scorecardresearch

Premium

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ७५ रुपयांचे नाणे प्रसिद्ध; जाणून घ्या आतापर्यंतच्या विशेष नाण्यांची कहाणी!

२०२२ साली आयआयटी रुरकी या संस्थेच्या स्थापनेला १७५ वर्षे पूर्ण झाली. हेच औचित्त्य साधून १७५ रुपयांचे खास नाणे जारी करण्यात आले होते.

parliament new building inauguration and commemorative coin
सांतेकित फोटो

येत्या २८ मे रोजी संसदेच्या नव्या इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. या उद्घाटन समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. या उद्घाटन सोहळ्यादरम्यान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाच्या बाजूला ऐतिहासिक महत्त्व असलेला ‘सेंगोल’ (राजदंड) स्थापित करणार आहेत. यासह केंद्रीय अर्थमंत्रालयाने या निमित्ताने विशेष नाणे जारी करण्याचे जाहीर केले आहे. या नाण्यावर भारतीय राजमुद्रा यासह नव्या संसद भवनाचे छायाचित्र असेल. याच पार्श्वभूीमीवर देशात कोणकोणत्या खास कार्यक्रमाच्या निमित्ताने विशेष नाणे जारी करण्यात आलेले आहे? विशेष नाणे जारी करण्याची प्रथा कधीपासूनची आहे? हे जाणून घेऊ या…

संसदेच्या नव्या इमारतीचे औचित्य साधून केंद्रीय अर्थमंत्रालय ७५ रुपये मूल्य असलेले विशेष नाणे जारी करणार आहे. मंत्रालयाने तशी घोषणा केली आहे. या नाण्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. यासह अर्थमंत्रालय १०० रुपये मूल्य असलेले चांदीचे खास नाणे जारी करण्याची शक्यता आहे. या नाण्यावर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचे छायाचित्र असेल. येत्या २८ मे रोजी रामाराव यांची १०० वी जंयती आहे. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त हे खास नाणे जारी केले जाऊ शकते.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हेही वाचा >>> इम्प्लांट्सच्या मदतीने आता अर्धांगवायू झालेली व्यक्ती चालू शकणार; जाणून घ्या सविस्तर…

७५ रुपयांच्या नाण्याची विशेषता काय आहे?

अर्थमंत्रालय जारी करणारे हे ७५ रुपयांचे नाणे वर्तुळाकार असून त्याचा व्यास ४४ मिलिमिटर आहे. ५० टक्के चांदी, ४० टक्के तांबे, ४ टक्के निकेल, ५ टक्के झिंक धातूचे मिश्रण करून या नाण्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. भारत सरकारने दिलेल्या माहितीनुसार या नाण्याच्या एका बाजूला राजमुद्रा आहे. तसेच या राजमुद्रेच्या खाली सत्यमेव जयते असे लिहिलेले आहे. राजमुद्रेच्या डावीकडे देवनागिरी भाषेत ‘भारत’ तर उजवीकडे इंग्रजीमध्ये ‘इंडिया’ असे नाव लिहिलेले आहे. नाण्याचे एकूण वजन ३५ ग्रॅम असून या नाण्याच्या दुसऱ्य बाजूला संसद भवनाची प्रतिमा असेल. यासह संसद भवनाच्या प्रतिमेच्या वरच्या बजूस ‘संसद संकुल’ असे देवनागिरी लिपीमध्ये तर खालच्या बाजूला ‘पार्लामेंट कॉम्पेक्स’ असे इंग्रजीमध्ये लिहिलेले आहे.

विशेष नाणी जारी करण्याचा इतिहास…

एखादी खास घटना, कार्यक्रमाचे औचित्य साधून विशेष नाणे जारी करण्याची प्रथा रोमन साम्राज्यापासून आढळते. तेव्ही अशी विशेष नाणी जारी करून प्रजेला एखादा खास संदेश जारी केला जायचा किंवा एखादा बाबीचा प्रचार करावयाचा असेल तेव्हादेखील विशेष नाणे जारी केले जायचे. प्रसिद्ध अभ्यासक थॉमस आर मार्टिन यांनी याबाबत अभ्यास केला आहे. त्यांनी ‘सुल्ला इंपरेटर इटेरम : दी सॅमनाईट्स अँड रोमन पब्लिकेशन कॉईन प्रोपगंडा’ नावाने एक संशोधन प्रसिद्ध केले होते. यामध्ये थॉमस मार्टीन यांनी “तेव्हाच्या काळात सार्वजनिक ठिकाणी शिलालेख उभारले जात. या शिलालेखांच्या माध्यमातून प्रचार, प्रसिद्धी केली जायची. पुढे नाण्यांवरील शिल्पांच्या माध्यमातून हे काम केले जाऊ लागले. समाजातली प्रत्येक व्यक्ती नाणे वापरते. त्यामुळे नाण्यांच्या माध्यमातून संदेश पोहोचवणे सोपे होते,” असे लिहिलेले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: डिसँटिस यांचे ट्रम्प यांच्यासमोर आव्हान… बायडेन यांच्याविरोधात लढ्याची कुणाला संधी?

भारताने विशेष नाणी जारी करणे कधीपासून सुरू केले?

भारत सरकारने १९६४ साली पहिल्यांदा विशेष नाणे जारी केले. पंडित जवाहरलाल नेहरू याचे याच साली निधन झाले होते. त्यांच्या स्मतिप्रित्यर्थ हे खास नाणे जारी करण्यात आले होते. तेव्हापासून भारत सरकारने आतापर्यंत अनेकवेळा वेगवेगळ्या घटना, प्रसंग, विशेष दिन, जयंती असे औचित्य साधून खास नाणी जारी केलेली आहेत. या नाण्यांच्या माध्यमातून प्रसंगाचे महत्त्व, विशेषता, नेत्यांचे भारतीय विकास, जडनघडणीसाठीचे योगदान जनतेला समजावे, हा या मागचा उद्देश आहे.

