नीट-यूजी पेपर लीक प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवले आहे. देशातील विद्यार्थ्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. अनेक विद्यार्थी आपला रोष व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, या प्रकरणात दररोज धक्कादायक तपशील समोर येत आहेत. वृत्तानुसार, बिहारमधील संजीव मुखिया हाच या पेपरफुटीच्या प्रकरणातील मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या २० वर्षांपासून त्याचे पेपरफुटी प्रकरणात वारंवार नाव आले आहे. कोण आहे संजीव मुखिया? त्यांचे राजकीय कनेक्शन काय? याविषयी जाणून घेऊ या.

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)ने नीट पेपर लीक प्रकरणात मुखिया यांच्या कथित भूमिकेवरून बिहार सरकारवर दबाव वाढवला आहे. पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार मनोज झा यांनी आरोप केला आहे की, मुखिया यांच्या पत्नीने जनता दल (युनायटेड)च्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांनी २०२४ ची नीट-यूजी परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आणि सुचवले की “एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) संस्थेला बंगालच्या उपसागरात फेकून द्यावे.” एनटीएद्वारेच नीट परीक्षा आयोजित केली जाते.

हेही वाचा : मूर्ती लहान पण किर्ती महान! कादंबरीकार आणि प्राध्यापक झाल्यानंतर आता होणार पदवीधर; कोण आहे १२ वर्षांचा चिमुरडा?

कोण आहेत संजीव मुखिया?

संजीव मुखिया यांचे खरे नाव संजीव सिंह आहे. ते बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील नागरनौसा गावचे रहिवासी आहेत. ‘न्यूज १८’च्या वृत्तानुसार, ते नालंदा कॉलेजच्या नूरसराय शाखेत तांत्रिक सहायक आहेत. मुखिया यांनी यापूर्वी सबूर कृषी महाविद्यालयात काम केले आहे. त्यांची पत्नी ममता देवी यांची भुताखर पंचायतीची प्रमुख म्हणून निवड झाली. त्यानंतर त्यांना ‘मुखिया’ म्हणून संबोधले जाऊ लागले, असे एका वृत्तात नमूद करण्यात आले आहे. देवी यांनी २०२० ची बिहार विधानसभा निवडणूक हरनौत जागेवरून (तत्कालीन संयुक्त) लोक जनशक्ती पक्षाच्या (एलजेपी) तिकिटावर अयशस्वीपणे लढवली होती, असे ‘द हिंदू’च्या वृत्तात म्हटले आहे. ‘इंडिया टुडे’नुसार, संजीव कथितपणे ‘मुखिया सॉल्व्हर गँग’चा भाग आहेत. ते गँग भरती परीक्षेतील फसवणूक आणि नीट पेपर लीकमध्ये सामील आहेत.

बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे युनिट (इओयू)च्या अधिकाऱ्याने ‘द हिंदू’शी बोलताना सांगितले की, मुखिया हे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी राहिले आहेत आणि त्यांनी पंचायत प्रमुख म्हणूनही काम केले होते. परंतु, तुलनेने त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसा आहे, असे अधिकारी पुढे म्हणाले. मुखिया यांचा मुलगा शिव कुमार हा डॉक्टर आहे आणि बिहार शिक्षक भरती परीक्षेच्या पेपर लीक प्रकरणात त्याच्या कथित भूमिकेसाठी तो सध्या तुरुंगात आहे, अशी बातमी ‘न्यूज १८’ने दिली. मुलगाही कुख्यात टोळीचा भाग असल्याची माहिती आहे.

पेपर लीक प्रकरणात मुखिया यांच्यावर यापूर्वीही आरोप झाले आहेत. खरे तर बिहार लोकसेवा आयोगाने २०१६ मध्ये घेतलेल्या कॉन्स्टेबल भरती परीक्षेच्या पेपर लीकप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्याशिवाय ते गेल्या २० वर्षांपासून पेपर लीक प्रकरणांमध्ये गुंतले आहेत.

नीट-यूजी पेपर लीक प्रकरणात मुखियाची भूमिका

प्राप्त महितीनुसार, मुखिया २०२४ च्या नीट-यूजी पेपर लीक प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत. ‘ईओयू’च्या एका अधिकाऱ्याने ‘द हिंदू’ला सांगितले की, आरोपीने प्रथम नीट प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एका प्राध्यापकाकडून त्याच्या मोबाईलवर घेतल्या. “आम्हाला माहिती मिळाली आहे की, संजीव मुखिया ऊर्फ ​​लुटान ही तीच व्यक्ती आहे; जिने प्रथम प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका त्याच्या मोबाईलवर अज्ञात प्राध्यापकाकडून घेतल्या. तो सध्या फरार असून, त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत,” असे अधिकाऱ्याने ‘द हिंदू’ला सांगितले.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही आरोपींनी उघड केले आहे की, ५ मे रोजी झालेल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पूर्वसंध्येला सुमारे २५ इच्छुकांना ‘नीट’ प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेचे वाटप करण्यात आले; त्यांच्याकडून प्रतिउमेदवार ४० लाख रुपये घेण्यात आले होते. पोलिसांनी ताब्यात घेतलेला नीट परीक्षार्थी आयुष कुमार याने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. “आयुषने कबूल केले की ५ मे रोजी झालेल्या परीक्षेच्या एक दिवस आधी शनिवारी रात्री त्याला नीट-यूजीची प्रश्नपत्रिका मिळाली होती. त्याला मिळालेली प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर वितरित करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेसारखीच असल्याचे त्याने सांगितले. आयुष पुढे म्हणाला की, त्याच्यासारख्याच २५ इतर उमेदवारांना लर्न बॉईज हॉस्टेल आणि लर्न प्ले स्कूलच्या आवारात त्यांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेची उत्तरे लक्षात ठेवण्यासाठी तयार करण्यात आले होते,” असे एका बिहार पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मुखिया फरारी आहे; मात्र तरीही त्याने निर्दोष असल्याचा दावा करीत पाटणा न्यायालयात आपल्या वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या प्रकरणातील कथित मध्यस्थ मुंगेर येथील नितीश कुमार आणि अमित आनंददेखील मुखियासाठी काम करीत असल्याचे मानले जाते, असे ‘ईओयू’ अधिकाऱ्याने ‘द हिंदू’ला सांगितले.

हेही वाचा : सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बाल यांनी विशेष विवाह कायद्यानुसार केले लग्न; काय आहे हा कायदा?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरजेडीचे आरोप

नीट पेपर लीक प्रकरणावरून आरजेडीकडून बिहार सरकारवर आरोप केला जात आहे की, विशेषत: मुखियाचे नाव समोर आल्यापासून. ‘एक्स’वर पक्षाच्या हॅण्डलने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबरोबर मुखिया यांची पत्नी ममता देवी यांची कथित छायाचित्रे शेअर केली आहेत. “पेपर लीकचा किंगपिन आणि मुख्य सूत्रधार नालंदा रहिवासी संजीव मुखिया याला कोण संरक्षण देत आहे? संजीव मुखिया यांच्या पत्नीने एनडीएसाठी निवडणूक लढवली हे खरे नाही का? त्या जेडी(यू) नेत्या होत्या. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात थेट प्रवेश नाही का?,” असे प्रश्नदेखील या पोस्टद्वारे विचारण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या सहायकावर नीट-यूजी पेपर लीकशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.