Taliban Pakistan Border Close : आठवडाभराच्या रक्तरंजित संघर्षानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तात्पुरता युद्धविराम झाला. दोन्ही देशांमधील वाद सोडवण्यासाठी कतार आणि तुर्कीस्तानने प्रयत्नही केले. गेल्या आठवड्यात झालेल्या एका बैठकीत त्यांनी वाद निवाळण्याचे आश्वासनही दिले. यादरम्यान तालिबान सरकारने पाकिस्तानला पुन्हा एकदा तडाखे देण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला लष्करी बळाचा वापर करणाऱ्या अफगाणिस्तानने आता शांत डोक्याने पाकिस्तानच्या वर्मावरच घाव घातला आहे. तालिबान सरकारने पाकिस्तानला लागून असलेल्या आपल्या सर्वच सीमा आणखी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी अनेक वाहने सीमावर्ती भागातच अडकून पडल्याने पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे.

पाकिस्तानमध्ये टोमॅटो ६०० रुपये किलो

पाकिस्तानच्या डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानने आपल्या सीमा बंद ठेवल्याने पाकिस्तानकडे येणारी सर्वच वाहने सीमावर्ती भागात अडकून पडली आहे. परिणामी सर्वच व्यापार थांबला असून सर्वसामान्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानमधील घाऊक बाजारात टोमॅटोच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. अनेक ठिकाणी ५५० ते ६०० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विकले जात आहेत. अफगाणिस्तानमधून टोमॅटोची आयात थांबल्याने आणि देशांतर्गत पिकांचे नुकसान झाल्याने ही टंचाई निर्माण झाली आहे. सीमावर्ती भागात भाजीपाला तसेच इतर वस्तूंचे जवळपास पाच हजार कंटेनर अडकून पडले आहेत.

महागाई वाढल्याने पाकिस्तान सरकारी कोंडी

महागाईचा सामना करावा लागत असल्याचे पाकिस्तानमधील जनतेने तेथील सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. काहीही करा पण महागाईला आळा घाला अशी मागणीच त्यांनी सरकारकडे केली आहे. भाजीपाल्यासह दुधाच्या दरातही वाढ झाल्याने त्याचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारवरील दबाव वाढला असून त्यांनी कतार आणि तुर्कीस्तानला लवकरात लवकर या वादावर तोडगा काढण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान आपल्या भूमिकेवर ठाम असून जोपर्यंत पाकिस्तान सीमावर्ती भागातील आमच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : Bhairav Battalion : भैरव बटालियन्समुळे वाढलं भारतीय लष्कराचं बळ; शत्रूंना धडकी भरवणारी ही बटालियन आहे तरी काय?

पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील वाद कशामुळे?

११ आणि १२ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर हवाई हल्ले केले. तेहरीक-ए-तालिबान – पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेच्या तळावर हल्ले चढवण्यासाठी ही कारवाई केल्याचे पाकिस्तानने म्हटले; तर अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हा हल्ला असल्याचे सांगत तालिबान सरकारने पाकिस्तानच्या अनेक सीमावर्ती तळांवर प्रतिकार केला. या संघर्षात पाकिस्तानचे ५८ सैनिक आणि ९ तालिबान सैनिक मारले गेल्याचा दावा तालिबान सरकारने केला. पाकिस्तानने तो खोडून काढत, २०० तालिबान हल्लेखोरांना ठार केल्याचे म्हटले. मात्र आपले २३ सैनिक मारले गेल्याची कबुलीही दिली. पाकिस्तानने काबूलजवळ टीटीपीच्या तळांवर हवाई हल्ले केले. हे हल्ले अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा भंग करणारे होते, या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून आपण सीमेवरील पाकिस्तानी चौक्यांवर हल्ले केले, असे तालिबानने स्पष्ट केले.

दोन्ही देशांमध्ये कोण करतंय मध्यस्थी?

तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानमधून पाकिस्तानी लष्करी आणि निमलष्करी तळांवर सातत्याने हल्ले करत असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. कुठल्याही परिस्थितीत या दहशतवादी गटाचा बंदोबस्त केल्याशिवाय माघार घेणार नाही, असे पाकिस्तानने ठणकावून सांगितले आहे. दरम्यान, ज्यावेळी दोन्ही देशांमध्ये हा संघर्ष सुरू होता त्या काळात तालिबानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकी भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यामुळे अफगाण-पाक संघर्षातील कथित भारताच्या भूमिकेची चर्चाही सुरू झाली. यादरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धविराम घडवून आणण्यासाठी कतार आणि तुर्कीस्तानने प्रयत्न केले. या पार्श्वभूमीवर, गेल्या शनिवारी दोहा येथे दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यात तात्पुरता युद्धविराम करण्यात आला. पाकिस्तानचा आरोप आहे की, टीटीपी अफगाणिस्तानच्या भूमीवरून सीमेपलीकडे दहशतवादी हल्ले करत आहे. दुसरीकडे पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन करून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला केल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला आहे.

सौदी अरेबिया आणि कतारची भूमिका काय?

सौदी अरेबियाने नुकताच पाकिस्तानबरोबर परस्पर संरक्षण करार केला आहे. दोन्ही राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी समाजमाध्यमांवर युद्धाबाबत चिंता व्यक्त केली आहे. “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या तणाव आणि संघर्षावर आम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवून आहोत”, अशी पोस्ट सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवरून शेअर केली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तान व अफगाणिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. संवाद आणि कूटनीतीच्या मार्गातून सकारात्मक तोडगा काढावा, असे कतारने म्हटले आहे. या घडामोडींमुळे दक्षिण आशियात पुन्हा एकदा भू-राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेला संघर्ष थांवण्यासाठी सौदी व कतारचा हस्तक्षेप निर्णायक ठरू शकतो, असे निरीक्षकांचे मत आहे.

हेही वाचा : भाऊबीज हा सण रक्षाबंधनापेक्षा कसा वेगळा आहे? पौराणिक कथेतील संदर्भ काय सांगतात?

पाकिस्तानमध्ये महागाईचा उच्चांक

अफगाणिस्तानने पाकिस्तानला लागून असलेल्या आपल्या सर्व सीमा बंद केल्याने दोन्ही देशांमधील व्यापार ठप्प झाला आहे. अनेक वाहने सीमावर्ती भागातच अडकून पडल्याने पाकिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. पाकिस्तानमधील टोमॅटोच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. घाऊक बाजारांमध्ये टोमॅटो ५५० ते ६०० पाकिस्तानी रुपये प्रति किलोप्रमाणे विकला जात आहे. हे दर सामान्य किमतींपेक्षा जवळजवळ ४००% जास्त असल्याचे तेथील लोकांचे म्हणणे आहे. अफगाणिस्तानने सुमारे ५,००० कंटेनर अडवल्यामुळे कराची, लाहोर आणि इस्लामाबादमधील पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारवरील दबाव वाढला असून अफगाणिस्तानच्या काही मागण्या मान्य केल्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. दरम्यान, हा वाद आणखी किती दिवस सुरू राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.