तब्बल ५००० वर्षांपूर्वी उत्तर युरोपातील लोकसंख्येत घट झाली. या भागातील शेती करणारी नवाश्मयुगीन संस्कृती नष्ट झाली. ही संस्कृती कशी नष्ट झाली हा आजवर अभ्यासकांमध्ये नेहमीच वादातीत मुद्दा राहिला आहे. नेचर जर्नलने अलीकडेच प्रकाशित केलेल्या ‘रीपिटेड प्लेग (plague) इन्फेक्शन्स अक्रॉस सिक्स जनरेशन्स ऑफ निओलिथिक फार्मर्स’ या संशोधन निबंधात उत्तर युरोपातील नवाश्मयुगीन संस्कृती नष्ट होण्यामागे प्लेग हेच प्राथमिक कारण असू शकते, असे म्हटले आहे.

हे संशोधन कसे करण्यात आले?

या संशोधनात सहभागी असणाऱ्या अभ्यासकांनी मानवी हाडे आणि दात यांच्या डीएनए परीक्षणातून हा निष्कर्ष मांडला आहे, त्यासाठी त्यांनी मानवी शरीराचे अवशेष स्कॅन्डिनेव्हियामधील प्राचीन दफनांमधून गोळा केले. हे अवशेष स्वीडनमधील फाल्बिग्डेन नावाच्या भागातून, स्वीडनच्या गोटेनबर्गजवळील किनारपट्टीवरून, डेन्मार्कमधून गोळा करण्यात आले. या परीक्षणासाठी १०८ जणांच्या अवशेषांचा अभ्यास करण्यात आला. त्यात ६२ पुरुष, ४५ महिला आणि एक अनोळखी अवशेषांचा समावेश आहे. त्यापैकी सतरा ते अठरा टक्के व्यक्तींना मृत्यूच्या वेळी प्लेग झाला होता, असे आढळले. या संशोधनात अभ्यासकांना सुमारे १२० वर्षांतील फॉल्बिग्डेनमधील ३८ जणांच्या सहा पिढ्यांमधील वंशवेल ओळखता आली. त्यातील बारा ते बत्तीस टक्के जणांचा मृत्यू प्लेगची लागण झाल्यामुळे झाला होता. जीनोमिक अभ्यासाद्वारे असे लक्षात आले की, इथल्या समाजाने प्लेगच्या तीन वेगवेगळ्या लाटा अनुभवल्या.

निष्कर्ष काय होते?

संशोधकांनी या लाटांसाठी जबाबदार असलेल्या यर्सिनिया पेस्टिस या प्लेग- उद्भवणाऱ्या जिवाणूच्या विविध जातींच्या पूर्ण जीनोमची पुनर्रचना केली. त्यातून त्यांच्या लक्षात आले की तिसऱ्या लाटेत जिवाणूचा प्रादुर्भाव जास्त होता. या काळात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला. आणि या रोगाने महासाथीचे रूप धारण केले. फ्रेडरिक सीरशोल्म हे कोपनहेगन विद्यापीठातील अनुवंशशास्त्रज्ञ आहेत आणि या संशोधनातील ते प्रमुख लेखकही आहेत. ते सांगतात, या संशोधनातून एक महत्त्वाची बाब समजली ती म्हणजे नवाश्मयुगीन प्लेग हा नंतरच्या कालखंडातील सर्व प्लेगचा पूर्वज आहे. याच नवाश्मयुगीन प्लेगचा जिवाणू इसवी सनाच्या ६ व्या शतकातील जस्टिनियन प्लेग आणि १४ व्या शतकातील ब्लॅक डेथसाठी कारणीभूत होता. त्याच जिवाणूने युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेला उद्ध्वस्त केले. उत्तर निओलिथिक कालखंडातील जिवाणू हा नंतरच्या कालखंडातील प्लेगचा पूर्वावतार असल्याने सद्यस्थितीतील प्लेनची दिसणारी लक्षणे आणि तत्कालीन लक्षणे यात लक्षणीय फरक असावा. त्यावेळची लक्षणे वेगळी असावीत, असे संशोधकांना वाटते आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संशोधनासाठी निवडलेल्या क्षेत्रात प्लेगचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे. कोपनहेगन विद्यापीठातील अनुवंशशास्त्रज्ञ आणि या शोध निबंधाचे सह-लेखक मार्टिन सिकोरा सांगतात, ‘प्लेगचा झालेला हा प्रसार असे सूचित करतो की, या भागातील नवाश्मयुगीन संस्कृतीचा ऱ्हास होण्यासाठी प्लेगच कारणीभूत ठरला. निओलिथिक किंवा नवाश्मयुगात मानव शिकारीकडून स्थायी शेतीकडे आणि पशुपालनाकडे वळला. उत्तर युरोपमधील निओलिथिक लोकसंख्येचा ऱ्हास सुमारे इसवी सनपूर्व ३३०० ते २९०० या दरम्यान झाला. तोपर्यंत, इजिप्त आणि मेसोपोटेमियासारख्या ठिकाणी शहरे आणि अत्याधुनिक संस्कृती आधीच निर्माण झाली होती. या काळात स्कॅन्डिनेव्हिया आणि वायव्य युरोपमधील लोकसंख्या पूर्णपणे नाहीशी झाली. फक्त नंतरच्या काळात त्यांची जागा सध्याच्या युक्रेनच्या गवताळ प्रदेशातून स्थलांतरित झालेल्या यमनाया लोकांनी घेतली, ते आधुनिक उत्तर युरोपीय लोकांचे पूर्वज आहेत.