Brain Affecting Tapeworm Infectionsपावसाळ्यात संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढतो. सध्या राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच आता मुंबईतील डॉक्टरांनी मेंदूला प्रभावित करणाऱ्या टेपवर्म किंवा न्यूरोसिस्टीसर्कोसिस (Neurocysticercosis) संसर्गाविषयी धोक्याचा इशारा दिला आहे. हा असा संसर्ग आहे जो परजीवी टेनिया सोलीयम (T.solium) च्या अळ्यांमुळे होतो. त्यांना डुकराचे टेपवर्म असेही म्हणतात. या घटनेनंतर मेंदूमध्ये सिस्ट्स म्हणजेच गाठी तयार होऊ शकतात.

मुंबईतील एका रुग्णालयाने असा सल्ला जारी केला आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः महानगरांमध्ये टेपवर्म संसर्गामध्ये वाढ दिसून आली आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि सीडीसीनुसार, हा एक परजीवीजन्य रोग (Parasitic Disease) आहे. परंतु, असे असले तरीही अस्वच्छता आणि जनजागृतीच्या अभावामुळे हा रोग अजूनही सामान्य आहे. मेंदूत अळ्या कशा होतात? त्याची लक्षणे आणि उपाय काय आहेत? जाणून घेऊयात.

मुंबईतील डॉक्टरांनी मेंदूला प्रभावित करणाऱ्या टेपवर्म किंवा न्यूरोसिस्टीसर्कोसिस संसर्गाविषयी धोक्याचा इशारा दिला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

न्यूरोसिस्टीसर्कोसिस म्हणजे काय?

न्यूरोसिस्टीसर्कोसिस हा टेनिया सोलीयम म्हणजेच डुकराच्या टेपवर्ममुळे होणारा एक गंभीर मेंदूचा संसर्ग आहे. अस्वच्छता असलेल्या ठिकाणी आणि डुकराच्या मांसाचे सेवन होत असलेल्या ठिकाणी या आजाराचा संसर्ग होणे सामान्य आहे. न्यूरोसिस्टीसर्कोसिस हा आजार डुकराच्या टेपवर्मची अंडी खाल्ल्याने होतो.

न्यूरोसिस्टीसर्कोसिसची मुख्य कारणे:

  • शौचालय वापरल्यानंतर हात न धुणे.
  • टेपवर्मच्या अंड्यांनी दूषित झालेले अन्न किंवा पाणी.
  • आतड्यात टेपवर्म असलेल्या आणि अस्वच्छ व्यक्तीच्या संपर्कात येणे.

मुंबईमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे काय?

मुसळधार पावसामुळे अनेकदा मलनिस्सारण प्रणाली (सेवेज सिस्टम) भरून वाहतात आणि त्यामुळेच मानवी विष्ठा पाण्याच्या स्त्रोतांमध्ये मिसळते; त्यामुळे मानवी विष्ठांमधून पसरणाऱ्या टेनिया सोलीयम अंड्यांमुळे पाणी किंवा अन्न दूषित होण्याचा धोका वाढतो. अनेक ग्रामीण आणि शहरी झोपडपट्टी भागात पावसाळ्यात शौचालये भरून वाहतात किंवा उघड्यावर शौचाचे प्रमाण वाढते. अस्वच्छ परिस्थितीमुळे दूषित हात, अन्न किंवा पृष्ठभागांद्वारे या अंड्यांचा प्रसार होण्यास मदत होते.

पावसाळ्यात लोक रस्त्यावरचे गरम पदार्थ म्हणजेच स्ट्रीट फूड खाणे पसंत करतात, परंतु अनेकदा हे पदार्थ अस्वच्छ वातावरणात आणि दूषित पाण्याने तयार केले जातात. पूर-दूषित पाण्यात धुतलेल्या पालेभाज्यांमध्येदेखील ही अंडी असू शकतात. जर या भाज्या कच्च्या किंवा अपुऱ्या शिजवलेल्या खाल्ल्या तर संसर्गाचा धोका वाढतो. पावसाळ्यात सामान्यतः परजीवी आणि जलजन्य रोगांचा प्रसार वाढतो. त्यात अमिबियासिस, गियार्डियासिस आणि इतर जीवाणूंचा समावेश आहे. हे जीवाणू रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करू शकतात आणि त्यामुळे न्यूरोसिस्टीसर्कोसिस झाल्यास त्याचा सामना करणे अधिक कठीण होते.

