Pakistan Afghanistan Conflict 2025 : दोन दिवसांच्या रक्तरंजित संघर्षानंतर अखेर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये बुधवारी तात्पुरता युद्धविराम झाला. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयासंदर्भातील माहिती दिली. दोन्ही देशांत निर्माण झालेली कटुता कमी करण्यासाठी सकारात्मक तोडगा काढला जाणार असल्याचे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले. त्या संदर्भातील परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. मात्र, या युद्धविरामाच्या मागणीवरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. भारताच्या शेजारील राष्ट्रांमध्ये निर्माण झालेला हा वाद मिटविण्यासाठी कोणकोणत्या देशांनी प्रयत्न केले? त्या संदर्भातील हा आढावा…

पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तात्पुरता युद्धविराम झाला आहे. शुक्रवारपर्यंत हा युद्धविराम राहणार असून, या काळात दोन्ही देशांतील वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्या आठवड्यात अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या दोन भीषण बॉम्बस्फोटांनंतर या वादाची सुरुवात झाली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून तालिबान सरकारने पाकिस्तानच्या दक्षिण सीमेवर तैनात असलेल्या लष्करावर हल्ला केला होता. या हल्ल्यात पाकिस्तानचे अनेक जवान मृत्युमुखी पडले. प्रत्युत्तरात पाकिस्तानने अफगाणिस्तावर हवाई हल्ला करून, तेथील निष्पाप लोकांचे जीव घेतले.

पाकिस्तानचा नेमका आरोप काय?

२०२१ मध्ये तालिबान पुन्हा सत्तेत आल्यानंतर दोन्ही देशांदरम्यान झालेला हा सर्वांत मोठा आणि विनाशकारी संघर्ष होता. पाकिस्तानमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तहरीक-ए-तालिबान या दहशतवादी गटाला अफगाणिस्तानकडून आश्रय दिला जात असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तालिबान सरकारने मात्र हा दावा फेटाळून लावला असून, उलटपक्षी पाकिस्तानलाच इशारा दिला आहे. तालिबानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी नुकताच भारताचा ऐतिहासिक दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी पाकिस्तानला दहशतवादी कारवायांसाठी जबाबदार धरले होते. सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया करून, पाकिस्तान हा शेजारील राष्ट्रांमध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका मुत्ताकी यांनी केली होती.

आणखी वाचा : भारतातील ७० टक्के महिलांना जडलेला ऑटोइम्युन आजार नेमका आहे तरी काय? वेळीच उपचाराची गरज, अन्यथा…

पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या वादात कुणाची मध्यस्थी?

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर आता सौदी अरेबिया आणि कतार या दोन्ही देशांनी मध्यस्थीची भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी काबूलला जाणार होते. त्यात पाकिस्तानचे संरक्षणमंत्री, आयएसआयचे प्रमुख आणि दोन वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश होता. तालिबान सरकारने मात्र या शिष्टमंडळाला देशात प्रवेश देण्यास नकार दिला आहे. सलग तीन दिवसांत तीन वेळा व्हिसा (पारपत्र) अर्ज नाकारल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानबरोबरचे सर्व संबंध तोडले आहेत. या प्रकरणात हस्तक्षेप करण्यासाठी त्यांनी सौदी अरेबिया आणि कतार या दोन्ही देशांशी संपर्क साधला आहे. कोणत्याही परिस्थितीत तालिबान सरकारला युद्ध थांबवायला लावा, अशी विनंती पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे केली आहे.

सौदी अरेबिया आणि कतारची भूमिका काय?

सौदी अरेबियाने नुकताच पाकिस्तानबरोबर परस्पर संरक्षण करार केला आहे. दोन्ही राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी समाजमाध्यमांवर युद्धाबाबत चिंता व्यक्त केली आहे. “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या तणाव आणि संघर्षावर आम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहोत”, अशी पोस्ट सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून शेअर केली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान व अफगाणिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. संवाद आणि कूटनीतीच्या मार्गातून सकारात्मक तोडगा काढावा, असे कतारने म्हटले आहे. या घडामोडींमुळे दक्षिण आशियात पुन्हा एकदा भू-राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेला संघर्ष थांवण्यासाठी सौदी व कतारचा हस्तक्षेप निर्णायक ठरू शकतो, असे निरीक्षकांचे मत आहे.

