Mumbai bomb blasts 2006 मुंबईत २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने २१ जुलैला महत्त्वाचा निकाल दिला. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या निर्णयानंतर आता या कटात महत्त्वाची भूमिका असल्याचा आरोप असणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांबद्दल प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, हल्ल्यांच्या काही महिन्यांपूर्वी किमान १० पाकिस्तानी नागरिकांनी भारतात घुसखोरी केली होती.
त्यापैकी अनेकांनी १८० हून अधिक लोकांचा बळी घेणारे बॉम्ब ठेवले होते, असे म्हटले जाते. मात्र, जवळपास २० वर्षांनंतरही या हल्ल्याचे सूत्रधार बेपत्ता आहेत. त्यापैकी बहुतेक पाकिस्तानी पळून गेले आणि एक जण स्फोटात मारला गेल्याचे; तर दुसरा पोलिसांच्या चकमकीत ठार झाल्याचे म्हटले जाते. मुंबई बॉम्बहल्ल्याचा पाकिस्तानी संबंध काय होता? या प्रकरणातील पाकिस्तानी आरोपींचे काय झाले? त्याविषयी जाणून घेऊयात.
मुंबई बॉम्ब हल्ल्याचा पाकिस्तानी संबंध
- फिर्यादी पक्षाने आरोप केला होता की, ७/११ मुंबई लोकल ट्रेन स्फोटाचा मुख्य सूत्रधार आझम चीमा ऊर्फ बाबाजी हा लष्कर-ए-तैयबाशी संबंधित पाकिस्तानी नागरिक होता.
- चीमा २०१४ मध्ये मरण पावल्याचा दावा केला जातो. चीमा आणि भारतीय आरोपी, विशेषतः फैसल शेख आणि आसिफ शेख यांनी १९९९ मध्ये भारतात हल्ले घडवून आणण्यासाठी आणि भारतीय मुस्लीम तरुणांना विध्वंसक कारवायांमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी कट रचल्याचा आरोप आहे.
- मात्र, फिर्यादी पक्षाने ते कधी आणि कसे भेटले हे स्पष्ट केलेले नाही. चार्जशीटमध्ये म्हटले आहे की, चीमाने तरुणांना भारतातील मुस्लिमांवर झालेल्या कथित अत्याचारांचा बदला घेण्यासाठी, आर्थिक केंद्रांवर स्फोट घडवून आणण्यासाठी, मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेचे नुकसान करून अर्थव्यवस्थेला खिळखिळे करून दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी भारतात निधी पाठवला.

या आधारावर २००१ ते २००५ दरम्यान आता निर्दोष मुक्त झालेल्या १२ पैकी सात आरोपी म्हणजेच फैसल शेख, तनवीर अन्सारी, कमल अन्सारी, मुझम्मिल शेख, सुहेल शेख, जमीर शेख व शेख मोहम्मद अली यांनी इराणमार्गे पाकिस्तानात जाऊन विध्वंसक प्रशिक्षण घेतल्याचा आरोप आहे. प्रशिक्षणासाठी फैसल सर्वांत आधी गेला होता आणि तो अनेक वेळा गेला असल्याचे म्हटले जाते. फिर्यादी पक्षाने दावा केला आहे की, तो हाफिज सईदलाही भेटला होता. भारताच्या ताब्यात असलेला पाकिस्तानी लष्करी हवालदार तफहीम अकमल हाश्मी याने खटल्यादरम्यान खात्रीलायकपणे सांगितले होते की, तो जून किंवा जुलै २००४ मध्ये मुझफ्फराबादजवळील लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षण शिबिरात फैसलला भेटला होता.
कट कसा उलगडला?
फिर्यादी पक्षाने आरोप केला होता की, मे २००६ मध्ये चीमाने फैसल शेखला लक्ष्य केलेली ठिकाणे ओळखण्यास सांगितले होते. त्याने चीमाला सांगितले की, रेल्वेस्थानके स्फोट घडवण्यासाठी योग्य आहेत. त्याच महिन्यात अनेक पाकिस्तानींनी देशात घुसखोरी केली. कोलकाता येथील रहिवासी मोहम्मद माजिदने बांगलादेश सीमेवरून सबीर, अबू बकर, कासम अली, अम्मू जान, एहसानुल्लाह व अबू हसन या सहा पाकिस्तानी नागरिकांना बेकायदा पद्धतीने देशात आणण्याची व्यवस्था केली. त्यानंतर ते कोलकाताहून मुंबईला ट्रेनने गेले, असे फिर्यादी पक्षाने सांगितले.
