“आम्ही अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत. जर आम्हाला वाटलं की, आम्ही संपत आहोत, तर आम्ही अर्ध्या जगाला आमच्यासोबत घेऊन जाऊ”, अशी गरळ पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी ओकली आहे. रविवारी अमेरिकेत आयोजित केल्या गेलेल्या चहापानादरम्यान बोलताना त्यांनी हे म्हटले आहे. असीम मुनीर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर पहलगाम हल्ल्यानंतर भारताने स्थगित केलेल्या सिंधू नदी जलकरारावरही ते बोलले आहेत. “आम्ही भारताकडून १० धरणं बांधली जाण्याची वाट पाहू, आणि जेव्हा ते धरणं बांधतील तेव्हा ती धरणं आम्ही १० क्षेपणास्त्रांनी उद्ध्वस्त करू”, असे मुनीर म्हणाले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे आणि अमेरिकेकडून मिळालेल्या अनपेक्षित पाठिंब्यामुळे पाकिस्तान आणखीनच भारावून गेल्याचे दिसत आहे. अशा प्रकारे गरळ ओकण्याचे कारण कदाचित हेच असावे. याआधीही पाकिस्तानने अण्वस्त्रहल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत. मात्र, अमेरिकेतून एखाद्या तिसऱ्या देशाविरुद्ध अशा प्रकारे धमकी देण्याचा हा पहिलाच प्रकार आहे.

मुनीर यांनी अण्वस्त्रहल्ल्याची दिली धमकी

असीम मुनीर यांनी एका महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिकेला भेट दिली आहे. त्यांनी फ्लोरिडाच्या टँपा येथील व्यापारी व मानद वाणिज्य दूत अदनान असद यांना भेट दिली. यादरम्यान बोलताना त्यांनी म्हटले, “भविष्यात भारताशी युद्धात पाकिस्तानच्या अस्तित्वाचा धोका निर्माण झाला, तर पाकिस्तान अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देईल.” ‘द प्रिंट’ने दिलेल्या वृत्तानुसार, “आम्ही अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत. आम्हाला जर वाटलं की आम्ही संपत आहोत, तर आम्ही आमच्यासोबत अर्ध्या जगाला घेऊन जाऊ”, असे मुनीर म्हणाले आहेत.

“सिंधू नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण करणारे कोणतेही पायाभूत प्रकल्प जर भारत बांधेल, तर ते उद्ध्वस्त केले जातील”, असे ते म्हणाले आहेत. त्याशिवाय त्यांनी असाही दावा केला आहे की, एप्रिलमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या सिंधू नदी करारावरील स्थगितीच्या निर्णयामुळे २५ कोटी लोक उपासमारीच्या विळख्यात येऊ शकतात. सिंधू नदी ही काही भारतीयांच्या कौटुंबिक मालमत्तेचा भाग नाही. ‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार, असीम मुनीर अमेरिकेत एका चहापान कार्यक्रमाला उपस्थित होते. तिथे त्यांनी सिंधू नदी कराराबाबत भाष्य केले.

यापूर्वी मुनीर यांनी जूनमध्ये पाच दिवसांचा अमेरिका दौरा केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. जूनमधील दौऱ्यात मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत एका खासगी स्नेहभोजन कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. त्या भेटीमुळे अमेरिका-पाकिस्तान सहकार्य वाढविण्याच्या घोषणा झाल्या, ज्यामध्ये तेल कराराचाही समावेश आहे.

असीम मुनीर यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्यामुळे एकूणच सर्व देशांच्या अण्वस्त्रसाठ्यांकडे लक्ष वेधले गेले आहे. इस्लामाबादकडे १७० वॉरहेड्स आहेत आणि त्यांनी चीनच्या मदतीने ते आणखी झपाट्याने विकसित केले आहेत.

