scorecardresearch

विश्लेषण : पावसाळ्यात लोकल सेवा का कोलमडते?

दर पवासाळ्यात प्रवाशांना विलंबाने धावणाऱ्या रेल्वेसेवेला सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.

mumbai local train rain
पावसाळापूर्व तयारी करूनही पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते (प्रातिनिधिक फोटो)

-सुशांत मोरे

दरवर्षी पडणाऱ्या पावसात मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा कोलमडतेच. रुळांवर पाणी साचणे, ओव्हरहेड वायरवर झाडाची फांदी कोसळणे किंवा सिग्नल यंत्रणा बंद पडणे इत्यादी कारणे त्यावेळी समोर येतात. पावसाळापूर्व तयारी करूनही पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊन प्रवाशांना विलंबाने धावणाऱ्या रेल्वेसेवेला सामोरे जावे लागते. गेली अनेक वर्षे या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.

लोकल सेवेवर पावसाचा परिणाम का होतो?

मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस, भरती आणि पाण्याचा निचरा न होणे यामुळे रुळांवर पाणी साचते आणि त्याचाच मोठा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेवांना बसतो. रुळांवर आठ इंचापर्यंत पाणी साचल्यास ती धोक्याची पातळी समजली जाते. त्याबरोबरच सिग्नल यंत्रणा बंद करण्यात येते, शिवाय लोकलची यंत्रणा असलेल्या मोटरकोच डब्यात पाणी जाण्याची शक्यता होऊन बिघाड होण्याचीही शक्यता असते. काही वेळा रुळांवर थोडे पाणी साचले तरी सिग्नलची रुळांजवळ असलेली यंत्रणाही पाण्याखाली जाते. सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यास स्वयंचलित असलेली सिग्नल यंत्रणा बंद पडते आणि दिव्याचा रंग लाल होतो. परिणामी मोटरमनला नियंत्रण कक्षाकडून सूचना मिळाल्याशिवाय लोकल पुढे नेणे अशक्य होते.

विशिष्ट ठिकाणी पाणी साचण्याचे कारण काय? 

मध्य रेल्वेवर मशीद बंदर, सॅन्डहर्स्ट रोड, भायखळा, चिंचपोकळी ते करी रोड, परळ, दादर ते शीव, कुर्ला, विक्रोळी, कांजुरमार्ग, भांडुप, मुलुंड व ठाणे, तसेच हार्बरवर टिळकनगर, चुनाभट्टी, तुर्भे, गुरु तेगबहादूर नगर या ठिकाणी रुळांवर पाणी साठते. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मरीन लाईन्स, मुंबई सेन्ट्रल ते ग्रॅण्ट रोड, प्रभादेवी ते दादर, दादर ते माहिम जंक्शन, माहिम ते वांद्रे, वांद्रे ते खार रोड, अंधेरी ते जोगेश्वरी, बोरीवली ते दहिसर, वसई रोड ते नालासोपारा, नालासोपारा ते विरार, विरार ते वैतरणा आणि वैतरणा ते सफाळे या ठिकाणी पाणी तुंबते. पाणी साचणाऱ्या व असुरक्षित ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे या पट्ट्यात पावसाळ्यापूर्वी रुळांची उंची वाढवण्याचे कामही केले जाते. याशिवाय यातील काही स्थानकांच्या रुळांजवळच असलेल्या झोपड्या, त्यातून टाकला जाणारा कचरा आणि वारंवार सफाई करूनही पुन्हा घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्यामुळे पाण्याचा सहजी निचरा होत नाही. भरतीच्या वेळेत रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा निचरा पटकन होत नाही आणि ते पाणी रेल्वे हद्दीत शिरते. कुर्ल्यात मिठी नदी ही कायमच रेल्वेसाठी डोकेदुखी ठरली आहे. भरती येताच मध्य रेल्वेच्या कुर्ला, विद्याविहार, शीव स्थानकात मिठीचे पाणी शिरते.

पाहा व्हिडीओ –

पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वेची यंत्रणा कोणती?

रुळांजवळ साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात उपसा करणारी यंत्रे (पंप) बसविली जातात. यात जास्त पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी अधिक पंप बसवून खबरदारी घेतली जाते. त्यात उच्च क्षमतेचेही पंप असतात. याशिवाय मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून मायक्रोटनेल नावाची नवीन पद्धतही अवलंबवण्यात आली आहे. स्थानकाबाहेर रस्त्यांवर साचणारे पाणी मायक्रोटनेल पद्धत वापरून म्हणजे भूमिगत मार्गाने नेण्यासाठी रुळांखालूनच मोठ्या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. पालिकेच्या मदतीने हे काम रेल्वेने केले असून पाणी साचण्याचे प्रमाण या हद्दीत फार कमी झाल्याचा रेल्वेचा दावा आहे. पश्चिम रेल्वेनेही वसई, विरार तसेच मुंबई शहरातील काही स्थानकांजवळ पालिकेच्या मदतीने ही यंत्रणा उभी केली आहे. यात मध्य रेल्वेने मशीद बंदर, सॅन्डहर्स्ट रोड, भायखळा, कुर्ला या स्थानकांजवळ यंत्रणा उभारली. मात्र भरतीच्या वेळी ही यंत्रणाही कुचकामी ठरते. यंदा रुळांवर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मध्य रेल्वेकडून ११८ आणि पश्चिम रेल्वेकडून १४२ पंप बसवण्यात आले असून त्यांची संख्या वाढवण्यात आली आहे.

पावसाळापूर्व कामे कशी होतात? 

रेल्वेकडून दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी एक ते दीड महिना कामे हाती घेण्यात येतात. पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर प्रथम लक्ष केंद्रित केले जाते. रेल्वे हद्दीतील नाले, गटारे यांची सफाई, रुळांजवळच असणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणे, सिग्नल यंत्रणा तसेच ओव्हरहेड वायरची देखभाल, दुरुस्ती कामेही होतात. शिवाय सखल भाग समजल्या जाणाऱ्या ठिकाणी रुळांची उंची वाढवण्यात येते. पश्चिम रेल्वेने यंदा मुंबई विभागात रेल्वे हद्दीतील ४४ गटारे आणि ५५ नाल्यांची सफाईही कामे केली. याशिवाय एक हजारपेक्षा जास्त झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या. तर मध्य रेल्वेनेही ५५ ठिकाणांपेक्षा जास्त नालेसफाई करतानाच मोठ्या प्रमाणात झाडांच्या फांद्या छाटणे इत्यादी काम केली.

रेल्वेमार्गावरील झोपड्यांचा प्रश्न कधीच सोडवला का जात नाही?

रेल्वे रुळांजवळील अतिक्रमणांचा विशेषत झोपड्यांचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. या झोपड्यांमधून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक, अन्य कचरा टाकला जातो. त्यामुळे पावसाळ्यात याच कचऱ्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही. एका जनहित याचिकेवरी सुनावणी घेताना देशभरातील रेल्वे जमिनींवर असलेल्या अतिक्रमणांवरुन सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे मंडळाला सुनावले होते. त्यानंतर रेल्वे मंडळाच्या मेंबर ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर विभागाने देशभरातील रेल्वेच्या सर्वच महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून कारवाई करण्यासंदर्भात जानेवारी २०२२ मध्ये सूचना दिल्या होत्या. त्यानंतर पश्चिम व मध्य रेल्वे उपनगरीय हद्दीत असलेल्या अतिक्रमणांचा मुद्दा पुढे आला. परंतु तो अद्यापही सुटलेला नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai local train service affected by monsoon rain every year what are the reasons print exp 0722 scsg