Was Jaisalmer ever a part of the Maratha empire?: NCERT च्या इतिहासाच्या पुस्तकांवरून सुरु झालेला वाद थांबायचं नाव घेत नाहीये. आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे. एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या नव्या पाठ्यपुस्तकात १७५९ सालचा मराठा साम्राज्याचा नकाशा दाखवला आहे. या नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर इतिहासकार नेमकं काय सांगतात याचाच घेतलेला हा आढावा.
तथ्यहीन आणि आक्षेपार्ह
एनसीईआरटीच्या इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या नव्या पाठ्यपुस्तकातील १७५९ साली मराठा साम्राज्याचा विस्तार कुठपर्यंत झाला होता, हे दाखवणारा नकाशा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. जैसलमेर संस्थानाच्या राजघराण्याचे वंशज चैतन्य राज सिंग यांनी सोमवारी (४ ऑगस्ट) या नकाशावर आक्षेप घेतला. या नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवण्यात आले असून, ही गोष्ट “ऐतिहासिकदृष्ट्या दिशाभूल करणारी, तथ्यहीन आणि अतिशय आक्षेपार्ह” असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठ्यांनी जैसलमेरमध्ये हस्तक्षेप केला नाही
“जैसलमेर संस्थानाच्या संदर्भातील कोणत्याही प्रामाणिक ऐतिहासिक स्रोतांमध्ये मराठ्यांचे वर्चस्व, आक्रमण, कर आकारणी किंवा सत्ता यांचा उल्लेख नाही. उलट, आमच्या राजघराण्याच्या नोंदींमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, मराठ्यांनी कधीही जैसलमेर संस्थानात हस्तक्षेप केला नाही,” असे त्यांनी एक्स (X) वर म्हटले आहे.
एनसीईआरटीच्या नव्या समाजशास्त्र पाठ्यपुस्तकांचे अभ्यासक्रम क्षेत्र समूहाचे अध्यक्ष मिशेल डॅनिनो यांनी अलीकडेच या आक्षेपाला प्रतिसाद देताना म्हटले की, “आमच्या नकाशातील सीमा चुकीच्या आहेत का, हे निश्चित करण्यासाठी पुढील संशोधन सुरू आहे; जर त्या चुकीच्या असतील, तर उपलब्ध सर्वोत्तम माहितीनुसार सुधारित नकाशा तयार करून पुढील आवृत्त्यांसाठी पाठवला जाईल.”
१८व्या शतकातील जैसलमेरवर कोणाची सत्ता होती?
१८व्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल साम्राज्य ऱ्हासाकडे झुकले होते. पहिले बाजीराव पेशवे यांच्या उत्तरेकडील मोहिमेला रोखण्यास मुघल असमर्थ होते, असे स्टुअर्ट गॉर्डन यांनी ‘The Marathas 1600–1818 (१९९३) मध्ये लिहिले आहे. त्या कालखंडात मराठे दख्खनमधील कधी काळी मुघलांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांतून खंडणी गोळा करत होते. गार्डन यांनी पुढे म्हटले आहे की, मराठ्यांनी राजस्थानातील काही भाग, दिल्ली आणि पंजाब परिसर, बुंदेलखंड, तसेच उडीसा, बंगाल आणि बिहारच्या काही भागांवर हल्ले केले. भोपाळच्या लढाईनंतर त्यांनी माळवा नियंत्रणाखाली आणले. बंगालवरील धाडसी हल्ले बाजीरावांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या काळात झाले. या काळातील आरंभीच्या विजयांमध्ये, मराठ्यांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांना हटवण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. उलट, स्थानिक राजेच सत्तेवर राहू दिले आणि कर गोळा करण्यासाठी जमिनदारांशी करार केले.

चौथ आणि सरदेशमुखी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक राहुल मागर यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “मराठे राजपूत प्रदेशांकडून चौथ आणि सरदेशमुखी गोळा करत होते, पण याचा अर्थ ते त्या राज्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप करत होते का? तर नाही, अनेक प्रकरणांमध्ये तसे घडले नव्हते.” ते पुढे सांगतात, आर्थिक खंडणी आणि राजकीय सत्ता यांच्यात फरक करायला हवा. “राजपूताना तसेच उडीसा आणि बंगालसारखी राज्ये आर्थिक खंडणी देत होती, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी पेशव्यांना आपले राजकीय सार्वभौम मानले.”
जैसलमेर कधीच मराठा साम्राज्याचा भाग नव्हते
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे निवृत्त इतिहास प्राध्यापक दिलबाग सिंग यांनी राजस्थानच्या इतिहासावर संशोधन केले आहे. ते म्हणाले की, मराठ्यांनी खंडणी वसूल करण्यासाठी राजस्थानातील काही भागांवर अनेक वेळा हल्ले केले.