इतिहासात वेगवेगळ्या मोहिमांसाठी खास नाणे

केंद्र सरकारने १९७३ साली अन्नधान्याची मोठ्या प्रमाणात लागवड व्हावी यासाठी ‘ग्रो मोअर फूड’ ही थीम समोर ठेवून विशेष नाणे जारी केले होते. त्याच्या पुढच्याच वर्षी जनतेला कुटुंबनियोजनाचे महत्त्व समजावे यासाठी ‘प्लॅन्ड फॅमिली’ या थिमने तसेच १९७५ साली लोकांचा अन्न आणि कामाचा अधिकार लक्षात घेऊन ‘फुड अँड वर्क फॉर ऑल’ आणि ‘सेव्ह फॉर डेव्हलपमेंट’ ही थीम घेऊन विशष नाणे जारी केले होते. देशातील आणीबाणी संपल्यानंतर १९७७ साली केंद्र सरकारने ‘फुड अँड शेल्टर फॉर ऑल’ अशी संकल्पना समोर ठेवत काही खास नाणी जारी केली होती.

हेही वाचा >>> विश्लेषण: कर्ज घोटाळेखोरांना जरब बसणार? केंद्राचे नवे आदेश काय आहेत?

‘मन की बात’ला १०० भाग पूर्ण झाल्यामुळे विशेष नाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातही अनेकदा खास नाणी जारी करण्यात आलेली आहेत. याच वर्षी केंद्र सरकारने ३० एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरील ‘मन की बात’ कार्यक्रमाचे १०० भाग पूर्ण झाल्याचे औचित्य साधून विशेष नाणे जारी केले होते. मागील वर्षी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाली. हेच निमित्त साधून केंद्राने एक, दोन, पाच, दहा तसेच वीस रुपयाची खास नाणी जारी केली होती. यावेळी “या नाण्याच्या माध्यमातून भारतीयांना अमृत कालच्या निमित्ताने समोर ठेवण्यात आलेले लक्ष्य तसेच देशाच्या विकासाचे ध्येय्य स्मरणात राहील,” असे मत मोदी यांनी व्यक्त केले होते. ही नाणी इतर सामान्य नाण्यांप्रमाणेच चलनात वापरण्यात येत आहेत.

देशातील महापुरूषांची प्रतिमा असेलेली अनेक नाणी

२०२२ साली आयआयटी रुरकी या संस्थेच्या स्थापनेला १७५ वर्षे पूर्ण झाली. हेच औचित्त्य साधून १७५ रुपयांचे खास नाणे जारी करण्यात आले होते. याआधी भारत सरकारने देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रविंद्रनाथ टागोर, भगतसिंग, लाल बहादूर शास्त्री, लाला लाजपत राय, इंदिरा गांधी, राजीव गांधी आदी महापुरूष, क्रांतीकारक आणि नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थही खास नाण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘अमूल’ आणि ‘आवीन’ वाद काय आहे ? त्याला राजकीय रंग का दिला गेला ? 

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जारी केले विशेष नाणे

२०१८ साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची ९४ वी जयंती होती. हे औचित्य साधून मोदी यांनी तेव्हा खास १०० रुपयांचे नाणे जारी केले होते. २०१७ साली तामिळनाडू सरकारकडून दिवंगत अभिनेते तथा राजकारणी एमजी रामचंद्रन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १०० आणि पाच रुपयांचे विशेष नाणे जारी करण्यात आले होते. त्याच वर्षी गायिका एमएस शुब्बलक्ष्मी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ १०० आणि १० रुपयांचे नाणे जारी करण्यात आले होते. महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ आतापर्यंत अनेकदा विशेष नाणे जारी करण्यात आलेले आहे.

वेगवेगळ्या संस्थांची आठवण म्हणून खास नाणी

भारतीय संसदेला २०१२ साली ६० वर्षे पूर्ण झाली होती. त्यामुळे १० रुपयांचे तर २०१५ साली भारत-पाकिस्तान युद्धाला ५० वर्षे झाल्याचे निमित्त साधून भारतीय रिझर्व्ह बँकेने ५ रुपयांचे खास नाणे जारी केले होते. भारतात आतापर्यंत जागतिक पातळीवरच्या अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतात १९८२ साली आशियाई स्पर्धा, तर २०१० साली १९ वी राष्ट्रकूल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धांची आठवण म्हणूनही विशेष नाणी जारी करण्यात आली होती. काही नाणी भारतातील स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक, माता वैष्णोदेवी बोर्ड, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अशा काही संस्थांना समर्पित करण्यात आली होती.

हेही वाचा >>> सेंगोल’ निर्मितीचे काम वुम्मीदी परिवाराकडे कसे आले? जाणून घ्या संसदेत स्थापित केल्या जाणाऱ्या राजदंडाचा ऐतिहासिक संदर्भ!

धार्मिक गुरु, देवतांसाठी खास नाणी

काही धार्मिक गुरू आणि देवतांच्याही सन्मानार्थ याआधी खास नाणी जारी करण्यात आलेली आहेत. अनेकदा आपल्याला ५ किंवा १० रुपयांच्या नाण्यावर माता वैष्णोदेवाची प्रतिमा पाहायला मिळते. शीख धर्मियांचे ९ वे धर्गुमरु गुरू तेग बहादूर यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त खास नाणे जारी करण्यात आले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Parliament new building inauguration commemorative coin know history of commemorative coins prd

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×