संतोष प्रधान

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटात सध्या जोरदार रस्सीखेच सुरू होती. निवडणूक आयोगाने चिन्ह तूर्त गोठवले असले, तरी त्यासाठी दोन्ही बाजूंचा लढा सुरूच राहील. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह असेच वादात सापडले होते. हे चिन्ह आम्हाला मिळावे किंवा गोठवावे, अशी मागणी झाली होती. शेवटी सुनावणी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व हे शरद पवार यांच्याकडे कायम राहिले व घड्याळ हे चिन्हही राष्ट्रवादीकडे कायम राहिले. तेव्हा शरद पवार यांना पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि पक्ष संघटनेत अधिक समर्थन असल्याचा दावा निवडणूक आयोगाने मान्य केला होता. शिवसेनेत सध्या हाच कळीचा मुद्दा ठरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चिन्हावरून काय वाद झाला होता ?

सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित करीत शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसमध्ये बंड केले. १९९९मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यांना संगमा आणि तारिक अन्वर यांनी साथ दिली होती. २००४च्या लोकसभा निवडणुकीत सोनिया गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शरद पवार यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसप्रणित यूपीएमध्ये राष्ट्रवादी पक्ष सामील झाला. पी. ए. संगमा यांनी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यास विरोध दर्शविला होता. संगमा यांच्या नेतृत्वाखालील गटाने शरद पवार यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आणि अध्यक्षपदी संगमा यांनी स्वत:ची नियुक्ती केली. यानंतर पक्षाध्यक्ष म्हणून घड्याळ चिन्ह आपल्याला मिळावे, असा दावा संगमा यांनी केला होता. शिवसेनेत चिन्हाचा सध्या वाद सुरू आहे. तशीच कायदेशीर लढाई तेव्हा राष्ट्रवादीत झाली होती. संगमा यांनी पक्षावर दावा केला होता.

विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?

निवडणूक चिन्हावर तेव्हा काय निर्णय झाला होता?

शिवसेनेप्रमाणेच तेव्हा राष्ट्रवादीत लोकप्रतिनिधी कोणत्या गटाकडे जास्त यावर युक्तिवाद झाला होता. संगमा यांना ईशान्येकडील राज्यांमधील लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळाला होता. तर महाराष्ट्रासह अन्य राज्यांमधील खासदार-आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या समर्थनार्थ प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. निवडणूक आयोगासमोर पवार आणि संगमा गटाने दावे-प्रतिदावे केले होते. दोन्ही गटांचे म्हणणे ऐकल्यावर निवडणूक आयोगाने शरद पवार यांना पक्ष संघटना आणि लोकप्रतिनिधींचा अधिक पाठिंबा असल्याने पक्षावरील त्यांचे नियंत्रण मान्य करीत घड्याळ हे चिन्ह शरद पवार यांच्याकडे कायम ठेवले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाच्या इतिहासाबद्दल..

शरद पवार हे समाजवादी काँग्रेसचे अध्यक्ष असताना चरखा पक्षाचे चिन्ह होते. १९८६मध्ये पवारांनी समाजवादी काँग्रेसचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले. परंतु केरळमधील गटाने समाजवादी काँग्रेसचे अस्तित्व कायम ठेवले. १९९९मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर पुन्हा चरखा चिन्हावर दावा केला होता. पण चरखा चिन्ह तेव्हा समाजवादी काँग्रेसकडे कायम होते. चरखा चिन्ह मिळावे म्हणून तेव्हा बरेच प्रयत्न झाले होते. पण चरखा चिन्ह असलेल्या पक्षाच्या नेत्यांनी ते चिन्ह सोडण्यास नकार दिला. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या चिन्हाचा शोध घ्यावा लागला. घड्याळ हे चिन्ह पक्षाने निवडले होते.