मुंबई महापालिकेवर तब्बल २५ वर्षे सत्ता गाजवलेल्या एकसंध शिवसेनेची दोन शकले पडली, त्याला पुढच्या महिन्यात तीन वर्षे पूर्ण होतील. एकनाथ शिंदे यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) असे दोन गट झाले. त्यानंतर शिंदे गटाकडून फोडाफोडीचे राजकारण जोरात सुरू झाले. गेल्या तीन वर्षांत ठाकरे यांच्या गटातून एकेक करीत तब्बल निम्मे माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. ठाकरे यांच्या पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही, तर शिंदे यांच्या पक्षात रोज नवनवीन प्रवेश होत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून या निवडणुकीत शिवसेनेच्या या दोन्ही गटांची कसोटी लागणार आहे. ठाकरे यांची शिवसेना खरच कमकुवत झाली आहे का आणि शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत जम बसवला आहे का, या निवडणुकीत त्याचे उत्तर मिळेल.
शिवसेनेतील या वेळची फूट वेगळी कशी?
शिवसेना हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा राजकीय पक्ष असून शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये केली. मुंबईमध्ये मराठी माणसावर होणारा अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती. शिवसेनेतून गेल्या काही वर्षात दोन मोठे नेते बाहेर पडले. २००५ मध्ये आधी नारायण राणे यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने शिवसेना सोडली आणि त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनीही २००६ मध्ये शिवसेना सोडून आपला स्वतःचा पक्ष स्थापन केला. या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करीत शिवसेना सोडली. मात्र शिवसेनेवर त्यांनी दावा केला नव्हता. विधान परिषदेच्या २०२२ मधील निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी १६ आमदारांना घेऊन पक्षात बंडखोरी केली. आधीच्या दोन नेत्यांनी पक्ष सोडला तेव्हा शिवसेनेचे जेवढे नुकसान झाले त्यापेक्षा अधिक नुकसान शिंदे यांच्या बंडखोरीनंतर झाले. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेत उभी फूट पडली. खरी शिवसेना कोणाची हा प्रश्न उभा राहिला आणि हा वाद न्यायालयापर्यंत पोहोचला. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना मिळाले. मात्र २०२२ पासून शिवसेनेची ही दोन शकले राज्याच्या राजकारणात चर्चेत आहेत.
उद्धव यांच्याकडे सध्या किती नगरसेवक?
मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकसंध शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. चार अपक्षांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे ही संख्या ८८ झाली. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही संख्या ९४ वर पोहोचली होती. जात पडताळणीमध्ये तसेच पोटनिवडणुकीमुळे शिवसेनेचे आणखी पाच नगरसेवक वाढले. त्यामुळे प्रत्यक्षात मार्च २०२२ मध्ये महापालिकेची मुदत संपेपर्यंत शिवसेनेचे सुमारे शंभर नगरसेवक होते. त्यापैकी आता ठाकरेच्या सोबत जेमतेम ५० माजी नगरसेवक उरल्याची चर्चा आहे. २०१७ च्या काळातील स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विविध समित्यांचे अध्यक्षस्थान भूषवलेले असे बहुतेक अनुभवी माजी नगरसेवक शिंदे यांच्याकडे गेले आहेत. तर २०१७ च्या आधीच्या कार्यकाळातील माजी नगरसेवकांनी ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे यांच्याकडून शिंदे यांच्या पक्षात गेलेल्या एकूण माजी नगरसेवकांची संख्या ६५ च्या पुढे गेली आहे.
नगरसेवकांनी उद्धव यांची साथ का सोडली?
शिवसेना पक्षाचे दोन गट झाले तेव्हा सुरुवातीला मुंबईत शिवसेनेला अजिबात फटका बसला नसल्याचे चित्र होते. मुंबईत ठाकरेंचीच सत्ता असे चित्र दिसत होते. मात्र गेल्या तीन वर्षांत हे चित्र पालटण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले आहे. शिंदे यांच्या बंडखोरीविरुद्ध मुंबईतील माजी नगरसेवकांमध्ये, शिवसैनिकांमध्ये जो राग होता त्याची धार गेल्या तीन वर्षांत बोथट झाली. आधीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षात नाराज शिवसैनिकांची मोठी फौज आहे. काही जण सत्ता नाही म्हणून नाराज आहेत. या नाराजांच्या तक्रारी सोडवण्यात ठाकरे अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. एकाची नाराजी दूर केली तरी दुसरा कोणी तरी नाराज होणार हे ठरलेले आहे. त्यामुळे ठाकरे यांची अवस्था धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी झाली आहे. त्यामुळे नाराजी जाहीर करून एकामागोमाग एक माजी नगरसेवक पक्षातून बाहेर पडत आहेत.