“मराठ्यांनी दख्खनमध्ये आपली स्थिती मजबूत केल्यानंतर ते उत्तर दिशेला विस्तार करू लागले. माळवा प्रांत मराठा साम्राज्यात जोडला गेला आणि उडीसाही मराठा सत्तेच्या अंमलाखाली आले. सुरुवातीला, राजस्थानात राजपूत सरदारांनी उत्तराधिकारावरून होणारे विवाद सोडवण्यासाठी मराठ्यांना आमंत्रित केले. त्यावेळी राजपूतांनी मराठ्यांना खंडणी दिली,” असे प्रा. सिंग म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, मराठ्यांनी काही प्रदेशांवर नियंत्रण निर्माण केले असले तरी कोणतेही राजपूत राजे मराठ्यांच्या थेट राजवटीखाली आले नव्हते.
मराठ्यांचे त्या प्रदेशातील सर्व राज्यांशी संबंध सारखे नव्हते
प्रा. सिंग म्हणाले, “मराठ्यांनी जैसलमेर आणि बिकानेरवर हल्ले केले नाहीत. ते इतक्या दूरपर्यंत कधी गेलेच नाहीत. त्यांचे बहुतांश हल्ले जयपूर आणि जोधपूरपुरते मर्यादित होते.” जैसलमेरवर भाटी राजपूतांचा कारभार होता.
इतर इतिहासकारही याला सहमती देतात. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी प्रमुख प्रा. बी. एल. भदानी यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले, “मी तो धडा संपूर्ण मजकूर वाचला आहे, पण कुठेही जैसलमेर आणि जोधपूर यांची नावे आढळली नाहीत. नकाशात फक्त जयपूरचे नाव आहे. मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की जैसलमेर कधीच खंडणी देणारे राज्य नव्हते. हा नकाशा चुकीचा आहे.”
पश्चिम माळवा आणि राजस्थान
१७२८ साली बाजीराव पहिल्याने पश्चिम मालवा आणि राजस्थानातून खंडणी गोळा केली होती, त्या मोहिमेचा उल्लेख केला गॉर्डन यांनी आहे. “परंतु, बाजीराव आणि जयपूरचे जयसिंग यांच्यात मैत्री होती, त्यामुळे १७३० च्या दशकात खंडणीसाठीचा दबाव कमी झाला. बाजीरावाच्या मृत्यूनंतर, मराठा लष्कर जवळपास दरवर्षी राजस्थानात घुसखोरी करत होते,” असे त्यांनी लिहिले आहे.
मराठा प्रतिनिधींना हाकलले
गॉर्डन लिहितात, बुंदी आणि जोधपूरसारख्या उत्तराधिकाराच्या वादाच्या पार्श्वभूमीवर मराठ्यांनी या भागांवर नियंत्रण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच १७५० च्या दशकाच्या उत्तरार्धात पेशवे, शिंदे आणि होळकर यांनी प्रचंड खंडणीची थकबाकी वसूल करण्यासाठी राजस्थानात सैन्य पाठवले… पण तिथे त्यांचे कोणत्याही प्रकारचे प्रशासन अस्तित्वात नव्हते. त्यामुळे मराठा सैन्याने तो प्रदेश सोडला. तिथल्या मराठा प्रतिनिधींना हाकलण्यात आले, त्यांना कोणत्याही प्रकारची खंडणी दिली जात नव्हती.

जैसलमेरने खंडणी दिल्याचा पुरावा नाही
दिल्ली विद्यापीठाच्या प्रा. मनीषा चौधरी यांनी मध्ययुगीन राजस्थानाच्या इतिहासावर संशोधन केले आहे. त्या म्हणतात, “अधीन राज्याने नियमितपणे खंडणी द्यावी, पण अंबर-जयपूरसुद्धा नियमित खंडणी देत नव्हते, इतर कोणत्याही राज्याचा तर प्रश्नच नाही. जर कोणी तुम्हाला संपूर्ण महसूल देत नसेल आणि फक्त कधीतरी काही भेटवस्तू किंवा नजराणा पाठवत असेल, तर त्यांना अधीन राज्यांच्या श्रेणीत बसवता येत नाही… आतापर्यंत जैसलमेरने खंडणी दिल्याचा कोणताही पुरावा नाही.”
मराठा साम्राज्याचे स्वरूप
अमेरिकन इतिहासकार रिचर्ड ईटन यांनी इंडिया इन द पर्शियनट एज (२०१९) या पुस्तकात लिहिले आहे की, १७३० ते १७५० च्या दशकांत “मराठा सत्ता मध्य भारतातील बर्याच भागांत विस्कळीत होती. काही प्रदेशांवर पेशव्यांनी पूर्ण प्रशासन केले होते, तर काही ठिकाणी फारच थोडे नियंत्रण होते आणि तिथे तटबंदी असलेल्या गडांमागून मराठा सत्तेला आव्हान देणारे हट्टी जमीनदार होते.” मराठा राज्यव्यवस्थेचे स्वरूप आणि ती एक महासंघ होती का यावर अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत.
