Crying club India लाफ्टर क्लब, लाफ्टर थेरपीबाबत आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मात्र, आता देशात क्राईंग क्लब नावाची नवीन संकल्पना अस्तित्वात आली आहे. या क्राईंग क्लबमध्ये जाऊन लोक आपल्या भावना व्यक्त करतात आणि ढसाढसा रडतात. ताणतणाव आणि निराशेत असणाऱ्या लोकांसाठी उपाय म्हणून भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ‘क्राय क्लब’ सुरू केले आहेत. मुंबईमध्येदेखील असाच एक क्लब सुरू झाला आहे, तसेच दिल्ली व बंगळूरुसारख्या शहरांमध्ये आधीच असे क्लब सुरू आहेत. ‘क्राय क्लब’ नक्की काय आहेत? ते लोकप्रिय का होत आहेत? त्यामागे काही शास्त्रीय कारण आहे का? त्यांची संकल्पना काय आहे? त्याविषयी जाणून घेऊयात.

अश्रू का महत्त्वाचे?

रडणे हे मानसिक आरोग्यामध्ये महत्त्वाचे मानले जाते. अश्रू भावनांना नियंत्रित करण्यास, ताण कमी करण्यास आणि मानसिक शांतता मिळवून देण्यास मदत करतात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, रडल्यामुळे पॅरासिंपॅथेटिक नर्व्हस सिस्टीम सक्रिय होते, जी ताणानंतर शरीराला शांत करते. तसेच, यामुळे ऑक्सिटोसिन व एन्डॉर्फिन यांसारखे हार्मोन्स बाहेर पडतात, जे आपला तणाव आणि वेदना कमी करतात. रडल्यामुळे दुःखाची जाणीव होते आणि भावनिक संबंध वाढतात. त्यामुळे एकटेपणाची भावना कमी होते. मात्र, रडण्याचा मानसिक आरोग्यावर होणारा फायदा हा त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. सहसा जेव्हा लोक सुरक्षित आणि आधार मिळेल अशा वातावरणात रडतात, तेव्हा त्यांना बरे वाटते; परंतु ज्यांना डिप्रेशनसारख्या समस्या आहेत, त्यांना कदाचित असा दिलासा मिळत नाही.

‘क्राय क्लब’ म्हणजे नक्की काय?

  • मुंबईतील खार येथील ‘द क्राय क्लब’ने १५ जूनच्या कार्यक्रमासाठी ऑनलाइन घोषणा केली. त्यात दिलेल्या माहितीनुसार, हे भावना व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित असे ठिकाण आहे.
  • सोप्या भाषेत सांगायचे तर, हे असे एक ठिकाण आहे, जिथे आधार देणारे अनोळखी लोक तुमच्या समस्या सोडवण्यासाठी नव्हे, तर केवळ तुम्हाला ऐकण्यासाठी तयार असतात.
  • रडणे शरीरासाठी फायद्याचे असल्याने क्राय क्लबची सुरुवात करण्यात आली आहे.

मुंबईत ‘द क्राय क्लब’ची सुरुवात

क्लबच्या म्हणण्यानुसार, “येथे टिश्यूज, चहा आणि भावनिक आधार देणारं संगीत उपलब्ध असतं. राग व्यक्त करणं, रडणं व एकमेकांना मिठी मारणं याला प्रोत्साहन दिलं जातं. तुम्हाला हलकं वाटावं, तणाव यासाठी याची सुरुवात करण्यात आली आहे. इथे तुमच्या भावनांचं स्वागत होईल.” ‘द क्राय क्लब’ तुम्हाला कोणी जज करणार नाही (नॉन जजमेंटल) असे वातावरण प्रदान करतो. “तुमच्या मनात कोणतंही दुःख, कामाचा ताण किंवा आठवडाभराचं ओझं असो, जसे आहात तसे या. चहा घेत घेत तुम्हाला समजून घेणाऱ्या लोकांच्या सान्निध्यात तुम्हाला रडण्याचं, मनातली खदखद बाहेर काढण्याचं किंवा फक्त शांत बसण्याचं स्वातंत्र्य आहे. इथे कोणतंही स्पष्टीकरण देण्याचं दडपण नाही. ही भावनिक दडपशाहीविरुद्धची बंडखोरी आहे, जिथे तुम्ही स्वतःला मोकळं करू शकता, श्वास घेऊ शकता आणि तणावमुक्त होऊन बाहेर पडू शकता,” असेही क्लब सांगतो.

