नीरज राऊत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दीड वर्षात १०६ बळी व तितक्या संख्येत प्रवासी जखमी झाले आहेत. या गंभीर समस्येकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा प्रशासनाचे दुर्लक्षच झाले होते. मात्र उमदे उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या चारोटी (डहाणू) येथील अपघाती निधनामुळे देशाचे लक्ष या महामार्गाकडे वेधले गेले. पालघर जिल्ह्यातील महामार्गाच्या या भागात सातत्यपूर्ण अपघात होत असल्याने महामार्गाचा हा भाग जणू मृत्यूचा सापळा बनला आहे.

सायरस मिस्त्री प्रवास करत असलेल्या गाडीचा अपघातामधील कारणे कोणती असावीत?

उद्धवाडा येथून मुंबईकडे निघाले असताना चारोटी पुलानंतर तीन पदरी असणारा रस्ता अचानकपणे विभागला जाऊन त्याचे दुपदरी रस्त्यात रूपांतर झाल्याने वळण असणाऱ्या भागात एखाद्या अवजड वाहनाला चुकीच्या दिशेने मागे टाकताना (ओव्हरटेक करताना) तसेच वळणाच्या रस्त्यावर भरधाव असणाऱ्या वाहनाच्या चालकाला पुलाच्या कठड्याचा अंदाज न आल्याने गाडी कठड्यावर आदळून भीषण अपघात घडला.

या महामार्गावर अपघात होण्यामागील प्रमुख कारणे कोणती?

भारतीय रस्ते महासंघाने नमूद केलेली मानके या महामार्गाच्या उभारणीच्या वेळी बहुतांशी पाळली गेली नसल्याचे दिसून आले आहेत. संरक्षक उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्याने २८ अपघात प्रवण क्षेत्रे व इतर अनेक ठिकाणी सातत्यपूर्ण अपघात होत असतात. रस्ते अचानक अरुंद होणे, वळण व रस्त्याच्या भागावर अचानकपणे उंचवटा (सुपर एलेवेशन) असल्याने, वळणावर रस्त्याला योग्य पद्धतीने उतारकल (बँकिंग) नसल्याने वेगात असणाऱ्या वाहनांचा तोल जाऊन किंवा वाहन चालवण्याचा अंदाज चुकल्याने अपघात होत असतात. दुभाजकांची उंची समान नसल्याने तसेच अनेक ठिकाणी दुभाजक कमकुवत असल्याने वाहन दुभाजक तोडून पलीकडच्या मार्गावर ओलांडूनही अपघात झालेले आहेत.

विश्लेषण : राजकीय पक्षांची नोंदणी नेमकी कशी होते? मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांसाठी काय आहेत नियम?

आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्याची व्यवस्था कशी आहे?

अपघात झाल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास टोल असणाऱ्या या महामार्गावर मदतीसाठी पाचारण करण्यासाठी व्यवस्था कार्यक्षम नाही. महामार्गावर अनेक पट्ट्यांमध्ये मोबाईलला नेटवर्क नसते, अशा परिस्थिती मदतकार्यासाठी संपर्क साधण्याची व्यवस्था नसल्याने प्रथमोपचार व मदत मिळण्यास विलंब होतो. मदतीसाठी असणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या अपुरी आहे. या रुग्णवाहिकांमध्ये सुसज्ज उपकरणे व प्रशिक्षित डॉक्टर असणे गरजेचे आहे. अपघातामध्ये वाहनाला आग लागल्यास आग विझवण्यासाठी अग्निशमन यंत्रणा तारापूर एमआयडीसी अथवा नगरपालिकेकडून मागावी लागते. महामार्गालगत एकही ट्रॉमा केअर सेंटर वा सुसज्ज रुग्णालय नसल्याने अनेकदा वैद्यकीय उपचारासाठी महत्त्वाच्या ‘गोल्डन आवर’ काळात योग्य उपचार न मिळाल्याने अपघातग्रस्त रुग्ण दगावतात.

वाहनचालकांच्या सतर्कतेसाठी व सुरक्षितता वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत?

अपघात प्रवण क्षेत्रे, तीन पदरी मार्ग दुपदरी मार्गात रूपांतरित होताना किंवा तीव्र वळण असणाऱ्या पुलांपूर्वी सूचना फलक, रिफ्लेक्टर, चमकणारे डाय (ब्लींकर लाईट), विशिष्ट उंचीचे दुभाजक व मुबलक प्रकाश योजना कार्यान्वित करणे गरजेचे आहे. पुलाच्या लोखंडी, काँक्रीट कठड्यापूर्वी, पुलांवर, अपघात प्रवण क्षेत्रांच्या ठिकाणी क्रॅश बॅरियर लावणे, गतिरोधक (रम्बलर) उभारणी करणे, अशा क्षेत्रांची नियमितपणे रंगोटी करणे व रस्त्याकडेला वाढणारे गवत व झाडंझुडपांची सफाई करणे, प्रकाश व्यवस्था उभारणे गरजेचे आहे.

महामार्गाची देखभाल दुरुस्ती व दक्ष पाहणी योग्य पद्धतीने होते का?

पावसाळ्यात अनेक ठिकाणी महामार्गावर पाणी साचून निर्माण होणाऱ्या खड्ड्यात अपघात होतात. पाण्याचा निचरा करणे व तातडीने खड्डे बुजवण्याकडे वेगवेगळी करणे सांगून दुर्लक्ष केले जाते. महामार्गालगत असणाऱ्या जागांवर झालेले अतिक्रमण व बेजबाबदारपणे उभी केलेली वाहने अशा समस्या महामार्गाच्या गस्ती पथकाकडून वरिष्ठांच्या निदर्शनास आणून सातत्याने कारवाई होणे आवश्यक आहे, मात्र तसे होत नाही. अनेकदा अवघड वाहने वेगवान मार्गिकेवरून प्रवास करीत असल्याने लहान वाहनांना बाहेरच्या मार्गिकेवरून जावे लागते, त्यावेळी अपघात होतात. असे प्रकार रोखण्यासाठी तसेच वेग मर्यादेचे पालन करण्यासाठी ठिकठिकाणी सीसीटीव्ही व स्पीड गनयुक्त देखरेख व्यवस्था उभारणे गरजेचे आहे. एका मार्गिकेवरून विरुद्ध दिशेच्या मार्गिकेकडे जाण्यासाठी असणाऱ्या क्रॉसिंगच्या ठिकाणी योग्य सतर्कता व्यवस्था कार्यान्वित ठेवणे तसेच बेकायदेशीर क्रॉसिंग बंद करणे आवश्यक आहे.

विश्लेषण : कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या, पण महागाईचं काय? भारतातील महागाई खरंच कमी होणार का? वाचा नेमकं काय घडतंय!

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणत्या दीर्घकालीन योजना आवश्यक आहेत?

अपघात प्रवण क्षेत्रे असणाऱ्या ठिकाणी आवश्यक महामार्गाची पुनर्संरेखन (realignment) करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणे, महामार्गामध्ये असणाऱ्या क्रॉसिंगच्या ठिकाणी उड्डाणपूलांची उभारणी करणे, आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी सुसज्ज व्यवस्था निर्माण करणे व ती कार्यरत ठेवणे, महामार्गाचे लेखापरीक्षण अहवाल तसेच अपघाताचा तपशील सर्वसामान्यांसाठी सहजगत्या उपलब्ध व्हावा यासाठी यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai ahemadabad highway accident prone palghar belt cyrus mistry print exp pmw
First published on: 10-09-2022 at 12:16 IST