न्यूरोसिस्टीसर्कोसिसची लक्षणे

मेंदूत सिस्ट्स (cysts) कुठे आहेत आणि किती आहेत यावर याची लक्षणे अवलंबून असतात. परंतु, त्याची सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे :

  • झटके
  • डोकेदुखी
  • मळमळ/उलट्या
  • भ्रम
  • दृष्टी समस्या
  • हायड्रोसेफलस (मेंदूत द्रव साचणे)
  • स्ट्रोकसारखी लक्षणे
  • काहीवेळा कोणतीही लक्षणे नाहीत (अनेक वर्षांनंतरपर्यंत)

न्यूरोसिस्टीसर्कोसिसवर उपचार काय?

उपचाराच्या पद्धती सिस्ट्सची संख्या आणि जागा, सिस्ट्स सक्रिय आहेत की मृत आहेत आणि लक्षणांची तीव्रता किती यावर अवलंबून असतात. अळ्या मारण्यासाठी अल्बेन्डाझोल किंवा प्राझिक्वांटेल यांसारखी परजीवीविरोधी औषधे वापरली जातात. मेंदूची सूज कमी करण्यासाठी डेक्सामेथासोनसारखी दाहकविरोधी औषधे किंवा स्टिरॉइड्स दिले जाते. गंभीर प्रकरणांमध्ये सिस्ट्स काढण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते.

न्यूरोसिस्टीसर्कोसिस टाळण्यासाठी काय करावे?

  • जेवण्यापूर्वी किंवा जेवण तयार करण्यापूर्वी साबणाने स्वच्छ हात धुवा.
  • शौचालय वापरल्यानंतर हात धुवा.
  • स्वच्छ पाणी प्या.
  • नखे लहान आणि स्वच्छ ठेवा.
  • जोखीम असलेल्या व्यक्तींना जंतनाशक औषधे द्या.

पावसाळ्यात होणारे इतर आजार

ढगाळ हवामान असेल आणि हवामानाच्या कमाल व किमान तापमानात खूप फरक असेल तर इन्फ़्लुएन्झा जातीच्या इतर विषाणूंचा संसर्ग होऊन स्वाईन फ्लूची लागण होऊ शकते. पावसाळ्यात श्वसनाचे आजारदेखील डोके वर काढतात. पावसाळ्यातल्या सर्दी खोकल्याचे रुपांतर अनेकदा ब्राँकायटिस, अस्थमा, न्युमोनिया, सीओपीडी अशा गंभीर आजारांमध्ये होते. तसेच, पाऊस पडून गेला की जागोजागी पाणी साचून डबकी तयार होतात. त्यात तयार होणाऱ्या अॅनॉफेलिस डासांद्वारे मलेरिया पसरतो, त्यामुळे थंडी वाजून ताप येणे, हिमोग्लोबिन कमी होऊन कावीळ होणे ही लक्षणे दिसतात. मलेरियाच्या गंभीर प्रकरणात हा आजार मेंदूमध्ये शिरून रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलेरियाप्रमाणेच पावसात साचलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालणाऱ्या एडिस इजिप्ती नावाच्या डासांमुळे डेंगी होण्याची भीती असते. डेंगीचे विषाणू डासांद्वारेच माणसाच्या शरीरात शिरतात. हे डास चावल्यास खूप ताप येतो, डोकेदुखी आणि शरीरावर विशेषतः पाठीवर बारीक लालसर, न खाजणारी पुरळ येतात. मुख्य म्हणजे रक्तातील प्लेटलेट्सही झपाट्याने कमी होतात. त्याप्रमाणेच चिकुनगुनियाचा विषाणू हा एडिस जातीच्या डासांद्वारे स्वच्छ पाण्यात निर्माण होऊन पसरतो. त्यात दोन ते तीन दिवस ताप येतो, डोके दुखते, अंगावर पुरळ येते आणि हातापाय दुखू लागतात. हे दुखणे अतिशय तीव्र असते.