इतर मोठ्या शहरांमध्ये असे क्लब आहेत का?

सुरतमध्ये २०१७ पासून ‘हेल्दी क्राईंग क्लब’ आहे. या क्लबमध्ये लोक महिन्यातून एकदा रडण्यासाठी एकत्र येतात. दिल्ली, बंगळुरू व हैदराबादमध्ये ‘रुइकात्सू’ (Ruikatsu) या संकल्पनेने प्रेरित होऊन असे अनेक अनौपचारिक ‘व्हलनरेबिलिटी सर्कल्स’ आहेत.

‘क्राय क्लब’मागे जपानी संकल्पना

‘रुइकात्सू’ म्हणजे ‘अश्रूंचा कार्यक्रम’ किंवा ‘अश्रूंचा शोध’. हा एक जपानी वेलनेस ट्रेंड आहे. ताण कमी करणे, भावनिक आरोग्य सुधारणे व मानसिक कल्याण साधणे यांवर ही संकल्पना आधारित आहे. ‘रुई’ म्हणजे अश्रू आणि ‘कात्सू’ म्हणजे ‘कात्सुदो’ अर्थात कार्यक्रम, या शब्दांपासून ‘रुइकात्सू’ हा शब्द तयार झाला आहे. हे ‘शूकात्सू’ (नोकरी शोधणे) किंवा ‘कोंकात्सू’ (लग्न जुळवणे) अशा इतर जपानी ट्रेंडसारखे आहे. ‘रुइकात्सू’मध्ये काही विशिष्ट सत्रे आयोजित केली जातात. तिथे लोक भावनिक चित्रपट पाहण्यासाठी, हृदयस्पर्शी गोष्टी ऐकण्यासाठी किंवा भावना व्यक्त करणारी पत्रे वाचण्यासाठी एकत्र येतात. त्यामागची कल्पना अशी आहे की, रडल्यामुळे लोकांच्या दबून राहिलेल्या भावनांना बाहेर येण्यास मदत होते. या सत्रांचे नेतृत्व कधी कधी व्यावसायिक ‘टीअर थेरपिस्ट’ करतात, जे लोकांना मार्गदर्शन करतात.

जपानमध्ये ही संकल्पना कशी सुरू झाली?

२०१३ च्या सुमारास हिरोकी तेराई नावाच्या एका जपानी उद्योजकाने हा शब्द तयार केला. त्याने सुरुवातीला ‘डिव्होर्स सेरेमनी’ या संकल्पनेने लक्ष वेधून घेतले होते. ब्रेकअप किंवा तणावपूर्ण प्रसंगातून जाणाऱ्या लोकांना रडल्यानंतर बरे वाटते, हे त्याने पाहिले. या निरीक्षणातूनच त्याने असे सत्र तयार केले, जिथे लोक येऊन भावनिक ताण कमी करण्यासाठी रडू शकतील.

‘रुइकात्सू’ लोकप्रिय का आहे?

जपानमधील कामाचे वातावरण खूप तणावपूर्ण आहे, तिथे लोक फार व्यक्त होत नाहीत. ‘रुइकात्सू’ अशा लोकांसाठी भावना व्यक्त करण्याचा एक सुरक्षित आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्ह मार्ग उपलब्ध करून देतो. शास्त्रीय अभ्यासांनीही हे सिद्ध केले आहे की, रडल्यामुळे ताणाचे हार्मोन्स कमी होतात, रक्तदाब कमी होतो व भावनिक स्पष्टता येते. या सत्रांनंतर सहभागींना शांत आणि भावनिकदृष्ट्या अधिक संतुलित वाटते.

‘रुइकात्सू’ जपानसाठी का महत्त्वाचे?

‘रुइकात्सू’ ही जपानमधील मानसिक आरोग्याची जागरूकता, भावनिक साक्षरता व ताण कमी करण्याच्या पर्यायी पद्धतींकडे होत असलेल्या मोठ्या सांस्कृतिक बदलाचा भाग आहे. जपानमध्ये सार्वजनिक किंवा व्यावसायिक ठिकाणी भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि धीर धरणे महत्त्वाचे मानले जाते; पण ‘रुइकात्सू’सारखे ट्रेंड भावनिक अभिव्यक्तीला एक विशिष्ट मार्ग देत आहेत.