गॉर्डन यांनी लिहिले आहे की, मराठा राज्यव्यवस्थेवरील लिखाण तीन मुख्य विषयांभोवती फिरते;
१) मराठा सत्ता म्हणजे महाराष्ट्राच्या प्रादेशिक जाणीवेची उभारणी;
२) मराठा सत्ता म्हणजे मुस्लिमांच्या दडपशाहीविरुद्ध हिंदू प्रतिसाद;
३) मराठा सत्ता म्हणजे हिंदू समाजाचे स्वरूप बदलण्यासाठी आणि त्यातील सर्वात गरीब लोकांचे जीवन सुधारण्यासाठीचा एक धाडसी प्रयत्न.
ते पुढे म्हणतात, “सतराव्या आणि अठराव्या शतकातील मराठा राज्यव्यवस्था ही इतर अनेक सत्तांपैकी एक होती असे पाहणे कदाचित कमी रोमान्टिक आणि कमी वीरत्वाचे वाटेल, पण तिला परकीयांविरुद्धची प्रारंभिक राष्ट्रवादी लढाई किंवा इस्लामविरुद्धचा हिंदू धर्मयुद्ध असे पाहणे चुकीचे ठरेल.”
उत्तर भारत, वायव्य व दख्खनवर दावा
लेडी श्रीराम कॉलेजचे प्राध्यापक पंकज झा यांनी व्यापक दृष्टिकोन मांडला, “हे खरे आहे की १८व्या शतकातील मराठ्यांच्या प्रमुख कुळाने संपूर्ण उत्तर आणि वायव्य भारत तसेच दख्खनवर सार्वभौमत्वाचा दावा केला होता. परंतु त्यांचे प्रत्यक्ष नियंत्रण फार वेगवेगळे होते. अधिक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सत्ता कशी निर्माण होते हा आहे. एखाद्या कुळाने स्वत:ला महान घोषित केल्याने सत्ता निर्माण होत नाही. तसेच, आपण या किंवा त्या राजवंशाच्या मालमत्तेचा अभिमान बाळगावा (किंवा बाळगू नये) का, हा देखील विचार करण्याचा मुद्दा आहे.
चूक दुरूस्त करण्याचे मार्ग खुले आहेत
इयत्ता आठवीच्या समाजशास्त्राच्या नवीन पुस्तकात मराठ्यांवर एक पूर्ण प्रकरण आहे, तर जुन्या इतिहासाच्या पुस्तकात त्यांच्यावर फक्त एक विभाग होता. जैसलमेर आणि नकाशाबाबत, डॅनिनो यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण मराठा कालखंडावरील दोन तज्ज्ञांच्या सल्ल्याने तयार करण्यात आले आहे आणि संपूर्ण प्रकरणात (नकाशासह) कुठेही जैसलमेरचा उल्लेख नाही. नकाशा यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या नकाशांच्या आधारे तयार केला गेला असून “आमच्या माहितीनुसार, सार्वजनिक क्षेत्रात दीर्घकाळापासून असलेल्या अशा नकाशांवर यापूर्वी कधीही आक्षेप घेण्यात आलेला नाही.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले की या नकाशांमध्ये फक्त मराठ्यांच्या थेट नियंत्रणाखालील भागच नाही, तर खंडणी/कर देणारी राज्ये किंवा काही वेळा मराठ्यांशी करार असलेली राज्ये यांचाही समावेश आहे. “अशा नकाशांमध्ये एखाद्या वेळेची भूसीमा स्थिर केली जाते, पण वास्तविक परिस्थिती त्यापेक्षा कितीतरी गुंतागुंतीची, बदलती आणि वेगाने विकसित होणारी होती. एकच नकाशा मराठा साम्राज्याची संपूर्ण कहाणी मांडू शकत नाही,” असे ते लिहितात.
डॅनिनो म्हणतात, “नवीन पाठ्यपुस्तकांच्या तयारीसाठी दिलेला अत्यंत कमी वेळ प्रत्येक संबंधित प्राथमिक स्रोतावर मूळ संशोधन करण्यास परवानगी देत नाही; त्यामुळे आमच्या सहकाऱ्यांना कधीकधी प्रामाणिक आणि विद्वत्तापूर्ण मानल्या जाणाऱ्या दुय्यम स्रोतांवर अवलंबून राहावे लागते आणि आम्ही पूर्णपणे चुका दुरुस्त करण्यास तयार आहोत.”
त्यांनी हेही नमूद केले की, इयत्ता सातवीच्या पुस्तकात नकाशातील सीमा अंदाजे असल्याच्या सूचना दिल्या होती, त्याच इयत्ता आठवीच्या पुस्तकातील सर्व ऐतिहासिक नकाशांवरही असायला हव्या होत्या.
प्रा. मागर यांनी नकाशांच्या मांडणीत सूक्ष्मतेची गरज असल्याचे सांगितले. “अशा नकाशांत वेगवेगळ्या रंगछटा वापरायला हव्यात… एक थेट नियंत्रण दाखवणारी, दुसरी खंडणी देणाऱ्या राज्यांसाठी, तिसरी जिंकली पण कायम ताब्यात न राहिलेल्या प्रदेशांसाठी, आणि चौथी प्रभाव दाखवणारी रंगछटा असायला हवी होती. हा सध्याचा सर्वकाही एकाच रंगात दाखवणारा नकाशा वास्तवाशी सुसंगत नाही.”