दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान भारतावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. याच घटनेचा प्रत्यय मंगळवारी (तारीख ४ नोव्हेंबर) पुन्हा एकदा आला. गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हजारो शीख बांधव पाकिस्तानमध्ये जातात. यंदा शीख जथ्याबरोबर काही हिंदू बांधवही पाकिस्तानच्या यात्रेसाठी निघाले होते. यावेळी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी शीख यात्रेकरूंना देशात अधिकृतपणे प्रवेश दिला; पण त्यांच्याबरोबर असलेल्या १२ हिंदूंना त्यांनी देशात येण्याची परवानगी नाकारली. पाकिस्तानच्या या कृतीवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पण नेमकं काय घडलं? पाकिस्तानने हिंदू यात्रेकरूंना प्रवेश नाकारण्यामागचं कारण काय होतं? त्याविषयीचा हा आढावा…
ऑपरेशन सिंदूरनंतरचा पहिलाच जथ्था
एप्रिलमध्ये पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. या भ्याड हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. यानंतर दोन्ही देशांच्या लष्करप्रमुखांनी एकमेकांशी फोनवर चर्चा करून युद्धविरामावर सहमती दर्शवली. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानला जाणाऱ्या शीख समुदायाचा हा पहिलाच जथ्था होता. यापूर्वी भारत सरकारने सुरक्षेचे कारण देत या जथ्थ्याला पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला होता.
शिरोमणी अकाली दल पक्षाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी हा निर्णय दुःखद असल्याचे म्हटले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या निर्णयाचा फेरविचार करावा अशी विनंती त्यांनी केली होती. त्यांच्या विनंतीला मान देऊन केंद्र सरकारने आपली भूमिका बदलली आणि गुरु नानक देवजींच्या जयंतीनिमित्त सुमारे २,१०० लोकांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी दिली.
वाघा सीमेवर नेमके काय घडले?
केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर अंदाजे १,९०० शीख भाविकांचा जथ्था मंगळवारी पाकिस्तानला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, या जथ्याबरोबर असलेल्या हिंदू भाविकांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी वाघा बॉर्डवरच रोखले. विशेष म्हणजे हिंदू भाविकांनी इमिग्रेशन आणि प्रवासाची सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण केली होती. तरीदेखील त्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आपल्या देशात प्रवेश करण्याची परवानगी दिली नाही. या घटनेमुळे भाविक अत्यंत निराश झाले आणि पुन्हा मायदेशी परतले.
पाकिस्तानी अधिकारी हिंदू यात्रेकरूंना काय म्हणाले?
दिल्लीतील रहिवासी अमर चंद हेदेखील आपल्या कुटुंबातील चार सदस्यांसह पाकिस्तानला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यांनाही पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी वाघा बॉर्डवरच रोखले. “शीख जथ्थ्याबरोबर आम्हीही गुरु नानक देव यांच्या दर्शनसाठी निघालो होतो; पण पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी आम्हाला वाघा बॉर्डरवरच रोखले. ‘तुम्ही हिंदू आहात, शीख जथ्थ्यासोबत जाऊ शकत नाही’ असे म्हणत त्यांनी आम्हाला परत पाठवले, असे अमर चंद यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले. पाकिस्तानने आम्हाला लुटले आणि यात्रेसाठी भरलेले पैसेही त्यांनी आम्हाला परत केले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
पाकिस्तानच्या या कृत्यामागचे काय कारण असावे?
भारतीय गुप्तचर यंत्रणेतील एका अधिकाऱ्याने पाकिस्तानच्या या कृतीचा तीव्र निषेध केला. भविष्यात करतारपूर कॉरिडॉरमार्गे येणाऱ्या यात्रेकरूंनाही अशा कृतींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. यात्रेसाठी येणाऱ्या पर्यटकांचा पाकिस्तानकडून जर सन्मान केला जात नसेल तर तिथे जाणे व्यर्थ आहे. शीख जथ्थ्याबरोबर निघालेले सर्व हिंदू सामान्य नागरिक होते. त्यांचा राजकारणाशी कोणताही संबंध नव्हता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनही त्यांना विनाकारण त्रास देण्यात आला आणि ही बाब अत्यंत घृणास्पद आहे, अशी टीकाही या अधिकाऱ्याने पाकिस्तान सरकारवर केली. हिंदू भाविकांना यात्रा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानचा पूर्वनियोजित कट असू शकतो. भारतातील शीख आणि हिंदू या समुदायांमध्ये तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, असे एका अधिकाऱ्याने म्हटले.
हेही वाचा : Poorvi Prachand Prahar : पाकिस्ताननंतर आता चीनलाही इशारा? अरुणाचलमध्ये भारतीय लष्कर कशाची तयारी करतंय?
करतारपूर कॉरिडॉरवर शुल्क वसुली
गुरु नानक देव यांच्या दर्शनसाठी शीख जथ्थ्याबरोबर निघालेल्या हिंदूंना रोखण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न निंदनीय असला तरी असा प्रकार पहिल्यांदाच घडला नाही. भारताने वारंवार विनंती करूनही पाकिस्तानने करतारपूर साहिब कॉरिडॉरमार्गे गुरुद्वारा दरबार साहिब येथे दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भारतीय यात्रेकरूंकडून सुमारे १,७२२ रुपयांचे शुल्क आकारणे सुरूच ठेवले आहे. गेल्या ऑक्टोबरपर्यंत पाकिस्तानने या शुल्कातून अंदाजे ५१ कोटी इतकी मोठी रक्कम वसूल केली आहे. विशेष म्हणजे, याच गुरुद्वारामध्ये भेट देणाऱ्या स्थानिक (पाकिस्तानी) नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
२०१८ मध्ये भारतीय अधिकाऱ्यांचा छळ
२०१८ मध्ये शीख यात्रेकरूंसोबत पाकिस्तानात गेलेल्या भारतीय दूतावासातील एका अधिकाऱ्याला छळाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेचा तीव्र निषेध केला होता. पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांचा छळ केला आणि गुरुद्वारा ननकाना साहिब व गुरुद्वारा सच्चा सौदा येथे त्यांना प्रवेश नाकारला गेला. प्रवासाची पूर्वपरवानगी मिळाल्यानंतरही या धार्मिक स्थळांवर भाविकांना जाऊ दिले नाही, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पत्रकात म्हटले होते. धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या मार्गांवर खलिस्तान समर्थक बॅनर लावून पाकिस्तान सामुदायिक सलोखा बिघडवण्याचा आणि फुटीरतावादी प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो, असा आरोपही या पत्रकातून करण्यात आला होता.
