कर्नाटकपाठोपाठ तेलंगण विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसल्याने पक्ष सावध झालाय. आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिणेकडून ४० ते ५० जागांचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. त्या दृष्टीने भाजपचे नियोजन सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिणेकडील राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. या वर्षात तिसऱ्यांदा मोदी या राज्यांमध्ये येत असून, कर्नाटक व तमिळनाडूत पंतप्रधानांच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेय. विकास योजना व त्याला हिंदुत्वाची जोड भाजपने दिलीय.

दक्षिणेतील जागांचे गणित

दक्षिणेत लोकसभेच्या एकूण १३१ जागा आहेत. त्यात तमिळनाडू ३९, कर्नाटक २८, आंध्र प्रदेश २५, केरळ २०, तेलंगण १७ तसेच पुदुच्चेरी व लक्षद्वीपमध्ये प्रत्येकी एक जागा आहे. गेल्या वेळी भाजपला कर्नाटकमध्ये २५ तर तेलंगणमध्ये चार अशा २९ जागा मिळाल्या. तर काँग्रेसला २७ जागा मिळाल्या होत्या. यात केरळमध्ये १५, तमिळनाडूत ८, तेलंगण ३, कर्नाटक १ अशा जागा मिळाल्या. प्रादेशिक पक्षांचे दक्षिणेत प्राबल्य होते. यंदा भाजपने राज्यवार काही जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. यात कर्नाटकमध्ये गेल्या वेळच्या जागा राखण्यासाठी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाशी आघाडी केली. यातून लिंगायत तसेच वोक्कलिगा मतपेढी पाठीशी राहील अशी भाजपची रणनीती आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता गेल्याने पक्ष आणखी धोका पत्करण्यास तयार नाही. यासाठी जिंकलेल्या एक-दोन जागा जनता दलाला सोडण्यास पक्षाने तयारी ठेवलीय.

Vanchit Bahujan Aghadi, Yavatmal,
यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास
congress leader sonia gandhi choose rajya sabha fear of defeat polls says pm narendra modi
पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
loksatta editorial Supreme court descion regarding candidate affidavit on asstets
अग्रलेख: अपवादांचा अपराध!
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…

हेही वाचा – विश्लेषण : सोमनाथ मंदिराचा संक्षिप्त इतिहास; राष्ट्रपतींच्या हस्ते मंदिराच्या उद्घाटनासाठी नेहरूंनी का केला होता विरोध?

मोजक्या जागांवर लक्ष केंद्रित

केरळमध्ये गेल्या म्हणजे २०१९ मध्ये भाजप तिरुअनंतपुरम या एकमेव मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर होता. यंदा भाजपने अटिंगल, त्रिचूर तसेच पथ्थीमथिट्टा या मतदारसंघांवर अधिक लक्ष दिले आहे. गेल्या वेळी या तीनही ठिकाणी भाजपने अडीच ते तीन लाख मते घेतली होती. त्रिचूरमध्ये नुकताच पंतप्रधानांचा दौरा झाला. रोड शो, मंदिर दर्शन तसेच कार्यकर्ता संवाद असे कार्यक्रम होते. त्रिचूर येथील गेल्या वेळचे उमेदवार सुरेश गोपी यांच्या कन्येच्या विवाहास ते उपस्थित राहिले. प्रख्यात अभिनेते असलेले सुरेश गोपी यंदाही त्रिचूरमधून भाजपकडून लढतील अशी चिन्हे आहेत. केरळमध्ये काँग्रेसची आघाडी विरोधात डावी आघाडी असाच सामना असतो. मात्र यंदा भाजपची भिस्त प्रामुख्याने ख्रिस्ती मतांवर आहे. केरळच्या लोकसंख्येत १८ टक्के ख्रिस्ती आहेत. नाताळनिमित्त दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम झाला होता. हिंदू नायर तसेच ख्रिस्ती मतांच्या जोरावर भाजप समीकरण आखत आहे.