त्याच महिन्यात कच्छ सीमेवरून गुजरातमध्ये आणखी चार जणांनी घुसखोरी केली. त्यामध्ये दोन पाकिस्तानी व्यक्ती म्हणजेच सलीम व अबू उमेद आणि पाकिस्तानात स्थायिक झालेले दोन भारतीय नागरिक म्हणजेच हैदराबादचा अब्दुल रझाक आणि पुणे येथील सोहेल शेख यांचा समावेश होता. आरोपी कमल अन्सारीने नेपाळ सीमेवरून अस्लम व हाफिजुल्लाह या दोन पाकिस्तानींना देशात प्रवेश मिळवून दिला होता. फिर्यादी पक्षानुसार, २००६ मध्ये मे महिन्यात स्फोट घडवण्यासाठी १० पाकिस्तानी आणि पाकिस्तानात राहणाऱ्या दोन भारतीय नागरिकांनी घुसखोरी केली होती. पाकिस्तानींपैकी एक असणारा एहसानुल्लाह १५ किलो आरडीएक्सबरोबर घेऊन आला असल्याचे मानले जाते.
२००६ च्या मुंबई ट्रेन स्फोटांमध्ये पाकिस्तानी आरोपींची भूमिका
फिर्यादी पक्षाने आरोप केला की, सर्व १२ घुसखोर मे महिन्यात मुंबईत पोहोचले. बांगलादेशमधून आलेल्या पहिल्या गटात सहा जणांचा समावेश होता. त्यांना मिरा रोड येथील आसिफ खानच्या फ्लॅटमध्ये ठेवण्यात आले होते. गुजरात सीमेवरून आलेले चार जण फैसल शेखसह वांद्रे पश्चिम येथे राहत होते आणि नेपाळमधून आलेले दोघे मिरा रोड येथील साजिद अन्सारीच्या घरात होते. त्यानंतर बॉम्बस्फोटाचे नियोजन सुरू झाले. साजिद अन्सारी, पाकिस्तानात राहणारा भारतीय सोहेल शेख आणि एका अज्ञात पाकिस्तानीसह तीन जणांनी गोवंडी येथील मोहम्मद अलीच्या घरात सात स्फोटक उपकरणे तयार केली. ही स्फोटके ८ ते १० जुलैदरम्यान तयार केली गेली.
फिर्यादी पक्षाने दावा केला की, कमल अन्सारीने पाकिस्तानी आरोपी सलीम, हाफिजुल्लाह आणि अस्लम यांच्या मदतीने माटुंगा रेल्वेस्थानकावर स्फोट घडवून आणण्यासाठी स्फोटके ट्रेनमध्ये ठेवली. नवेद खानने पाकिस्तानी अबू उमेदसोबत मिळून सांताक्रूझ आणि खार स्थानकांदरम्यान स्फोट घडवण्यासाठी ती स्फोटकं गाडीत लपवली. फैसल शेखने अबू बकरच्या संगतीने जोगेश्वरी स्थानकावर तीव्र स्फोट घडवणारी सामग्री स्थानिक गाडीत नेली. आसिफ शेखने पाकिस्तानी सबीरसोबत मिळून बोरिवली स्थानकाजवळ स्फोट घडवण्यासाठी स्फोटके तैनात केली. तर एहतेशाम सिद्दीकीने अम्मू जानसोबत मिळून मिरा रोड स्थानकावर भीषण स्फोटासाठी बॉम्ब गुपचूप ट्रेनमध्ये ठेवला. माहीम आणि वांद्रे रेल्वेस्थानकांवरही ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले; परंतु आरोपींची नावे सार्वजनिक केली गेली नाहीत.
स्फोटानंतर पाकिस्तानींचे काय झाले?
