Megha Vemuri अमेरिकेतील एका विद्यापीठाने भारतीय विद्यार्थिनीवर बंदी घातली आहे. या विषयाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एमआयटी) २०२५ च्या भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनी मेघा वेमुरी हिला २९ मे रोजी एका अधिकृत कार्यक्रमात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ भाषण दिल्यानंतर तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विद्यापीठाने तिच्या स्वतःच्या पदवीदान समारंभाला उपस्थित राहण्यावरही बंदी घातली आहे. कोण आहे मेघा वेमुरी? अमेरिकेतील विद्यापीठाने तिच्यावर बंदी का घातली? नेमका वाद काय? त्याविषयी जाणून घेऊ…
नेमकं प्रकरण काय?
एमआयटीच्या चॅन्सेलर मेलिसा नोबल्स यांनी वेमुरीला एक ईमेल पाठवून जाहीर केले की, ती आता पदवीदान समारंभात विद्यार्थी मार्शल म्हणून काम करू शकणार नाही. पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमांमध्येही तिला आणि तिच्या कुटुंबाला बाहेर ठेवण्यात येणार आहे. ‘द बोस्टन ग्लोब’ने दिलेल्या वृत्तानुसार ईमेलमध्ये नोबल्स यांनी वेमुरीला सांगितले, “तुम्ही जाणीवपूर्वक आणि वारंवार आयोजकांची दिशाभूल केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तुमचा अधिकार आम्ही मान्य करतो; परंतु एका महत्त्वाच्या संस्थेच्या समारंभात व्यत्यय आणून मंचावरून निषेध करण्याचा तुमचा निर्णय एमआयटीच्या विद्यापीठ नियमांचे पूर्णपणे उल्लंघन होते.” या ईमेलला उत्तर देत वेमुरीने मान्य केले की, मंचावरून केलेला निषेध चुकीचा होता; परंतु त्यांनी त्यांच्यावरील बंदीच्या निर्णयाला अतिरेक असल्याचे म्हटले.

मेघा वेमुरीने लिंक्डइन प्रोफाइल केले डिलीट
वेमुरीने केलेले वक्तव्य सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाले. अनेकांनी तिच्यावर टीका केली. ऑनलाइन प्रतिक्रियांना तोंड देत, वेमुरीने आता लिंक्डइनवरील तिचे प्रोफाइल डिलीट केले आहे. एका एक्स वापरकर्त्याने तिच्या डिलीट केलेल्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट शेअर केला.
मेघा वेमुरीने पॅलेस्टाईनसमर्थक भाषणात काय म्हटले?
- विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान मेघा वेमुरी ही लाल केफियेह (लाल कापड) परिधान करून मंचावर उभी राहिली.
- हे कापड पॅलेस्टाईन एकतेचे प्रतीक मानले जाते. तिच्या भाषणात तिने एमआयटीचे इस्रायलशी असणारे संशोधन संबंध आणि गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षावर तीव्र टीका केली.
- ती म्हणाली, “इस्रायली सैन्य हे एकमेव परदेशी सैन्य आहे, ज्यांच्याशी एमआयटीचे संशोधनाशी निगडित संबंध आहेत.
- याचा अर्थ असा की, पॅलेस्टिनी लोकांवरचा इस्रायलकडून केला गेलेला हल्ला केवळ आपल्या देशाकडूनच नव्हे, तर आपल्या विद्यापीठाकडूनही होत आहे,” असे ती म्हणाली.
- तिने भाषणात आपल्या सहकारी पदवीधरांना ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले.
ती पुढे म्हणाली, “इस्रायल पृथ्वीवरून पॅलेस्टाईन पुसून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आपल्याला दिसत आहे आणि एमआयटी त्याचा एक भाग आहे हे लज्जास्पद आहे.” ती म्हणाली, “शास्त्रज्ञ, अभियंते, शिक्षणतज्ज्ञ व नेते म्हणून पॅलेस्टाईनसाठी मदत करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याची आणि शस्त्रास्त्रांवर बंदी घालण्याची वचनबद्धता असायला हवी. माजी विद्यार्थी म्हणून आपण एमआयटीने इस्रायलशी संबंध तोडावेत, अशी मागणी करत राहावे”, असेही ती म्हणाली. मेघा वेमुरीने विरोध असूनही पॅलेस्टिनी हक्कांना पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
ती म्हणाली, “गेल्या वसंत ऋतूमध्ये् एमआयटीच्या पदवीपूर्व संस्थेने आणि पदवीधर विद्यार्थी संघटनेने नरसंहार करणाऱ्या इस्रायली सैन्याशी संबंध तोडावेत यासाठी मोठ्या संख्येने मतदान केले होते. गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धबंदीची मागणी करण्यात आली आणि पॅलेस्टिनीसमर्थक कार्यकर्त्यांबरोबर एकता दाखवली”, असे ती म्हणाली. हे भाषण पॅलेस्टिनी युवा चळवळीने ऑनलाइन शेअर केले होते.
मेघा वेमुरी कोण आहे?
मेघा वेमुरी हिचा जन्म जॉर्जियातील अल्फारेटा येथे झाला आहे. वेमुरीने २०२१ मध्ये अल्फारेटा उच्च महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. तिने संगणक विज्ञान, तंत्रिका विज्ञान व भाषाशास्त्रात एमआयटीमधून अलीकडेच तिने पदवी मिळवली. तिने वर्ग अध्यक्ष म्हणूनही काम केले. ती साम्राज्यवादविरोधी आणि क्रांतिकारी विचारसरणीशी संलग्न आहे. एमआयटीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी, तिने दक्षिण आफ्रिकेतील यूसीटी न्यूरोसायन्स इन्स्टिट्यूटमध्ये इंटर्नशिप केली. तिने अनेक युवा नेतृत्व आणि विज्ञान उपक्रमांमध्ये भाग घेतला. तिचे समर्थक मोठ्या प्रमाणात तिच्या बाजूने बोलताना आणि एमआयटीवर टीका करताना दिसत आहेत.
विद्यापीठांची निदर्शनांवर कडक कारवाई
इस्रायल-गाझा संघर्षादरम्यान महाविद्यालयीन कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील निदर्शनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे. वेमुरीवर घातलेली बंदी ही त्याच कारवाईचा एक भाग आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक अमेरिकन विद्यापीठांनी संस्थात्मक कार्यक्रमांमध्ये अडथळा आणणाऱ्या आणि पॅलेस्टाईनला पाठिंबा देणाऱ्या विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. गेल्या महिन्यात न्यू यॉर्क विद्यापीठाने विद्यार्थी लोगान रोझोसचा डिप्लोमा रोखला होता. त्याने इस्रायल-हमास संघर्षादरम्यान पॅलेस्टाईनमध्ये होत असलेल्या अत्याचारांविरोधात भाषण दिले होते.
एप्रिलमध्ये पॅलेस्टिनीसमर्थक विद्यार्थी गटांनी एमआयटी विद्यापीठ परिसरात आंदोलन करीत इस्रायलच्या संरक्षण क्षेत्राशी असलेले आर्थिक किंवा संशोधनाशी निगडित संबंध उघड करण्याचे आणि रद्द करण्याचे आवाहन केले होते. एमआयटीने सार्वजनिक निवेदनांमध्ये यातील काही संबंध मान्यदेखील केले. परंतु, शैक्षणिक आणि संशोधन भागीदारीचा भाग म्हणून त्यांचा बचावही केला.