देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा सातवा म्हणजेच शेवटचा टप्पा बाकी आहे. या कालावधीत पंजाबमध्येही मतदान होणार आहे. पंजाबमध्ये प्रदीर्घ काळापासून सत्तेत असलेला शिरोमणी अकाली दल पुन्हा आपली गमावलेली ताकद परत मिळवण्याच्या प्रचारात व्यस्त आहे. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सर्वत्र एक प्रमुख पोस्टर झळकावले जात आहेत. यामध्ये ऑपरेशन ब्लू स्टारनंतर सुवर्ण मंदिरात झालेल्या अकाल तख्तचे चित्र पाहायला मिळत आहे. हे चित्र दाखवत बादल यांनी मतदारांना १ जूनला मतदान करताना काँग्रेसने १९८४ मध्ये काय केले हे लक्षात ठेवण्याचे आवाहन केले आहे.
खरं तर १ जून हा दिवस राज्याच्या अलीकडच्या इतिहासावर आणि राजकारणावर परिणाम करणाऱ्या दोन महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार राहिलेला आहे. ४० वर्षांपूर्वी १ जून रोजीच अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातून खलिस्तानी अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन ब्लू स्टार राबवले होते. शिखांच्या पवित्र मंदिरावरील हल्ल्यामुळे भारताच्या पंतप्रधानांच्या हत्येसह रक्तरंजित घटनांची मालिका सुरू झाली. दिल्ली आणि इतर ठिकाणी समुदायाच्या सदस्यांविरुद्ध अभूतपूर्व संघटित हिंसाचार उफाळून आला. त्याच्या अनेक वर्षांनंतर १ जून रोजीच शिखांचे गुरू मानले जाणारे गुरू ग्रंथ साहिब (सारूप)ची एक प्रत फरीदकोटमधील गुरुद्वारातून चोरीला गेली, ज्यामुळे त्याचा पंजाबवर खोलवर परिणाम झाला आणि एकामागोमाग एक अपवित्र घटना घडल्या.
१ जून १९८४ : ऑपरेशन ब्लू स्टार
कॅबिनेट मंत्री प्रणव मुखर्जींसह विविध स्तरांवरच्या नेत्यांचा आक्षेप असतानाही इंदिरा गांधींनी मे १९८४ च्या मध्यात सुवर्ण मंदिरावर लष्करी कारवाईला परवानगी दिली. २९ मेपर्यंत मेरठमधील नवव्या पायदळ तुकडीतील सैन्य पॅरा कमांडोच्या पाठिंब्याने अमृतसरला पोहोचले. आतंकी विचारसरणीचे विचारवंत जर्नेलसिंग भिंद्रावाले आणि मंदिरात तळ उभारलेल्या त्यांच्या अनुयायांना हुसकावून लावण्याचे त्यांचे ध्येय होते.
१ जून रोजी मंदिराजवळील खासगी इमारतींवर दबा धरून बसलेले अतिरेकी आणि CRPF जवान यांच्यात झालेल्या गोळीबारात ११ नागरिकांचा मृत्यू झाला होता. ऑपरेशन ब्लू स्टार १० जूनपर्यंत चालले आणि त्याचा तिथल्या जनजीवनावर मोठा विपरीत परिणाम झाला. या कारवाईत शिखांचे महत्त्वाचे आसन असलेले अकाल तख्त नष्ट झाले. लष्कराच्या अहवालात चार अधिकारी आणि ७९ सैनिकांसह ५५४ मृत्यूंची यादी होती, परंतु बळींमध्ये अनेक यात्रेकरूंसह वास्तविक मृत्यूची शक्यता जास्त होती. या कारवाईत भिंद्रावाले मारला गेला. ऑपरेशन ब्लू स्टारने पंजाब आणि भारताच्या राजकारणावर मोठी काळी छाया सोडली. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींची त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी हत्या केली, ज्यामुळे जमाव भडकला आणि एकट्या दिल्लीत २१४६ लोक मारले गेले. १९८५ मध्ये देशातील सर्वात जुना प्रादेशिक पक्ष असलेल्या अकाली दलाचे नेते संत हरचंद सिंग लोंगोवाल यांची पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी शांतता करारावर स्वाक्षरी केल्याच्या एका महिन्याभरातच ही हत्या करण्यात आली. त्यानंतर पंजाबमध्ये हिंसाचार आणि अस्थिरतेचे काळे वादळ सुरू झाले.