शिंदेच्या शिवसेनेत इतके प्रवेश का?
शिवसेनेत दोन तट पडल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांनी मुंबईत विविध कामे करण्याचा सपाटा लावला. विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला मोठे यश मिळाले. त्यामुळे शिंदे गटाची लोकप्रियता आणि ताकद वाढली. सत्तेच्या वर्तुळाशी जवळीक असो, आर्थिक गणिते असो किंवा जिंकून येण्याची खात्री असो, इच्छुक उमेदवारांना शिंदे यांचा पक्ष अधिक जवळचा वाटू लागला. महापालिकेत उद्धव ठाकरे गटाला पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता नाही, अशी बहुतेकांची समजूत झाली आहे. तसेच शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळापासून असलेल्या काही कार्यकर्त्यांना आतापर्यंत कधीच संधी मिळाली नाही, त्यांना एकदा तरी निवडणूक लढवायची आहे. त्यात भरीस भर म्हणून शिंदे यांच्या पक्षात गेलेले माजी नगरसेवक आणखी इतर माजी नगरसेवकांनाही आपल्या पाठोपाठ आणू लागले. त्यामुळे शिंदे गटाकडे रीघ लागल्याचे चित्र आहे. त्यात सर्वाधिक माजी नगरसेवक अर्थातच उद्धव ठाकरे गटाचे आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेत महापालिका निवडणूक लढवण्यासाठी आयते उमेदवार मिळत आहेत.
फोडाफोडी कुठवर चालणार?
उद्धव ठाकरे यांच्या गटाचे एकेक माजी नगरसेवक शिंदे यांच्या पक्षात जात असून आदल्या दिवशी पक्षाच्या बैठकीले असलेले माजी नगरसेवक, पदाधिकारी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गटात गेलेले दिसतात. त्यामुळे आता आश्चर्याचा धक्काही बसणे बंद झाले आहे. ठाकरे यांचा पक्ष रिकामा करण्याचा पण शिंदे यांनी केल्याची चर्चा आहे. भविष्यात अनेकांच्या पक्ष प्रवेशांची यादीही ठरल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे कोणालाही अडवत नाहीत. त्यामुळे जिंकण्याची खात्री नसलेले अनेक जण पक्ष सोडून जात आहेत. ठाकरे यांच्या पक्षात आपसात वाद असलेले अनेक जण आता शिंदे यांच्याकडे गेले आहेत. त्यामुळे तिकीट वाटपाच्या वेळी तिथेही वादावादी होणारच यात शंका नाही.
मुंबई महापालिकेची निवडणूक महत्त्वाची का?
गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून एकसंध शिवसेनेची मुंबई महापालिकेवर सत्ता होती. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून अंदाजे ७०,००० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असलेली मुंबई महापालिका देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे. हजारो कोटींची कंत्राटे तिच्या माध्यमातून निघतात. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती हव्या, असे सर्वच पक्षांना वाटते.
उद्धव ठाकरेंसाठी ही शेवटची संधी?
पालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत मुंबईतील मराठी माणसांनी नेहमीच शिवसेनेला साथ देत भरभरून मते दिली. महापालिकेच्या या सत्तेच्या माध्यमातून शिवसेनेचीही मुंबईवरील पकड मजबूत होत गेली आणि शिवसेनेला आर्थिक रसदही मिळत गेली. मात्र आता शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे शिवसेनेची सत्ता राहणार का, हाच मुळात प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत राज्यात चमकदार यश मिळाले. परंतु विधानसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांच्या पक्षाला अव्हेरले. तरी मुंबईत त्यांचे २० पैकी १० आमदार निवडून आले. शिवाय पक्षातही मोठी पडझड झाली. आता पक्ष टिकवायचा तर महापालिका निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळवण्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे, असे म्हटले जात आहे. ही निवडणूक या दोन पक्षांसाठी कसोटीची असेलच, पण या निवडणुकीच्या निकालावरच या दोन पक्षांची पुढची वाटचाल अवलंबून असेल हेदेखील तितकेच खरे!
indrayani.narvekar@expressindia.com