फिर्यादी पक्षाने दावा केला आहे की, स्फोटानंतर सहा पाकिस्तानींना मुंबईतील वाहिद शेखच्या घरी आश्रय देण्यात आला आणि नंतर मोहम्मद माजिदने त्यांना मुंबईतून कोणालाही सुगावा लागू न देता बाहेर काढले. फिर्यादी पक्षाने इतर पाकिस्तानींचे काय झाले हे स्पष्ट केलेले नाही. त्यांनी फक्त एवढाच दावा केला आहे की, एक पाकिस्तानी नागरिक सलीम ट्रेनमधून त्यांच्या अपेक्षेप्रमाणे वेळेवर उतरू शकला नाही म्हणून तो स्फोटात मरण पावला. तर, दुसरा फैसलाबादचा रहिवासी अबू ओसामा ऊर्फ अबू उमेद स्फोटानंतर एक महिन्याने म्हणजेच २२ ऑगस्ट रोजी मुंबई एटीएसबरोबर अँटॉप हिल येथे झालेल्या चकमकीत ठार झाला. त्याचे सर्व साथीदार कथितरीत्या पाकिस्तानात परतल्याचे सांगितले जाते.
उच्च न्यायालयाच्या निर्णयात पाकिस्तानी आरोपींबद्दल काय म्हटले आहे?
न्यायालयाने नोंद घेतली आहे की, आरोपींनी त्यांच्या कबुलीजबाबामध्ये दावा केला होता की, त्यांनी ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवण्यासाठी सात जोड्या तयार केल्या होत्या. प्रत्येक जोडीत एक स्थानिक आणि एक पाकिस्तानी होता. परंतु, दुसऱ्या आरोपीने आपल्या कबुलीजबाबामध्ये परस्परविरोधी माहिती दिली. त्याने म्हटले की, त्याला तीन पाकिस्तानींबरोबर हे काम देण्यात आले होते आणि त्यामुळे या विधानाची सत्यता संशयाच्या भोवऱ्यात आहे, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. निर्णयात असेही नमूद केले गेलेय की, बॉम्ब ठेवल्याचा आरोप असलेल्या सात जोड्यांचे संपूर्ण तपशील दिले गेले नाहीत. तसेच पाकिस्तानी कसे पळून गेले ही माहितीदेखील अद्याप समोर आलेली नाही. न्यायालयाने हेदेखील नमूद केले की, भारतीय आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही.
खंडपीठाने निरीक्षण नोंदवले आणि म्हटले, “हे सांगणे महत्त्वाचे आहे. कारण- अनेक आरोपींना तपासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात संशयित म्हणून बोलावले गेले होते आणि त्यांना अटक न करता, घरी जाऊ दिले होते. तरीही त्यातील कोणीही पळून गेले नाही.” निर्णयात असेही म्हटलेय की, फिर्यादी पक्षाने पाकिस्तानी मुंबईत कधी आले याची तारीखवार माहिती दिलेली नाही. तसेच, या पुरुषांच्या शारीरिक वर्णनाबद्दलही फारशी माहिती उपलब्ध नाही. निर्णयात आरडीएक्स मुंबईत कसे आणले गेले, याबद्दलचा कोणताही तपशील नसल्याचेही नमूद केले गेलेय.
न्यायालयाने आपल्या निर्णयात पुढे म्हटले, “१५ किलो आरडीएक्स पूर्णपणे बॉम्ब तयार करण्यासाठी वापरले गेले की काही प्रमाणात ते शिल्लक राहिले याचाही उल्लेख नाही.” जर काही प्रमाणात ते शिल्लक राहिले असेल, तर त्याचे काय झाले, असा प्रश्नही न्यायालयाकडून विचारण्यात आला. न्यायालयाने आपल्या निर्णयात पुढे नमूद केले आहे की, आरोपींनी पाकिस्तानला भेट दिली होती हा युक्तिवाद स्फोट त्यांनीच केले हे सिद्ध करण्यासाठी ठोस असा पुरावा म्हणता येणार नाही. हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आझम चीमा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या सदस्यांच्या संपर्कात होता, असा फिर्यादी पक्षाचा दावा होता, फोनचे कॉल डिटेल रेकॉर्डस् म्हणजे सीडीआरमध्ये गुन्हा सिद्ध करणारे पुरावे असल्याचे फिर्यादी पक्षाचे म्हणणे होते; परंतु फिर्यादी पक्षाने ते पुरवले नाहीत, ज्याकडे दुर्लक्ष करता येत नसल्याचे न्यायालयाने म्हटले.