वात महत्त्वाच्या राज्याचे मुख्यमंत्रीपद एकाच घरात जाण्याच्या प्रस्तावावर पाकिस्तानच्या लष्कराने हरकत घेतली. देशाचे पंतप्रधानपद किंवा पंजाबचे मुख्यमंत्रीपद असे दोन पर्याय नवाझ शरीफ यांच्यासमोर ठेवण्यात आले. त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद निवडले.

हेही वाचा >>> विश्लेषण : दरडोई घरगुती खर्च किती वाढतो आहे?

शरीफ कुटुंबातील सत्तासंघर्ष काय आहे?

नवाझ शरीफ यांचे दोन वर्षांनी धाकटे बंधू शाहबाज शरीफ हेही दीर्घकाळापासून राजकारणात सक्रिय आहेत. दोघांची मुलेही अनुक्रमे मरियम आणि हमजा यांनीही राजकारणात पाऊल ठेवून बराच काळ लोटला आहे. दोघेही महत्त्वाकांक्षी आहेत. इम्रान खान यांची सत्ता गेल्यानंतर एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपद सांभाळले. त्यांनी तीन वेळा पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. ते पहिल्यांदा १९९७ साली मुख्यमंत्री झाले होते. साधारण दोन वर्षे ते या पदावर होते. त्यानंतर २००८ ते २०१८ असे सलग १० वर्षे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे होते. या कालावधीत २०१३-१७ दरम्यान नवाझ शरीफ पंतप्रधान होते. २०१८मध्ये भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर ते

दीर्घकाळ लंडनमध्ये विजनवासात राहिले. त्यानंतर शाहबाज शरीफ आणि मरियम शरीफ यांनी पक्षाची सूत्रे सांभाळली. त्यांच्या जोडीला शाहबाज यांचा मुलगा हमजा शरीफ हेही होते. ते २००८-१८दरम्यान पाकिस्तानच्या ‘नॅशनल असेंब्ली’चे सदस्य होते. त्यानंतर त्यांना पंजाबच्या प्रांतीय राजकारणात पाठवण्यात आले, २०१८ ते २२ दरम्यान ते पंजाबच्या ‘प्रोव्हिन्शिअल असेंब्ली’मध्ये विरोधी पक्षनेते होते. ३० एप्रिल २०२२ ते २ मे २०२२ असा अतिशय अल्प काळ ते मुख्यमंत्री होते. हमजा हे मरियम यांच्यापेक्षा एका वर्षाने लहान आहेत. मरियम या पक्षाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत आणि हमजा उपाध्यक्ष. ८ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीनंतर पंजाबच्या मुख्यमंत्रीपदासाठी तेही उत्सुक होते. मात्र, मरियम स्पर्धेत असताना त्यांना फारशी संधी मिळणारही नव्हती.

हेही वाचा >>> क्रॉस व्होटिंगमुळे राज्यसभेचे चित्रच बदलले, महाराष्ट्र अन् ‘या’ राज्यांतून भाजपाचे ‘इतके’ उमेदवार आले निवडून

मरियम शरीफ यांची स्वभाववैशिष्ट्ये काय आहेत?

राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी नवाझ शरीफ यांची प्रिय कन्या इतकीच मरियम यांची ओळख होती. राजकीय घराण्यातच जन्म घेतल्यामुळे राजकारण त्यांच्यासाठी अपरिचित नव्हते. मात्र, त्यांच्या खंबीरपणाची चुणूक दिसली ती नवाझ शरीफ यांनी दिलेल्या कायदेशीर लढाईदरम्यान. भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी सिद्ध झाल्यानंतर नवाझ शरीफ यांनी लंडनमध्येच राहणे पसंत केले. त्यादरम्यान, पाकिस्तानातील सर्व आघाड्यांवर मरियम आपल्या काकांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी त्यांचे सतत उडणारे जाहीर खटके पाकिस्तानी जनतेसाठी नवीन नाहीत. ‘पीएमएल-एन’चे अस्तित्व टिकवण्यासाठी, पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी, पित्याच्या सुरक्षिततेची खबरदारी घेत त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी त्या सतत झगडत राहिल्या. सामान्य कार्यकर्ते आणि लोकांना पक्षाशी जोडून घेत राहिल्या. आतापर्यंत त्यांनी निवडणूक मात्र कधी लढवली नव्हती. यावेळी पहिल्यांदाच त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात पाऊल टाकले आणि अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाल्या.

बेनझीर भुत्तो यांच्याबरोबर तुलनेचा काय परिणाम होऊ शकतो?

परंपरावादी, पितृसत्ताक पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत काही महिलांनी काम केले आहे. हीना रब्बानी खर यांच्यासारख्या काही नेत्यांची प्रतिमा भारतातही चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. मात्र, बेनझीर भुत्तो वगळता पाकिस्तानच्या जडणघडणीला महिला नेत्यांचा हातभार फारसा लागलेला नाही. बेनझीर भुत्तो या सिंध प्रांतातील होत्या, तर मरियम पंजाबच्या आहेत. सिंधच्या तुलनेत पंजाब प्रांत अधिक परंपरावादी आहे. अशा वेळी मरियम यांच्यासमोरील आव्हाने अधिक खडतर वाटू शकतात. बेनझीर यांना राष्ट्रीयच नव्हे तर आशियाई पातळीवर महत्त्वाच्या नेत्या म्हणून स्थान मिळाले होते. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारतातही बेनझीर यांची धोरणे मान्य नसताना त्यांचे चाहते होते, आजही त्या विस्मरणात गेलेल्या नाहीत. दुसरे म्हणजे बेनझीर राजकारणात सक्रिय झाल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना गमावले होते. मरियम त्या तुलनेत सुदैवी आहेत. बेनझीर यांच्या तुलनेत त्यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे. या प्रवासात त्यांना पिता आणि काकाची साथ आहे. राजकारणात एकमेकांचा आधार होऊ पाहणारे बाप-लेक ही प्रतिमा पाकिस्तानसारख्या देशात नवाझ शरीफ आणि मरियम या दोघांसाठीही फायद्याची आहे.
nima.patil@expressindia.com