Deadliest landslide Sudan आफ्रिकन देश सुदानमध्ये भूस्खलनात १००० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. सुदानमधील दारफूर प्रदेशात झालेल्या विनाशकारी भूस्खलनात संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले आहे. आधीच गृहयुद्धाने त्रस्त असलेल्या आफ्रिकेतील ईशान्येकडील देशात या विध्वंसामुळे काही भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ५० दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या या राष्ट्राला संघर्षांचा मोठा इतिहास आहे. त्यातील एका संघर्षामुळे २०११ मध्ये दक्षिण सुदानची निर्मिती झाली. आफ्रिकेत दरवर्षी पुरामुळे शेकडो लोकांचा मृत्यू होतो. गेल्या काही वर्षांत हवामान बदलामुळे पाऊस आणि पुरामुळे अधिक विध्वंस होत आहे. काही भागात दुष्काळ तर काही भागात पूर, अशी सुदानची परिस्थिती आहे. परंतु, सुदानमध्ये नक्की काय घडलं? भूस्खलनामुळे १००० हून अधिक जणांचा मृत्यू कसा झाला? सुदानमधील एकूण परिस्थिती काय? जाणून घेऊयात…
सुदानमधील या विध्वंसाचे कारण काय?
- अनेक दिवसांच्या मुसळधार पावसानंतर रविवारी झालेल्या भूस्खलनाने राजधानी खार्तूमच्या पश्चिमेला ९०० किलोमीटर (५६० मैल) पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या मार्राह पर्वतातील ‘तारासिन’ गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.
- या भागावर नियंत्रण असलेल्या ‘सुदान लिबरेशन मूव्हमेंट-आर्मी’ या बंडखोर गटाच्या म्हणण्यानुसार, यात किमान १,००० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि केवळ एक व्यक्ती या घटनेत वाचू शकली आहे.

‘सुदान लिबरेशन मूव्हमेंट-आर्मी’ या गटाचे प्रवक्ते मोहम्मद अब्देल-रहमान अल-नायर यांनी सांगितले की, शोध मोहीम सुरू असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुमारे १०० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सुदानमधील संयुक्त राष्ट्रांचे (यूएन) समन्वयक लुका रेंदा यांनी स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार सांगितले, “३०० ते १,००० लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला असावा.” ज्या ठिकाणी ही घटना घडली ते गाव मार्राह पर्वतांमध्ये वसले होते. या ठिकाणी पोहोचणेदेखील अवघड आहे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असलेला हा परिसर ज्वालामुखीच्या प्रदेशात आहे आणि त्याची उंची ३,००० मीटर (९,८४० फूट) आहे.
सुदानचा इतिहास आणि या घटनांचा संबंध काय?
हे भूस्खलन सुदानमधील पूर हंगामाच्या काळात घडले आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या मते, सुदानच्या इतर भागांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. त्यात दक्षिण दारफूर प्रांतातील ‘सोफिया’ गावाचा समावेश आहे. या गावात रविवारी १०० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. एप्रिल २०२३ मध्ये, सुदान लष्कर आणि निमलष्करी ‘रॅपिड सपोर्ट फोर्सेस’ (आरएसएफ) यांच्यातील वाढत्या तणावामुळे राजधानी खार्तूम आणि देशाच्या इतर ठिकाणी रस्त्यांवर मारामारी सुरू झाली आणि सुदानमध्ये अराजकता पसरली. हे युद्ध आता प्रादेशिक प्रॉक्सी संघर्षात बदलले आहे, जिथे दोन्ही बाजूंना परदेशी सरकारांचा पाठिंबा आहे.
संघर्षाने त्रस्त असलेल्या आणि २१ व्या शतकातील पहिला नरसंहार पाहिलेल्या दारफूरला चालू असलेल्या युद्धाचा सर्वाधिक फटका बसला. लष्कराने खार्तूम आणि ओमदुर्मन ताब्यात घेतल्यानंतर निमलष्करी दलांना मोठा धक्का बसला. ही लढाई दारफूर आणि दक्षिण-मध्य कोरडोफान प्रदेशात झाली आहे. या युद्धात मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले, सामूहिक हत्या करण्यात आल्या आणि बलात्कार झाले. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) दारफूरमध्ये घडलेल्या गुन्ह्यांची चौकशी करत असल्याचे म्हटले आहे.
बहुतेक अत्याचारांसाठी ‘RSF’ ला जबाबदार धरले गेले आणि अमेरिकेच्या माजी बायडेन प्रशासनाने या संघटनेवर नरसंहाराचा आरोप केला आहे. लष्करावरही आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ‘RSF’वर २००० च्या दशकातील दारफूर संघर्षात नरसंहाराचा आरोप होता. या युद्धात हजारो लोक मारेले गेले आणि १.४ कोटी लोकांना पलायन करावे लागले. त्या देशातील ४० लाखांहून अधिक लोक शेजारच्या देशांमध्ये गेले आहेत, ज्यापैकी काही देश आधीच संघर्ष किंवा आर्थिक संकटांनी ग्रासलेले आहेत. या युद्धामुळे या भागात जगातील सर्वात मोठे मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सुदानमधील हे परिसर दुर्लक्षित राहिले आहे आणि वारंवार याठिकाणी अशा घटना घडत आहेत.
सुदानमध्ये गेल्या १५ वर्षांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यात दक्षिण सुदान, सोमालिया आणि गाझापट्टीचाही समावेश आहे. दारफूर आणि कोरडोफानमधील पाच दुष्काळग्रस्त भागांमध्ये आणखी काही भागांचा समावेश होण्याची शक्यता आहे. मार्राह पर्वतांसारखे अनेक भाग आणि दारफूर व कोरडोफानचे इतर भाग संघर्ष, नाकेबंदी आणि लुटालूटीमुळे दुर्गम झाले आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या मते, किमान २.५ कोटी लोक (देशाच्या निम्म्या लोकसंख्या) तीव्र उपासमारीला तोंड देत आहेत. त्यात ३६ लाखांहून अधिक कुपोषित मुलांचा समावेश आहे.
गेल्या दोन वर्षांत कॉलरा, मलेरिया आणि डेंग्यूसारख्या जीवघेण्या रोगांच्या साथीही पसरल्या आहेत. स्थानिक मदत गटाच्या मते, दारफूरमध्ये सुरू असलेल्या कॉलराच्या साथीने सुमारे ४०० लोकांचा बळी घेतला आणि ९,००० हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मार्चमध्ये व्हाईट नाईल प्रांतात झालेल्या साथीच्या आजाराने सुमारे १०० लोकांचा मृत्यू झाला आणि २,७०० हून अधिक लोकांना संसर्ग झाला.