Afghan Hindus, Sikhs meet Muttaqi: तालिबानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारताला दिलेल्या भेटीनंतर भारत-अफगाणिस्तान यांच्यातील संबंध चर्चेत आले आहेत. इतकंच नाही तर मुत्ताकी यांनी अफगाणिस्तान सोडून गेलेल्या शीख व हिंदूंना मायदेशी परतण्याचं आवाहन केलं आहे. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा ते व्यवसाय सुरू करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर तब्बल १५०० वर्षांपूर्वी अफगाणिस्तान मधील एका हिंदू राजाने इस्लामिक शक्तींना भारतात येण्यापासून रोखण्यासाठी जीवाची बाजी कशी लावली होती, त्या ऐतिहासिक घटनेचा हा आढावा.
‘तो’ क्षण भारतीय इतिहासात कायमचा कोरला गेला… एका गुलामाने एका राजाचा भर बाजारात लिलाव मांडला होता. शतकानुशतके भारतीय संस्कृतीचे रक्षण करणाऱ्या राजांचे रक्त सांडले आणि भारताचे प्रवेशद्वार असलेले अफगाणिस्तान आपल्या हातातून निसटले… हा इतिहास आहे, हिंदू राजवंशातील महाराजा जयपाल सिंह शाही यांचा. त्यांनी सबुक्तगीन आणि नंतर महमूद गझनीसारख्या आक्रमकांविरुद्ध जीव पणाला लावून तत्कालीन भारताच्या सीमांचे रक्षण केले.
इसवी सनाच्या ९ व्या शतकापासून भारतावर इस्लामी आक्रमणाला सुरुवात झाली. त्याच कालखंडात सबुक्तगीनने अफगाणिस्तानातील राजा जयपाल याच्यावर आक्रमण केलं होतं. त्या काळात अफगाणिस्तानमधील बहुतांश प्रदेश हिंदू आणि बौद्धांच्या ताब्यात होता. गझनीच्या सबुक्तगीनने आक्रमण करून हिंदू राजा जयपाल शाही यांना सत्तेवरून हटवले आणि हा प्रदेश ताब्यात घेतला. या प्रदेशात मुस्लिम सत्तेची बीज रोवली.
कोण होता हा सबुक्तगीन?
अबू मन्सूर नासिर अद-दीन वा-द-दौला सबुक्तगीन याने गझनवी वंशाची स्थापना केली होती. इसवी सन ९७७ ते ९९७ या कालखंडादरम्यान तो गझनींचा (अमीर) प्रमुख होता. मुख्यतः सबुक्तगीन हा एक तुर्क वंशीय गुलाम होता. त्याला सामानी वंशाच्या राजघराण्याच्या रक्षक दलाचा सेनापती अल्पतेगीन याने विकत घेतले होते. अल्पतेगीन याने इ.स. ९६२ मध्ये गझना येथे राज्यपाल म्हणून आपली सत्ता स्थापन केली, परंतु पुढच्याच वर्षी म्हणजे ९६३ मध्ये त्याचे निधन झाले. त्यानंतर सबुक्तगीनने इतर गुलाम सैनिकांमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला. अखेर इ.स. ९७७ मध्ये त्या सैनिकांनी त्याला आपला शासक म्हणून निवडले. सबुक्तगीनने विद्यमान अफगाणिस्तानच्या दक्षिण भागापर्यंत आणि बलुचिस्तानच्या उत्तर भागापर्यंत विस्तार केला. त्यामुळे त्याच्या वंशजांना भारतात येण्याचा मार्ग मोकळे झाले.
सबुक्तगीनला रोखण्यासाठी पुढाकार
अल्पतेगीनचा उत्तराधिकारी पिरेतेगीन याने इसवी सन ९७७ मध्ये हिंदू शाहीवर पहिला संघटित हल्ला केला होता. सबुक्तगीनकडे सत्ता आल्यानंतर त्याने काबूल खोऱ्यावर हल्ला करून प्रचंड लूटमार केली. सबुक्तगीन लमघान (लगमान) भागावर सतत हल्ले करत होता. त्यामुळे सावध झालेल्या राजा जयपाल यांनी सबुक्तगीनला रोखण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी इ.स. ९८६–९८७ मध्ये गझनावर मोठा सैनिकी हल्ला केला.
