पाकिस्तानजवळच्या समुद्रात तेलसाठे असून, लवकरच आपण त्या देशात उत्खननासाठी मोठी गुंतवणूक करणार असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यंतरी केला. भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेलही, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली. त्यांच्या या विधानामुळे पाकिस्तानकडे खरोखरच अमेरिकेने गुंतवणूक करण्याइतपत तेलसाठे आहेत का याविषयी चर्चा सुरू झाली. पण जगातील आघाडीच्या खनिज तेल उत्पादकांच्या तुलनेत पाकिस्तानकडील तेलसाठे नगण्य आहेतच. शिवाय भारताच्या आसपासही या देशाची तेल शुद्धीकरण क्षमता नाही. तेव्हा भारतावर दबाव आणण्यासाठी ट्रम्प यांनी त्यांच्या शैलीत लोणकढी थाप मारली असण्याचीच शक्यता अधिक दिसते.

काय म्हणाले ट्रम्प?

भारत सातत्याने रशियाकडून खनिज तेल खरेदी करतो हे ट्रम्प यांना अजिबात मान्य नाही. शिवाय भारत रशियाकडून शस्त्रसामग्रीही घेतो याचे शल्य ट्रम्प यांना आहे. त्यांनी याविषयी यंदाच त्रागा करण्याचे कारण म्हणजे, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारदरी कमी करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या मार्गाने अमेरिकी वस्तू भारताने खरेदी कराव्यात असा ट्रम्प यांचा आग्रह आहे. यात खनिज तेल आणि शस्त्रसामग्री यांचा क्रमांक सर्वांत वरचा येतो कारण त्यांच्या किमती अवाढव्य असतात. पण अनेक आठवडे वाटाघाटी चालूनही भारत दाद देत नाही, शिवाय रशियाकडून तेलखरेदी थांबवतही नाही याचा राग येऊन ट्रम्प यांनी भारताविरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानजवळ प्रचंड तेलसाठे असून, लवकरच त्या देशाबरोबर उत्खनन सुरू करण्याचा करार आमच्यात झालेला आहे, हे विधानही भारतावर दबाव आणण्यासाठीच केले गेले आहे. कुणी सांगावे, पाकिस्तान भविष्यात भारताला तेल विकेलही ही ट्रम्प मारलेली थापच ठरते. कारण ट्रम्प यांना भारताविषयीच्या अलीकडच्या व्यापाराचा नेमका आकडा ठाऊक नसावा आणि पाकिस्तानजवळ किती तेल आहे किंवा नाही याचाही पुरेसा अंदाज नसावा असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात.

जगात सर्वाधिक तेलसाठे कोणाकडे?

निव्वळ खनिजतेलसाठ्याचा विचार करता जगात सर्वाधिक साठे व्हेनेझुएला देशात असल्याचे मानले जाते. या देशात गतवर्षी ३०३ अब्ज बॅरल इतके खनिज तेल असल्याची नोंद आढळते. त्याखालोखाल सौदी अरेबिया (२६७ अब्ज बॅरल), इराण (२०९ अब्ज बॅरल), कॅनडा (१६३ अब्ज बॅरल), इराक (१४५ अब्ज बॅरल) यांचा क्रमांक लागतो. पण सर्वाधिक खनिज तेल उत्पादनात अमेरिकेचा क्रमांक सर्वांत वरचा येतो. हा देश दिवसाला २० दशलक्ष बॅरल इतके खनिज तेल उत्पादित करतो. त्याखालोखाल सौदी अरेबिया (१०.९ दशलक्ष बॅरल प्रतिदिन), रशिया (१०.८ दशलक्ष बॅरल प्रतिदिन), कॅनडा (५.९ दशलक्ष बॅरल प्रतिदिन), इराण (५.१ दशलक्ष बॅरल प्रतिदिन) अशी क्रमवारी आहे. भारताकडे ४.८ अब्ज बॅरलचे तेलसाठे आहेत. तर उत्पादनक्षमता ७३ हजार बॅरल प्रतिदिन इतकी आहे. या दोन्ही क्षमता भारताची खनिज तेल गरज भागवू शकत नाहीत. मात्र खनिज तेल शुद्धीकरणाच्या क्षेत्रात भारताचा क्रमांक जगात चौथा आहे. तेल शुद्धीकरणाची सर्वाधिक क्षमता चीनची (१८.५ दशलक्ष बॅरल प्रतिदिन) आहे. त्याखालोखाल अमेरिका (१८.४ दशलक्ष बॅरल प्रतिदिन), रशिया (६.८ दशलक्ष बॅरल प्रतिदिन), भारत (५.२ दशलक्ष बॅरल प्रतिदिन), दक्षिण कोरिया (३.४ दशलक्ष बॅरल प्रतिदिन) यांचा क्रमांक लागतो.

पाकिस्तानचे पोकळ दावे

आमच्या भूभागात आणि जवळील समुद्रात मोठ्या प्रमाणावर खनिज तेल साठे उपलब्ध आहेत, असे दावे पाकिस्तान गेली काही वर्षे करत आहे. पण वस्तुस्थिती वेगळेच चित्र उभे करते. पाकिस्तानकडे ३० कोटी बॅरल इतका तेलसाठा असून, तो जगाच्या तुलनेत ०.०२ टक्के इतकाही नाही. या क्षमतेनुसार पाकिस्तानचा क्रमांक जगात पन्नासावा येतो. पाकिस्तानची तेल शुद्धीकरण क्षमताही अत्यंत तुटपुंजी ५० हजार बॅरल प्रतिदिन इतकीच आहे. तर दिवसाला अवघे ७ हजार बॅरल प्रतिदिन इतके खनिज तेल पाकिस्तान उत्पादित करू शकतो. अशा या देशामध्ये ट्रम्प नेमकी किती आणि कोणती गुंतवणूक करणार याविषयी म्हणूनच संदेह उपस्थित होतो.

भारतावर यासाठीही राग?

जगात तेल शुद्धीकरण क्षमतेमध्ये भारताचा क्रमांक चौथा लागतो. पण ही क्षमता केवळ भारताची गरज भागवते असे नव्हे. प्राधान्याने रशियातून आलेल्या कच्च्या तेलाचे शुद्धीकरण ते युरोपातील श्रीमंत देशांना विकणे यात व्यवहारात भारतातील तेल विपणन कंपन्यांनी मोठी मजल मारली आहे. रिलायन्स पेट्रोकेमिकल्स ही जगातील सर्वांत मोठी तेलशुद्धीकरण कंपनी ठरते. तर इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम यांसारख्या सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पश्चिम युरोपात मोठ्या प्रमाणावर शुद्ध तेल विकले आहे. म्हणजेच रशियाचे तेल हा भारताचा केवळ प्रमुख ऊर्जास्रोतच नव्हे, तर उत्पन्नस्रोतही ठरतो. कारण चीन आणि अमेरिकेपेक्षा भारतातून शुद्धीकरण झालेले तेल युरोपातील अनेक देशांना परवडते. ही शृंखला भेदण अशक्य असल्यामुळेही ट्रम्प प्रशासनाचा तळतळाट सुरू आहे.