Pakistan Political Crisis 2025 : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानमध्ये काही दिवसांपासून अशांततेचं वातावरण निर्माण झालं आहे. भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरचा पाकिस्तानी सरकारनं चांगलाच धसका घेतला आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी व लष्करप्रमुख असीम मुनीर हे एकमेकांविरोधात कुरघोड्या करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान, पाकिस्तानात सत्तापालटाची आवई उठली असून, मुनीर हे सरकारविरोधात मोठं बंड करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्याचाच घेतलेला हा आढावा….
‘लवकरच उठाव होणार’ ही पाकिस्तानमधील राजकारणात नेहमीच ऐकू येणारी एक परिचित घोषणा झाली आहे. पाकिस्तानच्या स्थापनेपासून देशात आजवर अनेकदा लष्करी उठाव झाले आणि प्रत्येक वेळी तेथील लोकशाहीवर लष्कराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवला आहे. आता पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये लष्करी उठावाच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे अलीकडच्या काही दिवसांत पाकिस्तानमधील स्वतंत्र पत्रकार व राजकीय विश्लेषक यांच्याकडून सातत्यानं याविषयीची विधानं केली जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर हे सध्या राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांची जागा घेण्याच्या तयारीत आहेत.
फील्ड मार्शलपदी बढती अन् उठावाची सुरुवात?
मे महिन्यात शाहबाज शरीफ सरकारने लष्करप्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शलपदी बढती दिली. त्यामुळे मुनीर हे पाकिस्तानच्या इतिहासातील फक्त दुसरे फील्ड मार्शल ठरले. याआधी १९५९ मध्ये जनरल अयूब खान यांनी राष्ट्रपतिपद हाती घेतल्यानंतर स्वतःला फील्ड मार्शल म्हणून घोषित केलं होतं. मुनीर यांना दिलेली बढती इस्लामाबादवर भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अवघ्या काही दिवसांत देण्यात आली. या कारवाईंतर्गत भारतानं पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा सूड म्हणून केलेल्या हवाई हल्ल्यात पाकिस्तानला मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं.
आणखी वाचा : क्रिकेटपटू यश दयालविरोधात ‘बीएनएस कलम ६९’ अंतर्गत गुन्हा; नेमकं काय आहे हे कलम?
विशेष बाब म्हणजे भारताबरोबरच्या लढाईत पाकिस्ताननं तुर्की आणि चीनकडून आयात केलेली आधुनिक शस्त्रं वापरली होती. तरीही त्यांना भारतीय कारवाईसमोर झुकावं लागलं. पाकिस्तानमधील राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, लष्करप्रमुख असीम मुनीर हे आपली राजकीय ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर स्नेहभोजन केले होते. पाकिस्तानी पत्रकार एजाज सय्यद म्हणाले, “आसिफ अली झरदारी यांना पदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत आणि त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जात आहे.”
पाकिस्तानमध्ये अफवांचा पूर
- पाकिस्तानमध्ये अफवांचा पूर आला असून, लष्करी उठावाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
- एका पाकिस्तानी व्यक्तीने सोशल मीडियावर लिहिलंय की, असीम मुनीर हे लष्करी उठाव घडवून आणणार आहेत.
- पाकिस्तानचे राष्ट्रपती झरदारी यांच्याविरोधीत मुनीर यांनी कुरघोड्या सुरू केल्याचंही सांगितलं जात आहे.
- झरदारी चीनच्या भूमिकेला पाठिंबा देतात, तर मुनीर यांनी गुप्तपणे अमेरिकेशी हातमिळवणी केली असल्याचा दावा करण्यात आलाय.
- आणखी एका वापरकर्त्यानं लिहिलंय की, पाकिस्तानमध्ये फूट पडली असून, लवकरच कुणाचा तरी राजकीय बळी जाणार आहे.
भुट्टो यांच्या प्रतिक्रियेमुळे उठावाच्या चर्चांना नवे बळ
पाकिस्तानमध्ये लष्करी उठावाच्या चर्चांना जोर आला आहे. त्यात माजी परराष्ट्रमंत्री व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (PPP) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं आहे. अल जझीरा या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भुट्टो यांनी सूचकपणे सांगितले की, भारताने सहकार्याची तयारी दर्शवली, तर पाकिस्तान भारताला हवे असलेल्या दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणास विरोध करणार नाही. त्यांच्या या वक्तव्याकडे भारताशी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पाहिलं जात आहे.

पाकिस्तानचा भारताबरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न?
लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर यांना भारताकडे प्रत्यार्पण करण्यास पाकिस्तान तयार आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना भुट्टो म्हणाले, “भारताने सहकार्याच्या भूमिकेतून पाकिस्तानबरोबर चर्चा केली, तर मला खात्री आहे की आमचे सरकार अशा गोष्टींना विरोध करणार नाही.” बिलावल भुट्टो यांच्या या सूचक आणि थेट प्रतिक्रियेमुळे पाकिस्तानवरील आंतरराष्ट्रीय दबाव, लष्कराच्या हालचाली आणि राजकीय पक्षांमधील ताणतणावाच्या चर्चांना बळ मिळालं आहे. दुसरीकडे लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा मुलगा तहला सईद यानं भुट्टोंच्या वक्तव्याला तीव्र शब्दांत विरोध केला आहे. “भुट्टो हे खरे मुस्लीम नाहीत. त्यांना आपल्याच देशविरोधात दिलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी लागेल,” अशी मागणी त्यानं केली आहे.
पाकिस्तानमधील लष्करी उठावांचा इतिहास
पाकिस्तानमध्ये यापूर्वीही अनेकदा लष्करी उठाव झालेले आहेत. ५ जुलै १९७७ रोजी पाकिस्तानी जनरल जिया उल-हक यांनी ‘ऑपरेशन फेअर प्ले’ या कोडनेमअंतर्गत तत्कालीन पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्याविरोधात लष्करी उठाव घडवून आणला होता. या उठावात भुट्टोंना नजरकैदेत टाकण्यात आलं आणि देशात मार्शल लॉ लागू करण्यात आला. १९५८ मध्ये राष्ट्रपती इस्कंदर मिर्झा यांनी मार्शल लॉ लागू करून, जनरल अयूब खान यांची पाकिस्तानचे ‘मुख्य लष्करी प्रशासक’ म्हणून नेमणूक केली होती. मिर्झांना वाटलं होतं की, अयूब खान हे फक्त नावापुरते असतील आणि प्रत्यक्ष सत्ताकेंद्र आपल्याकडेच राहील. मात्र, अयूब खान यांनी झपाट्याने हालचाल करीत स्वतः राष्ट्रपतीपदाचा ताबा घेतला आणि ते पाकिस्तानचे पहिले लष्करी शासक झाले.
१९९९ मध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी कोणताही रक्तपात न करता, देशाची सत्ता काबीज केली आणि त्यानंतर जून २००१ मध्ये त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. मुशर्रफ हे २००८ पर्यंत पाकिस्तानच्या सत्तेवर राहिले. त्यांच्या राजीनाम्यानंतर आसिफ अली झरदारी यांनी राष्ट्रपतीपद स्वीकारलं. आता लष्करप्रमुख असीम मुनीर हे पाकिस्तानच्या राष्ट्रपतींविरोधात कुरघोड्या करीत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे इस्लामाबाद व रावळपिंडीतील पुढील घडामोडी कोणत्या निर्णायक वळणावर पोहोचतील याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.