भक्ती बिसुरे

करोना महासाथीला सुरुवात होताच संपूर्ण जगाचे सर्वाधिक लक्ष लागलेली गोष्ट म्हणजे लसीकरण होय. देशात जानेवारी २०२१ पासून टप्प्याटप्प्याने सुरू झालेले प्रौढांचे लसीकरण आता बालकांच्या लसीकरणापर्यंत येऊन पोहोचले आहे. केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) मुलांच्या लसीकरणासाठी तीन लशींना तातडीच्या वापराचा परवाना (इमर्जन्सी यूज ऑथरायजेशन) देऊ केला आहे. त्यामुळे लवकरच ५ वर्षांवरील मुलांनाही करोना लशीचे सुरक्षाकवच मिळणार आहे.

कोणता वयोगट, कोणत्या लशी?

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी मुलांच्या लसीकरणासाठी तीन नव्या लशींना केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिल्याचे ट्विटरवरून जाहीर केले. कोव्हॅक्सिन लशीचा वापर सहा ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी करण्यास केंद्रीय औषध महानियंत्रक कार्यालयाने परवानगी दिली आहे. कोर्बिव्हॅक्स ही लस पाच ते १२ वर्षे वयोगटासाठी तर झायडस कंपनीची झायकोव्ह-डी ही लस १२ वर्षांवरील मुलांसाठी वापरणे सुरक्षित असल्याचे चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लवकरच मुलांच्या लसीकरणाचा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे.

लसीकरण मोहिमेचा प्रवास

मागील वर्षी १६ जानेवारी २०२१ ला देशभरामध्ये करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेतील कर्मचारी आणि डॉक्टर, दुसऱ्या टप्प्यात सर्व आघाडीच्या क्षेत्रात काम करणारे म्हणजेच फ्रंटलाईन वर्कर्स यांचे लसीकरण सुरू झाले. तिसऱ्या टप्प्यात साठ वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधीग्रस्तांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. चौथ्या टप्प्यात १८ वर्षांवरील सर्वांसाठी करोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. त्यानंतर सुरू झालेल्या टप्प्यात १५ ते १८ वर्षांच्या मुलांचा अंतर्भाव लसीकरण मोहिमेत करण्यात आला. दरम्यान मार्च २०२२ मध्ये १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु झाले. आता ५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा टप्पा लवकरच सुरू होणे शक्य आहे.

नवा लसीकरण टप्पा कधी आणि कोणासाठी?

करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यापासून लहान मुलांच्या लसीकरणाकडे सर्वांचे, विशेषतः पालकांचे लक्ष लागले होते. मात्र, मुलांमध्ये करोना संसर्गाची तीव्रता अत्यंत सौम्य असल्याने मोठ्या माणसांसाठी लशींचे संरक्षण पुरवणे सर्वाधिक महत्त्वाचे होते. तसेच, मोठ्या माणसांवर लस संपूर्ण सुरक्षित आहे, हे सिद्ध झाल्यानंतरच मुलांवर लशीच्या चाचण्या करणे शक्य होते. त्यामुळे कोव्हॅक्सिन, कोर्बिव्हॅक्स आणि झायकोव्ह डी या तिन्ही लशींच्या मुलांवरील चाचण्यांमधून त्यांची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिद्ध झाल्यानंतर आता त्यांच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच ५ वर्षांवरील मुलांसाठी लसीकरणाचा टप्पा सुरू होणे शक्य आहे. मात्र, हा टप्पा कधी सुरू होणार याबाबत केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्रालयाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या बरोबरीनेच आता ५ ते १२ वर्ष या वयोगटातील मुलांचेही लसीकरण सुरू होत असल्याने मुलांच्या पालकांसाठी ही गोष्ट दिलासादायक ठरणार आहे.

लसीकरणाचा तपशील काय?

हैदराबादच्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस सहा ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी वापरली जाणार आहे. बायोलॉजिकल ई लिमिटेडकडून तयार करण्यात आलेली कोर्बिव्हॅक्स ही लस पाच ते १२ वर्षे वयोगटासाठी तर झायडस कंपनीची झायकोव्ह-डी ही लस १२ वर्षांवरील मुलांसाठी वापरली जाणार आहे. लशीच्या किती मात्रा, त्यांमध्ये किती अंतर याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. देशात सध्या सुरू असलेल्या १५ वर्षांवरील मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन ही लस वापरण्यात येत आहे. १२ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांसाठी हैदराबादमधील बायोलॉजिकल ई लिमिटेड या कंपनीने तयार केलेली कोर्बिव्हॅक्स ही लस वापरण्यात येत आहे. कोर्बिव्हॅक्स ही संपूर्णपणे भारतात विकसित करण्यात आलेली पहिली रिसेप्टर बायंडिंग डोमेन प्रोटिन प्रकारातील लस आहे. २१ फेब्रुवारीला भारतीय औषध महानियंत्रक कार्यालयाने लशीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली असून २८ दिवसांच्या अंतराने दोन मात्रा या स्वरुपात इंजेक्शनद्वारे ही लस टोचली जाणार आहे.

नावनोंदणी आवश्यक आहे का?

बालकांच्या लसीकरणासाठी नावनोंदणी करण्याबाबत कोणतेही स्पष्ट संकेत देण्यात आलेले नाहीत. मात्र, इतर सर्व वयोगटांप्रमाणेच कोविन संकेतस्थळावर तसेच थेट लसीकरण केंद्रावर नाव नोंदणी करून हे लसीकरण होण्याची शक्यता आहे.

लशीच्या सुरक्षिततेचे काय?

भारतात सुरू असलेल्या करोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सिन आणि कोर्बिव्हॅक्स या दोन्ही लशी वापरात आहेत. त्यामुळे या लशींच्या सुरक्षिततेबद्दल कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही. आता, ५ ते १२ वर्ष वयोगटांसाठीही या लशी सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतरच त्यांच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. झायडस कंपनीच्या झायकोव्ह डी या लशीनेही १२ वर्षांवरील वयोगटात उत्तम परिणाम दाखवल्याने तिचा वापर सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.

तात्पुरते परिणाम होऊ शकतात काय?

मुलांना दिल्या जाणाऱ्या कोणत्याही लशींचे दिसतात तसे सौम्य परिणाम या लशींचे दिसणेही स्वाभाविक आहे. यामध्ये लस टोचलेल्या जागी लाल होणे, किंचित सूज किंवा दुखणे, सौम्य ताप, अंगदुखी असे त्रास दिसणे शक्य आहे. हे सर्व त्रास लस घेतल्यानंतर दिसणारे सामान्य परिणाम असून त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. लस देतानाच या संभाव्य परिणामांवर काय औषधोपचार घ्यायचे हे डॉक्टर सांगतील, त्यापलीकडे जाऊन घरगुती औषधोपचार करू नये, असे आवाहन ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर यांनी केले आहे.

bhakti.bisure@expressindia.com