हेही वाचाः विष्ठा आणि कचर्याने भरलेले फुगे उत्तर कोरिया कुठे पाठवतोय? हे संपूर्ण प्रकरण काय? जाणून घ्या…
ऑपरेशन ब्लू स्टार आजही पंजाबच्या राजकारणातील इतिहासात एक प्रभावी घटक मानला जातो. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल काँग्रेसविरोधातील रोष ओढवून घेण्याच्या प्रयत्नात प्रत्येक निवडणूक रॅलीत अकाल तख्तचे नुकसान झाल्याचे चित्र दाखवतात. आप आणि भाजपा मतदारांना इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांवर झालेल्या हिंसाचाराची आठवण करून देत आहेत. परंतु अनेक शीख मतदार मात्र त्यासाठी काँग्रेसच्या सध्याच्या नेतृत्वाला जबाबदार धरत नाहीत. राहुल गांधी यांनी अनेक वेळा सुवर्ण मंदिरात सेवा केली आणि काँग्रेसला निवडणुकीत चांगले यश मिळण्याची आशा आहे.
१ जून २०१५ : पवित्र ग्रंथ गेला चोरीला
फरीदकोटच्या बुर्ज जवाहर सिंगवाला येथील गुरुद्वारातून गुरू ग्रंथ साहिबचे सारूप गायब झाल्यानंतर संपूर्ण पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली होती. गुरुद्वाराच्या पाठीमागे एका पाण्याच्या तलावातही शोध घेण्यात आला, परंतु सारूप सापडले नाही. ऑक्टोबर २०१५ मध्ये बारगारी गुरुद्वाराच्या बाहेर रस्त्याच्या पलीकडे चोरीला गेलेला सारूप सापडला होता. त्यामुळे पंजाबमध्ये अशांतता आणखी वाढली अन् पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. गेल्या काही वर्षांमध्ये पंजाबमध्ये १०० हून अधिक अपवित्र घटनांची नोंद झाली आहे. खरं तर पंजाबमध्ये अपवित्रतेचा मुद्दा अत्यंत संवेदनशील आहे आणि २०१५ पासून त्याने राज्याच्या राजकारणावर महत्त्वपूर्ण छाप सोडली आहे. सलग दोन कार्यकाळ सत्तेत राहिल्यानंतर अकाली दलाचा २०१७ च्या निवडणुकीत मोठा पराभव झाला, जेव्हा ते विधानसभेच्या ११७ पैकी केवळ १५ जागा जिंकू शकले. त्यानंतर सत्तेवर आलेले काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना विरोधाचा सामना करावा लागला आणि २०२१ मध्ये त्यांचे पक्ष सहकारी नवज्योत सिंग सिद्धू यांनी २०१५ च्या खटल्यातील आरोपींना न्याय देण्यासाठी पुरेसे काम न केल्याचा आरोप केल्यानंतर त्यांची बदली झाली. गेल्या डिसेंबरमध्ये सुखबीर सिंग बादल यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अपवित्र घटनांबद्दल माफी मागितली होती. सतत राजकीय परिणामांसह हा मुद्दा संवेदनशील झाला आहे. २०२२ मध्ये पंजाब विधानसभेने गुरू ग्रंथ साहिब आणि इतर धार्मिक ग्रंथांच्या अपमानासाठी जन्मठेपेची तरतूद करणारे विधेयक मंजूर केले.