प्रतिकूल अटींवर तह
परंतु, या हल्ल्यात राजनैतिकदृष्ट्या अनेक त्रुटी होत्या. नियोजनाचा अभावही होता. शिवाय सतत होणाऱ्या गारपिटीमुळे सैन्य विस्कळीत झाले होते. जीव वाचवण्यासाठी जयपालाने अत्यंत प्रतिकूल अटींवर तह केला. परंतु, राज्यात परतल्यावर त्याने तह मोडला. हे पाहून संतप्त झालेल्या सबुक्तगीनने लमघानवर पुन्हा हल्ला केला.
इतर राजांची मदत
या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जयपालाने तत्काळ भारतातील इतर राजांकडून मदत मागितली. भारतातल्या वेगवेगळ्या राजांकडून त्याला मदत मिळालीही. अजमेरचे चौहान, कलिंजरचे चंदेल आणि कन्नौजचे प्रतिहार यांनी सुमारे १,००,००० सैन्य एकत्र करून गझनावर हल्ला केला. दुर्दैवाने हे संयुक्त सैन्य पराभूत झाले आणि जयपाल यांना कैद झाली. सुटकेसाठी सिंधूपर्यंतचा मोठा प्रदेश गझनवींना द्यावा लागला. अत्यंत दबावाखाली राजा जयपाल यांनी इ.स. ९९५ मध्ये राजधानी काबूलवरून उदभांडपूर (पेशावरजवळ) येथे हलवली. सबुक्तगीनच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र महमूद गझनी सत्तेवर आला. इतिहासात पहिल्यांदाच खलिफा अल-कादिर बिल्लाह याने महमूद गझनीला सुलतान ही उपाधी दिली.
अखेरची कैद
- महमूदने १५,००० घोडदळ आणि १०,००० घाझी (जिहादी योद्धे) घेऊन भारतावर आक्रमण केले. राजा जयपाल यांच्याकडे १२,००० घोडदळ, ३०,००० पायदळ आणि सुमारे ३०० हत्ती होते. जयपालाने सिंधू नदी ओलांडून महमूदचा सामना केला. परंतु, या भीषण युद्धात हिंदू शाही सैन्याचा पराभव झाला. राजा जयपाल, त्यांचे नातेवाईक आणि प्रमुख सरदार यांना कैद झाली.
- इतिहासकार अँड्र्यू बॉस्टॉम यांनी या प्रसंगाचे वर्णन करताना उत्बीचा संदर्भ दिला आहे. उत्बी (Al-Utbi) हा महमूद गझनीचा दरबारी इतिहासकार होता. त्याचे पूर्ण नाव अबू नसर मुहम्मद इब्न अब्दुल जब्बार अल-उत्बी (Abu Nasr Muhammad ibn ‘Abd al-Jabbar al-Utbi) असे होते. त्याने (‘Kitab al-Yamini’) किताब-अल-यमिनी नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने सबुक्तगीन आणि महमूद गझनी यांच्या राज्यकाळातील मोहिमा, युद्धे आणि विजयी मोहिमांची माहिती दिली आहे. याच ग्रंथात उत्बी म्हणतो,”जयपाल आणि त्याची मुले, नातवंडे, पुतणे आणि सरदारांना दोऱ्यांनी बांधून सुलताना समोर गुन्हेगारांसारखे ओढून आणले गेले.” (The Legacy of Jihad: Andrew Bostom)
- जे. एन. होडिवाला (Studies in Indo-Muslim History (Volume I & II)) यांनी उत्बी, अल-बिरुनी, फिरदौसी आणि इतर इस्लामी इतिहासकारांच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आहे. महमूद गझनीने राजा जयपाल यांना त्यांच्या मुलांसह इतर नातेवाइकांसमोर बाजारात लिलावासाठी आणले होते, असा संदर्भ होडिवाला यांनी दिला आहे.
शेवटी आत्मदहन
राजा जयपाल यांचा पुत्र आनंदपाल याने मोठी खंडणी देऊन पित्याची सुटका करून घेतली. परंतु, अपमानाने खचलेल्या राजा जयपाल यांनी चिता पेटवून आत्मदहन केले.
पित्याचा वारसा
आनंदपालाने नंतर संघर्ष सुरूच ठेवला. आनंदपालाप्रमाणे अनेक भारतीय राजांनी पाच शतकांपर्यंत इस्लामी सत्ता रोखून धरली. तरी बाराव्या शतकाच्या अखेरीस दिल्ली सल्तनतची स्थापना झाली…