अमेरिकेसह इराणचीही मध्यस्थीची तयारी

पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील सीमेवरचा तणाव केवळ सौदी अरेबिया आणि कतारपुरता मर्यादित नाही, तर इतर जागतिक शक्तींनीही त्याकडे लक्ष दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या वादात मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. “मी आतापर्यंत अशा आठ युद्धांवर तोडगा काढला आहे आणि यातील शेवटचा संघर्ष इस्त्रायल आणि हमासचा होता. आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्ध सुरू असल्याचे मी ऐकले आहे. हा माझा नववा युद्ध सोडवण्याचा प्रयत्न असेल,” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. गाझा शांतता परिषदेसाठी इजिप्तला रवाना होण्यापूर्वी त्यांनी हे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने नोबेल शांतता पुरस्कारासाठी प्रचार केला जात होता; पण यंदाचा पुरस्कार व्हेनेझुएलाच्या विरोधी नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला.

पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षाची तज्ज्ञांना चिंता

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वादही आपणच सोडवल्याचा दावा ट्रम्प यांनी अनेकदा केला. मात्र, भारताने त्यांचा हा दावा सातत्याने फेटाळून लावला. सौदी अरेबिया आणि कतार (सुन्नीबहुल देश) वगळता इराणच्या (शियाबहुल देश) परराष्ट्र मंत्रालयानेही आपल्या शेजारील दोन मुस्लीम देशांमधील तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्षावर जागतिक तज्ज्ञांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. अल जझिराचे विश्लेषक कमल हैदर यांनी ही परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. “हा संघर्ष वेळीच थांबला नाही, तर परिस्थिती भीषण स्वरूप धारण करू शकते. सध्या दोन्ही देशांमधील नागरिक भयभीत झाले असून, त्यांच्यात असुरक्षितेची भावना आहे”, असे हैदर म्हणाले.

पाकिस्तानला कोणती चूक नडली?

वॉशिंग्टन येथील राजकीय विश्लेषक मायकल कुगेलमन यांनी ‘डीब्ल्यू’ या वृत्तवाहिनीला सांगितले, “ही परिस्थिती इस्लामाबादच्या अपयशातून निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यात तेथील सरकारला अपयश आले आहे. कुगेलमन यांच्या मते, “पाकिस्तानने संवाद आणि काही प्रमाणात लष्कराचे बळ वापरून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला; पण त्यातून काहीच परिणाम साधला गेला नाही. उलट तालिबान सरकारने त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.” दरम्यान, अफगाणिस्तानचे माजी राजदूत ओमर समद यांनी या संघर्षाबाबत दोन्ही देशांना इशारा दिला आहे.

हेही वाचा : Who is Hina Khan : ‘जय श्रीराम’ असा नारा देत संतप्त आंदोलकांना शांत करणाऱ्या हिना खान कोण आहेत?

पाकिस्तान-अफगाणिस्तानचे दावे काय?

“गेल्या दोन वर्षांपासून पाकिस्तान लष्करी बळाचा वापर करून अफगाणिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या या धोरणामागे गैरसमज आणि चुकीचे व्यवस्थापन आहे. पाकिस्तानने वेळीच आपली कृत्ये रोखली नाहीत, तर तालिबान सरकार त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे,” असे ओमर समद यांनी म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील तणाव गंभीर बनला असून, दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ल्यांचे आरोप केले आहेत. तालिबानने दावा केला आहे की, बुधवारी पहाटे पाकिस्तानच्या सैन्याने स्पिन बोल्डक जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात डझनभर निष्पाप लोकांना प्राण गमवावे लागले आणि १०० हून अधिक जखमी झाले.

दुसरीकडे पाकिस्तानचा असा दावा आहे की, अफगाणिस्तानमधून आलेल्या दहशतवादी गटाने सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये हल्ला केला. या हल्ल्यात सहा पाकिस्तानी निमलष्करी जवान ठार झाले आणि अन्य सहा जखमी झाले. गेल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. त्यानंतर या भागात सैनिकांनी शोधमोहीम सुरू केली असताना हा संघर्ष उफाळून आला आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये ४८ तासांसाठी युद्धविराम करण्यात आला आहे. या हिंसाचारामुळे चमन आणि तोरखम येथील सीमा बंद करण्यात आल्या आहेत.