सध्या संपूर्ण जग नववर्षाचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. अनेकांनी तशी तयारीदेखील सुरू केली आहे. नव्या वर्षाच्या निमित्ताने अनेक जण वेगवेगळे संकल्प करतात. अमेरिकेत नव्या वर्षाचे स्वागत प्रसिद्ध अशा ‘बॉल ड्रॉप’ने केले जाते. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये नेत्रदीपक रोषणाई केली जाणार आहे. हार्बर ब्रीजवर हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. व्हेनिसमध्ये सेंट मार्क्स स्क्वेअरमध्येही अशीच तयारी केली जात आहे. पाकिस्तानमध्ये मात्र नव्या वर्षाचा जल्लोष करण्यास मनाई करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारने हा निर्णय का घेतला? त्यामागे नेमके कारण काय? हे जाणून घेऊ या…

नववर्ष स्वागताच्या उत्सवावर बंदी

सध्या पॅलेस्टाईनमधील हमास संघटना तसेच इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलकडून गाझामध्ये मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांमध्ये महिला, लहान मुलांसह हजारो पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. याच हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान अन्वल उल हक काकर यांनी नववर्ष स्वागताच्या उत्सवावर बंदी घातली आहे.

“कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही”

पंतप्रधान अन्वल उल हक काकर यांनी पाकिस्तानच्या जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना त्यांनी गाझा पट्टीत होत असलेले हल्ले आणि यात पॅलेस्टिनी नागरिकांचा होत असलेला मृत्यू यावर भाष्य केले. “सध्या पॅलेस्टाईनमधील स्थिती फारच बिकट आहे. तेथील स्थिती लक्षात घेता आणि पॅलेस्टिनी बंधू-भगिनींच्या समर्थनार्थ सरकार नव्या वर्षाच्या उत्सवावर बंदी घालत आहे. नववर्ष स्वागतासाठी कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही, त्यावर कडक बंदी घालण्यात येईल”, असे काकर म्हणाले. पाकिस्तानच्या जनतेने पॅलेस्टिनी नागरिकांप्रती संवेदना व्यक्त कराव्यात. नव्या वर्षाच्या निमित्ताने नागरिकांनी मानवतेचे दर्शन घडवावे, असे आवाहनही त्यांनी पाकिस्तानी जनतेला केले.

“आतापर्यंत नऊ हजार मुलांचा मृत्यू”

इस्रायल-हमास यांच्या युद्धात आतापर्यंत २१ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. इस्रायली सैन्याने हिंसाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. ९ ऑक्टोबरपासून इस्रायलकडून पॅलेस्टाईनवर हल्ला करण्यास सुरुवात झाली. या हल्ल्यांत आतापर्यंत नऊ हजार मुलांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती काकर यांनी आपल्या भाषणात दिली.

“नि:शस्त्र लोकांवर हल्ले, पाकिस्तान दु:खात सामील”

“गाझा आणि वेस्ट बँक या प्रदेशातील नि:शस्त्र पॅलेस्टिनींवर हल्ले केले जात आहेत. तेथे नरसंहार सुरू आहे. यामुळे संपूर्ण पाकिस्तान तसेच मुस्लीम धर्मीय दु:खात आहेत”, असेदेखील काकर पाकिस्तानच्या जनतेला उद्देशून म्हणाले.

पाकिस्तानकडून पॅलेस्टाईनला मदत

पॅलेस्टाईनमधील संघर्ष संपावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच पाकिस्तानतर्फे तेथील जनतेला मदत पुरवली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. “पाकिस्तान सरकारकडून मदतीचे दोन पॅकेजेस पॅलेस्टाईनला पाठवण्यात आलेले आहेत. तिसरे पॅकेजही तयार असून ते लवकरच पाठवले जाईल. जॉर्ड आणि इजिप्त या देशांशीही सरकार चर्चा करत आहे. या देशांनी पॅलेस्टाईनला वेळेवर मदत द्यावी, तसेच गाझामध्ये जखमी झालेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती या देशांना करण्यात आली आहे”, असे काकर यांनी सांगितले.

“आमचा प्रयत्न चालूच राहील”

पॅलेस्टिनी नागरिकांच्या व्यथा जागतिक पातळीवर मांडण्यासाठीदेखील पाकिस्तानकडून प्रयत्न केला जात आहे. इस्रायलकडून केला जाणारा हिंसाचार रोखण्यासाठी आमचा हा प्रयत्न सुरूच राहील, असेही काकर यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पाकिस्तानमध्ये इस्लामचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे या देशात नव्या वर्षाचे स्वागत तेवढ्या उत्साहात केले जात नाही. असे असतानाच आता काकर यांनी पॅलेस्टिनी नागरिकांच्या समर्थनार्थ नव्या वर्षाच्या स्वागतासाठी कार्यक्रमांचे आयोजन करू नये, असे तेथील जनतेला सांगितले आहे.