तमिळनाडूमध्ये आव्हान

दक्षिणेत सर्वाधिक ३९ जागा असलेले तमिळनाडू केरळपाठोपाठ भाजपसाठी आव्हानात्मक आहे. पंतप्रधानांचे या राज्यात विविध विकास योजनांच्या निमित्ताने सातत्याने दौरे होत आहेत. काशी तमीळ संगमसारखे कार्यक्रम किंवा अलीकडेच दिल्लीत पोंगलनिमित्त राज्यातील केंद्रीय मंत्री एल. मुरुगम यांच्या निवासस्थानी कार्यक्रमात ते उपस्थित होते. तमीळ संस्कृतीशी जोडून घेण्याचा हा प्रयत्न होता. राज्यात आता भाजप स्वबळावर लढत आहे. अण्णा द्रमुकशी आघाडी तुटल्यानंतर काही छोटे पक्ष भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहेत. गेल्या वेळी अण्णा द्रमुक एनडीएमध्ये असताना त्यांना एक जागा जिंकता आली. उर्वरित जागा द्रमुक-काँग्रेस आघाडीने जिंकल्या. यंदा भाजपने कन्याकुमारीबरोबरच रामनाथपुरम, कोईम्बतूर, दक्षिण चेन्नई अशा चार ते पाच जागांवर जोर लावला आहे. प्रदेशाध्यक्ष अण्णा मलाई यांच्या यात्रेलाही चांगला प्रतिसाद मिळतोय. अण्णा द्रमुकशी थेट आघाडी न करताही जर चर्चेतून काही जागांवर एकमेकांनी सामंजस्याने उमेदवार उभे करण्याबाबत काही निर्णय झाला तर भाजपला एक ते दोन जागांची अपेक्षा बाळगता येईल.

आंध्रचा तिढा

आंध्र प्रदेशमध्ये लेपाक्षी येथील प्रसिद्ध वीरभद्र मंदिरात पंतप्रधानांनी चार दिवसांपूर्वी दर्शन घेतले. राज्यात २५ जागांवर सत्ताधारी वायएसआर काँग्रेस विरुद्ध तेलुगू देसम असाच सामना आहे. तेलुगू देसमशी आघाडी करण्याबाबत भाजपने अद्याप काही जाहीर केले नाही. भाजपचा मित्रपक्ष तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक जनसेना पक्ष याबाबत आग्रही असल्याचे सांगितले जाते. प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांचा हा पक्ष आहे. तेलुगू देसम-जनसेना आणि भाजप अशी तीन पक्षांची युती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसला आव्हानात्मक ठरेल असे विश्लेषक सांगतात. मात्र राज्यातील भाजपच्या बहुसंख्य नेत्यांचा तेलुगू देसमबरोबर जाण्यास विरोध आहे. जनसेना किंवा स्वबळावर लढून पक्षाची ताकद वाढवावी या मताचे अनेक नेते आहे. राज्यात एक-दोन जागांचे लक्ष्य असले तरी तूर्तास ते कठीण आहे.

हेही वाचा – विश्लेषण : पाकिस्तान-इराणमध्ये युद्ध भडकेल का? चीनची मध्यस्थी कितपत यशस्वी होईल?

तेलंगणमध्ये नव्याने आशा

गेल्याच महिन्यात तेलंगण विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसला. गेल्या वेळच्या तुलनेत मतांची टक्केवारी तसेच जागाही वाढल्या असल्या तरी प्रमुख विरोधक म्हणून स्थान मिळवता आले नाही. भारत राष्ट्र समितीच्या के. चंद्रशेखर राव यांना काँग्रेसने पायउतार केले. गेल्या वेळी लोकसभेला भाजपने चार जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला तीन मिळाल्या होत्या. यंदा राज्यात काँग्रेसची सत्ता असल्याने साहजिकच जादा जागा जिंकण्याचा त्यांचा दावा आहे. मात्र लोकसभेला राष्ट्रीय मुद्द्यांवर मतदान होते. त्यामुळे पंतप्रधानांची लोकप्रियता तसेच पायाभूत सुविधा प्रकल्प व इतर विकासाच्या मुद्द्यांवर विधानसभेला भारत राष्ट्र समितीला मतदान करणारे मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळतील असा पक्षाचा होरा आहे. लोकसभेला १७ पैकी तीन ते चार जागा वगळता भाजप विरुद्ध काँग्रेस असाच सामना होण्याची शक्यता आहे. यामध्ये किमान एक ते दोन जागा वाढतील काय, याची चाचपणी भाजपकडून सुरू आहे.

हिंदुत्वाला विकासाची जोड…

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यावर दक्षिणेतही हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे निवडणुकीत आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. यामुळेच पंतप्रधानांचे दौरे, यामध्ये मंदिरांना भेटी, त्याला विकासकामांची जोड देऊन दक्षिण भारतात चांगल्या कामगिरीचा भाजपचा प्रयत्न आहे. भाजपची रणनीती पाहता, केवळ उत्तर किंवा पश्चिमेकडील राज्यांच्या कामगिरीवर विसंबून न राहता दक्षिणकेडील राज्यांमध्येही अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पंतप्रधानांचे या राज्यांमध्ये सुरू असलेले दौरे हेच अधोरेखित करत आहेत.

hrishikesh.deshpande@expressindia.com