पाकिस्तानची अण्वस्त्र शक्ती

मुनीर यांनी दिलेल्या धमकीनंतर पाकिस्तानकडे नेमकी किती अण्वस्त्रे आहेत, असा प्रश्न साधारणपणे सगळ्यांच्या मनात डोकावला आहे. स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांतता संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान एक शक्तिशाली अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. त्यांच्याकडे जवळपास १७० वॉरहेड्स आहेत. त्या तुलनेत जानेवारी २०२५ पर्यंत भारताकडे १८० अण्वस्त्रांचा साठा आहे. ‘बुलेटिन ऑफ दि अ‍ॅटोमिक सायंटिस्ट’ने २०२३ मध्ये नोंदवले की, पाकिस्तान त्यांचा अण्वस्त्रांचा साठा झपाट्याने वाढवू शकतो. कारण- त्यांच्याकडे अनेक नवीन डिलिव्हरी सिस्टीम्स विकसित होत आहेत. चार प्लुटोनियम उत्पादन रिअ‍ॅक्टर आहेत आणि युरेनियम समृद्धीकरणाच्या पायाभूत सुविधेचाही विस्तार होत आहे.

अमेरिकेतील युनिव्हर्सिटी अ‍ॅट अल्बनीचे सुरक्षा तज्ज्ञ ख्रिस्तोफर क्लेरी यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा मोठा भाग हा जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा आहे. तरीही ते जमीन, हवा व समुद्रमार्गे वॉरहेड्स डिलिव्हर करणारा न्यूक्लियर ट्रायड विकसित करीत आहेत. त्याशिवाय ‘इंटरनॅशनल कॅम्पेन टू अ‍ॅबॉलिश न्यूक्लियर वेपन्स’ने २०२३ मध्ये म्हटले होते की, पाकिस्तानने त्याच्या अण्वस्त्र कार्यक्रमासाठी तब्बल एक अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या मते, पाकिस्तानच्या साठ्यात लहान आणि मध्यम पल्ल्याच्या गतिमान बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. ते भारताला लक्ष्य करण्याइतक्या पल्ल्याचे आहेत. चीनने गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तानच्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रवाढीच्या कार्यक्रमाला महत्त्वपूर्ण तांत्रिक मदत केली आहे. जगभरात पाकिस्तानची अण्वस्त्रे नेहमीच चिंता निर्माण करणारी ठरली आहेत. कारण- इस्लामाबादने कधीही अधिकृत अण्वस्त्र धोरण जाहीर केलेले नाही.

पाकिस्तानची अण्वस्त्र क्षमता काय आहे? Photo: Reuters

पाकिस्तानचे न्यूक्लियर बटन कोणाच्या हाती?

असीम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्रहल्ल्याच्या धमकीमुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवरील नियंत्रणाबद्दलही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाकिस्तानमध्ये अण्वस्त्रांचे नियंत्रण हे राष्ट्रपती आणि पंतप्रधान या सर्वोच्च नेतृत्वाकडे असते. त्यावर न्यूक्लियर कमांड अँड कंट्रोल सिस्टीमचे लक्ष असते. अण्वस्त्रे वापरण्याचा अंतिम निर्णय राष्ट्रपती आणि पंतप्रधान एकत्रितपणे घेतात. त्यांची सुरक्षा आणि प्रक्षेपणाची जबाबदारी सैन्याकडे असते. त्यामुळे या प्रक्रियेत लष्कराचाही मोठा सहभाग असतो.

काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे नियंत्रण नॅशनल कमांड अथॉरिटीकडे आहे. त्याचे अध्यक्षपद अधिकृतरीत्या पंतप्रधानांकडे असते. २००० साली स्थापन झालेली ही संस्था अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र धोरणांबाबत निर्णय घेते. सर्व कार्यक्रमांचे निरीक्षण करते. मात्र, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या माहितीनुसार, युद्धकाळात किंवा लष्करी संकटात निर्णय प्रक्रियेत लष्करच अनेकदा वरचढ राहील.

अमेरिकेची योजना?

अमेरिकेकडे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत आपत्कालीन योजना असल्याच्या अफवा आहेत. २०११ मध्ये एनबीसी न्यूजने असा अहवाल दिला की, अमेरिकेकडे अशी स्नॅच अँड ग्रॅब अशी योजना आहे. ती तेव्हाच लागू होईल जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्रपतींना असे वाटेल की, पाकिस्तानची अण्वस्त्रे त्यांच्या देशाला किंवा हितसंबंधांना धोका निर्माण करीत आहेत. एनबीसीने दिलेल्या माहितीनुसार, ही योजना २०११ च्या दहशतवादी हल्ल्यापूर्वीच तयार करण्यात आली होती. २०११ मध्ये ओसामा बिन लादेनवर झालेल्या कारवाईनंतर वॉशिंग्टनला पाकिस्तानच्या अण्वस्त्रांबाबत आणखी चिंता वाटू लागली.