Ragini Das Google Story भारतीय उद्योजिका रागिनी दास यांची नुकतीच ‘गूगल फॉर स्टार्टअप्स इंडिया’च्या प्रमुखपदी (Head of Google for Startups, India) नियुक्ती झाली आहे. रागिनी दास या प्रसिद्ध उद्योजिका आहेत. त्या ‘Leap.club’ च्या सह-संस्थापकदेखील आहेत. रागिनी यांनी लिंक्डइनवर ही बातमी जाहीर केली. त्यांनी खुलासा केला की, २०१३ मध्ये त्यांनी गूगलमध्ये मुलाखत दिली होती, पण अंतिम फेरीच्या पुढे जाण्याची संधी त्यांनी गमावली.

आता, दहा वर्षांहून अधिक काळानंतर त्या पुन्हा या तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनीत परतल्या आहेत. परंतु, यावेळी त्या कंपनीच्या प्रमुख उपक्रमांपैकी एकाचे नेतृत्व करणार आहेत. हा प्रकल्प सुरुवातीच्या टप्प्यातील संस्थापकांना मदत करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. रागिनी दास नेमक्या कोण आहेत? त्यांचा गूगलच्या स्टार्टअप विंगचे नेतृत्व करण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? यावर एक नजर टाकूया…

रागिनी दास यांचा प्रवास

गुरुग्राममध्ये जन्मलेल्या रागिनी दास यांचे शालेय शिक्षण चेन्नईतील ‘चेत्तीनाड विद्याश्रम’ येथे झाले. त्यांनी जी. डी. गोएंका वर्ल्ड इंस्टिट्यूटमधून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील लँकेस्टर विद्यापीठातून बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये (बीबीए) पदवी प्राप्त केली. त्यांच्या शिक्षणकाळात त्यांनी स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि इतर संस्थांमध्ये इंटर्नशिप केली, जिथे त्यांनी मार्केट रिसर्च आणि भारतीय बाजारासाठी बिझनेस प्लान तयार करण्याचे काम केले.

गुरुग्राममध्ये जन्मलेल्या रागिनी दास यांचे शालेय शिक्षण चेन्नईतील ‘चेत्तीनाड विद्याश्रम’ येथे झाले. (छायाचित्र-लिंक्ड इन)

२०१२ मध्ये त्यांनी ‘ट्रायडंट ग्रुप इंडिया’मध्ये देशांतर्गत मार्केटिंगमध्ये ‘फ्रंटलाइन उद्योजिका’ म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर त्यांना युरोप आणि यूएस मार्केटिंगचे काम पाहण्यासाठी बढती मिळाली. त्यांच्या कामात होम टेक्स्टाईल क्लायंट्सचे खाते व्यवस्थापन, लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स आदी गोष्टी समाविष्ट होत्या. एका वर्षानंतर त्यांनी गूगल आणि झोमॅटो या दोन्ही ठिकाणी मुलाखती दिल्या. त्यावेळी त्या गूगलच्या अंतिम फेरीच्या पुढे जाऊ शकल्या नाहीत, पण त्यांना झोमॅटोमध्ये नोकरी मिळाली. पुढील सहा वर्षे त्यांनी झोमॅटोमध्ये विक्री, वाढ आणि आंतरराष्ट्रीय विस्तार यासाठी काम केले.

२०१७ मध्ये त्या ‘झोमॅटो गोल्ड’च्या संस्थापक टीममध्ये सामील झाल्या, जिथे त्यांनी वापरकर्ता वाढ, एंगेजमेंट आणि उत्पादन विपणनावर काम केले. त्यांनी ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, कतार आणि लेबनॉनसह १० आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये ‘झोमॅटो गोल्ड’ लाँच करण्यास मदत केली. आपल्या अनुभवाबद्दल बोलताना दास म्हणाल्या, “झोमॅटोने मला माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्वतःची क्षमता ओळखण्यास मदत केली, आयुष्यभरासाठी मित्र दिले, शिकण्याची संधी दिली आणि शेवटी ‘Leap.club’ ची सह-संस्थापना करण्याचे धैर्य दिले.”

‘Leap.club’च्या सहसंस्थापक

२०२० मध्ये त्यांनी ‘Leap.club’ ची सह-स्थापना केली. हा महिलांना सहयोग करण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठीचा एक व्यावसायिक नेटवर्क आणि समुदाय आहे. या प्लॅटफॉर्मने हजारो सदस्यांसाठी नेटवर्किंग, क्युरेटेड इव्हेंट्स (निवडक कार्यक्रम) उपलब्ध करून दिले. ‘Leap.club’मुळे त्यांना एक ओळख मिळाली आणि हजारो महिलांचे आयुष्य बदलले, असे रागिनी दास सांगतात. जून २०२५ मध्ये त्यांच्या वेबसाइटचे कामकाज थांबल्यानंतर, दास यांनी प्रवास करण्यासाठी वैयक्तिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि आपला पाळीव कुत्रा जिमीबरोबर वेळ घालवण्यासाठी काही काळ विश्रांती घेतली असे त्या सांगतात.

ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांना ‘गूगल फॉर स्टार्टअप्स इंडिया’च्या भूमिकेविषयी कळले. ही भूमिका त्यांच्या अनुभवाशी जुळणारी असल्याचे त्यांनी सांगितले. आता ‘गूगल फॉर स्टार्टअप्स इंडिया’च्या प्रमुख म्हणून दास योग्य लोकांशी, संसाधनांशी आणि मार्गदर्शकांशी जोडून सुरुवातीच्या टप्प्यातील संस्थापकांना मदत करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्या म्हणाल्या, “जगात भरभराटीला येणाऱ्या स्टार्टअप्सना योग्य लोक, उत्पादनांशी जोडून त्यांना वाढण्यास मदत करणे हे आमचे ध्येय आहे.” त्यांच्या कॉर्पोरेट भूमिकेव्यतिरिक्त त्या ‘फिक्की’मधील (FICCI) ‘महिला इन स्टार्टअप्स’ समितीच्या अध्यक्ष म्हणून काम करतात.

अंकित अग्रवाल यांचाही प्रवास प्रेरणादायी

२०२१ मध्ये अंकित एका अमेरिकन-आधारित टेक कंपनीसाठी रिमोटली काम करत होते, त्यावेळी त्यांना अचानक नोकरीवरून काढून टाकण्यात आले. हा धक्का त्यांच्यासाठी खूप मोठा होता. कुटुंबालाही न सांगता त्यांनी पुन्हा उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्याच वर्षी त्यांनी ‘डू युवर थिंग’ या प्लॅटफॉर्मची सह-स्थापना केली. हा एक ‘क्रिएटर-फर्स्ट’ प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मला मायक्रो-इन्फ्लुएन्सर्स आणि स्वतंत्र निर्मात्यांना त्यांच्या कामातून पैसे मिळवून देण्यासाठी (मॉनेटाईज करण्यासाठी) तयार करण्यात आला आहे.

आज ‘डू युवर थिंग’ मोठ्या ब्रँड्सबरोबर भागीदारी करते आणि हजारो निर्मात्यांना सेवा पुरवते. रागिनीचे ‘गूगल फॉर स्टार्टअप्स इंडिया’कडे परत येणे असो किंवा अंकितची ‘डू युवर थिंग’च्या माध्यमातून झालेली नवीन सुरुवात, या दोन्ही संस्थापकांनी हे सिद्ध केले आहे की, नकार (Rejection) हा शेवट नसतो, ती एक संधी असते.