Cholesterol Health: काही वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका (हार्ट अटॅक) येणे अगदी दुर्मीळ होते. मात्र, आता अगदी कमी वयातही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. तिशीच्या आतल्या व्यक्तींनाही हृदयविकाराचा झटका येऊन, मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यापैकी अनेक घटनांसाठी शरीरातील अनियंत्रित कोलेस्ट्रॉलची पातळी कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे सांगणे आहे. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. आता संशोधन सुरू असलेल्या एका नव्या गोळीमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी लक्षणीयरीत्या कमी होऊ शकेल, असे अलीकडील चाचण्यांमध्ये दिसून आले आहे.

तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन किंवा एलडीएल) यकृतामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करणाऱ्या ‘स्टॅटिन’ नावाच्या औषधाचे सेवन करूनही कमी होत नसेल, तर आता ही नवी गोळी पर्याय ठरू शकते, असे तज्ज्ञांचे सांगणे आहे. संशोधन सुरू असलेली नवी गोळी (Experimental pill) स्टॅटिन या औषधासह दिल्यास फेज ३ क्लिनिकल चाचण्यांमध्ये कोलेस्ट्रॉलच्या प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे दिसून आले आहे. कशी आहे ही नवीन गोळी? खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात ही गोळी कशी प्रभावी ठरेल? त्यामुळे हार्ट अटॅक कमी होणार का? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…

खराब कोलेस्ट्रॉल किती घातक? नवी गोळी कशी ठरेल प्रभावी?

  • कोलेस्ट्रॉल हे मेणासारखे असतो, जे शिरांमध्ये साचत जाते. कोलेस्ट्रॉलचे एकूण दोन प्रकार असतात. एक म्हणजे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (एलडीएल) किंवा वाईट कोलेस्ट्रॉल आणि हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) किंवा चांगले कोलेस्ट्रॉल.
  • रक्तात एलडीएलची पातळी जास्त असल्यास धमन्यांमध्ये (Arteries) ‘प्लेक’ जमा होण्याचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
  • मॅक्स हेल्थकेअरचे हार्ट सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ. बलबीर सिंग सांगतात, “एन्लिसिटाइड हे नवीन औषध यकृतामधील PCSK9 नावाचे प्रथिन ब्लॉक करतात. एकदा PCSK9 ब्लॉक झाले की, एलडीएलची पातळी वेगाने खाली येते.”

ते पुढे सांगतात, “सध्या, इव्होलोक्युमॅबसारखे काही PCSK9 इनहिबिटर (भारतातही उपलब्ध आहेत) इंजेक्शनद्वारे वापरले जातात. हे इंजेक्शन दर दोन आठवड्यांनी किंवा दर महिन्याला दिले जाते. त्याचे प्रमाण रुग्णाच्या एकूण स्थितीवर ठरते. त्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलमध्ये ७० टक्क्यांपर्यंत घट होते आणि हृदयविकाराचा धोकाही कमी होतो हे सिद्ध झाले आहे. रोजची गोळी इंजेक्शनपेक्षा अधिक सोईची ठरेल; परंतु हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करण्याच्या परिणामाची आपल्याला वाट पाहावी लागेल,” असे मत डॉ. बलबीर सिंग व्यक्त करतात.

चाचण्यांमध्ये काय दिसून आले?

फेज ३ चाचणीच्या आकडेवारीनुसार, ज्या लोकांनी त्यांच्या नियमित कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या औषधांसह (उदा. स्टॅटिन) तपासणीच्या टप्प्यातील एन्लिसिटाइड औषध घेतले, त्यांच्या खराब कोलेस्ट्रॉलमध्ये २४ आठवड्यांच्या दैनंदिन उपचारानंतर ६० टक्क्यांपर्यंत घट दिसून आली, अशी माहिती परिणामांच्या एका पत्रकात देण्यात आली आहे. या अभ्यासातील सर्व सहभागी लोकांमध्ये खराब कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त होती. त्यांच्यापैकी काहींना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी मोठ्या घटनांचा इतिहास होता किंवा त्यांना त्याचा धोका जास्त होता.

या चाचणीत २,९१२ प्रौढ सहभागी झाले होते, ज्यांचे सरासरी वय ६३ होते. ऑगस्ट २०२३ ते जुलै २०२५ दरम्यान १४ देशांमधून डेटा गोळा करण्यात आला. हे निष्कर्ष अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या वैज्ञानिक सत्रांमध्ये सादर करण्यात आले. एन्लिसिटाइड तयार करणारी औषध कंपनी ‘मर्क’ पुढील वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)कडे मंजुरीसाठी अर्ज करणार आहे.

केवळ या गोळ्या घेतल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होणार का?

‘स्टॅटिन’मुळे खराब कोलेस्ट्रॉलमध्ये ४० टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, जी काही रुग्णांसाठी पुरेशी नसते. त्यांना अतिरिक्त मदतीची गरज असते. “ही स्थिती हायपरकोलेस्टेरोलेमियामुळे असू शकते, जो एक आनुवंशिक विकार आहे आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी खूप वाढते. अशा वेळी स्टॅटिनचे डोसही त्याचे प्रमाण कमी करू शकत नाहीत. कधी कधी इतर शिफारस केलेली (प्रीस्क्राइब्ड) औषधे किंवा पूरक आहारामुळेही ”स्टॅटिनची कार्यक्षमता खुंटते. तसेच, कधी कधी थायरॉईड, यकृत किंवा मूत्रपिंडांच्या समस्यांमुळेही असे होऊ शकते,” असे बंगळूरु येथील स्पर्श हॉस्पिटल्सचे प्रमुख कार्डिओलॉजिस्ट व वैद्यकीय संचालक डॉ. रंजन शेट्टी यांनी सांगितले.

त्याशिवाय, PCSK9 इनहिबिटर आणि स्टॅटिनची कार्यपद्धती वेगळी आहे. “PCSK9 इनहिबिटर रक्तातून एलडीएल साफ करते. दुसरीकडे स्टॅटिन यकृतामधील एका एन्झाइमला ब्लॉक करते, ज्यामुळे यकृत शरीरातून अधिक एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर काढते. त्यामुळे काही गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये दोन्ही यंत्रणा एकत्र काम करीत असल्याने त्यांचा प्रभाव वाढतो,” असे डॉ. शेट्टी म्हणतात.

डॉ. सिंग सांगतात, “या गोळ्या नेहमी स्टॅटिनबरोबर घ्याव्या लागतील. कारण- स्टॅटिन हे औषधच मुख्य कार्य करते. हा त्या औषधाला पर्याय नाही.” इंजेक्शन महागडी आहेत; परंतु गोळीमुळे खर्च कमी होईल आणि ती सर्वांसाठी सहज उपलब्ध होईल, अशी आशा त्यांना आहे. “मी या संशोधनाचा मागोवा घेत आहे. लहान रेणू इंजेक्शनइतकेच प्रभावी करणे हे आव्हान होते. दशकभराच्या संशोधनानंतर त्यांनी ते साध्य केले आहे,” असे डॉ. सिंग म्हणतात. फ्रिजमध्ये ठेवाव्या लागणाऱ्या इंजेक्शनपेक्षा गोळ्या अधिक सोईस्कर असतील, असेही ते सांगतात.