आंतरराष्ट्रीय योग दिवस ( २१ जून) जगभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योगदिनी देशातील अनेक राजकीय नेते, अभिनेते, अभिनेत्री, तसेच अन्य क्षेत्रांतील दिग्गजांनी योगासने करत हा दिवस साजरा केला. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात जगातील वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींसोबत योग दिन साजरा केला. या कार्यक्रमात सर्वाधिक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. म्हणूनच या घटनेची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर गिनीज रेकॉर्ड्स काय आहे? त्यात विक्रमाची नोंद करायची असेल तर काय अटी आहेत? त्याची सुरुवात कधीपासून झाली? हे जाणून घेऊ या …

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स नेमके काय आहे?

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सची सुरुवात १९५५ सालापासून झाली. तेव्हापासून ही जगभरातील वेगवेगळ्या आणि खास रेकॉर्ड्सची नोंद ठेवणारी एक विश्वासार्ह संस्था आहे, असे मानले जाते. या संस्थेच्या ‘गिनीज बुक रेकॉर्ड्स’ पुस्तकाच्या साधारण १५० दशलक्ष प्रती विकण्यात आल्या आहेत. तसेच हे पुस्तक आतापर्यंत ४० भाषांत प्रकाशित करण्यात आलेले आहे.

Loksatta explained Why different cultural groups are losing representation in Indian advertising
विश्लेषण: जाहिरातींमधून विविधता का हरवली?
Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 
Pune Rainwater Harvesting Project lead by retired colonel shashikant Dallvi
गोष्ट असामान्यांची Video: पुण्यातील निवृत्त कर्नल शशिकांत दळवींचं ‘मिशन पाणी वाचवा!’
Listed on Roots 2 Roots Social Stock Exchange in Arts Sector
कला क्षेत्रातील ‘रूट्स २ रूट्स’ सोशल स्टॉक एक्सचेंजवर सूचिबद्ध

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सला याआधी ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या नावानेही ओळखले जाते. मानवी विक्रमांसह नैसर्गिक विक्रमांचीही त्यामध्ये नोंद केली जाते. १९५५ साली गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले. विशेष म्हणजे या पुस्तकाला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. परिणामी १९५५ साली या पुस्तकाला ब्रिटनच्या बेस्ट सेलर पुस्तकांच्या यादीत स्थान मिळाले. या पुस्तकात एकूण ६२ हजार २५२ वेगवेगळ्या विक्रमांची नोंद करण्यात आलेली आहे. जगातील सर्वांत उंच इमारत बुर्ज खलिफापासून ते सर्वांत लांब नखे असलेली महिला (ली रेडमाँड) अशा वेगवेगळ्या विक्रमांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ या पुस्तकात आहे. याआधी प्रत्येक वर्षाला छापले जाणारे एक पुस्तक एवढेच त्याचे स्वरूप होते. मात्र, आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे टीव्हीवर वेगवेगळे कार्यक्रम होतात. तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सची समाजमाध्यमांवरही खाती आहेत.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची सुरुवात कशी झाली?

गिनीज ब्रेवरी या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सर ह्यु बेवर यांना वेगवेगळ्या विक्रमांची नोंद ठेवणारे एक पुस्तक असावे, अशी कल्पना सुचली. १९५० साली ते काऊन्टी वेक्सॉर्ड येथे आपल्या मित्रांसोबत हंटिंग पार्टीला गेले होते. येथे ह्यु यांचा त्यांच्या मित्रासोबत युरोपमधील सर्वाधिक वेगवान पक्षी कोणता? या विषयावर वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तकांमध्ये संदर्भ शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना समाधानकारक उत्तर सापडले नाही. याच घटनेमुळे वादग्रस्त तथ्यांबाबत योग्य माहिती आणि उत्तरांची नोंद असलेले एक पुस्तक असावे, असे ह्यु यांना वाटू लागले. त्यासाठी त्यांनी ट्विन्स नॉरिस व रॉस मॅकव्हिर्रट या दोन संशोधकांना आमंत्रित करून अशा प्रकारच्या एका पुस्तकाची निर्मिती करण्याची विनंती केली. ट्विन्स व रॉस या दोघांनाही युरोपमधील सर्वाधिक वेगवान पक्षी कोणता, याचे निश्चित उत्तर मिळाले नाही. मात्र, त्यांनी गिनीज बुक ऑफ रेकॉर्डच्या रूपात एका पुस्तकाला जन्म दिला; जे भविष्यात चांगलेच लोकप्रिय ठरले.

गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर प्रत्येक वर्षाला नव्या विक्रमांसह हे पुस्तक प्रकाशित करण्याचे ह्यु यांनी ठरवले.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवायचे असेल, तर काय करावे?

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी काही अटी आणि नियम आहेत. मागील काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या विक्रमांची नोंद करता यावी यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

विक्रमांची नोंद करण्यासाठी, तसेच हे विक्रम करतानाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे जगभरात ७५ निरीक्षक आहेत. संबंधित विक्रम मोडण्यात आला आहे की नाही याची नोंद करण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर आहे. विक्रमाची नोंद करण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यासाठीच्या अटी काय आहेत?

  • कोणताही विक्रम मोजता यावा.
  • स्थापित केलेला विक्रम मोडण्यास वाव असावा. कोणतीही एकच व्यक्ती करू शकेल, असा विक्रम नसावा.
  • आव्हान देता येईल, तसेच इतर आव्हानकर्त्यांसाठी अटी आणि नियम घालता येणे शक्य होईल, असाच तो विक्रम असावा.
  • संबंधित विक्रम पडताळता यावा.
  • कोणत्याही एकाच गोष्टीवर हा विक्रम असावा.
  • हा विक्रम जगामध्ये सर्वोत्तम असावा.
  • २०२२ साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे एकूण १७१ देशांतून ५६ हजार लोकांनी विक्रमाची नोंद करण्याची विनंती केली होती. मात्र, यातील साधारण ७,३०० विक्रमांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सवर टीका का केली जातेय?

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडे जगभरातील लोक वेगवेगळ्या विक्रमांची नोंद ठेवणारी एक विश्वासार्ह व्यासपीठ म्हणून म्हणून पाहतात. मात्र २००८ सालापासून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने काही प्रमाणात व्यावसायिकता अवलंबली आहे. विक्रमांच्या नोंदींतून पैसे उभे करण्याचा प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सुरू केला आहे. याच कारणामुळे अनेक जण या धोरणावर टीका करतात. ब्रिटिश-अमेरिकन विनोदवीर जॉन ओलीव्हर यांनी २०१९ साली गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने हुकूमशाही सरकारकडून काही निरर्थक प्रकल्पांसाठी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स विक्रम नोंदवण्याचे प्रलोभन देऊन लोकांना धोकादायक कृती करायला लावते, असा आरोपही अनेक जण करतात.

याच वाढत्या टीकेमुळे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने आपल्या काही धोरणांत बदल केला आहे. त्यांच्या ताज्या व नव्या धोरणानुसार प्राणी, माणसांना हानी पोहोचू शकते; ज्यातून अन्नाची नासाडी होण्याची शक्यता आहे अशा विक्रमांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने विक्रमांच्या यादीतून हटवले आहे.